Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड दूरदर्शनवरील ‘शक्तिमान’ आता रुपेरी पडद्यावर येणार नवीन अवतारात; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

दूरदर्शनवरील ‘शक्तिमान’ आता रुपेरी पडद्यावर येणार नवीन अवतारात; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘स्पायडरमॅन’, ‘सुपरमॅन’ यांसारखे सिनेमे तर तुम्ही पाहिलेच असतील. मात्र, आता देसी अंदाजातील एक सुपरहिरोदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ९० च्या दशकातील डीडी नॅशनलवरील प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘शक्तिमान‘ आठवतेय का? का नाही आठवणार. या मालिकेचा एक वेगळाच चाहतावर्ग होता. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत अभिनेते मुकेश खन्ना यांनी सुपरहिरो ‘शक्तिमान’ची भूमिका साकारली होती. मात्र, आता हीच मालिका छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर  सिनेमाच्या रूपात पाहायला मिळणार आहे.

होय, बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिरोंचा जलवा पाहिल्यानंतर आता ‘शक्तिमान’चा (Shaktimaan) जलवा पाहायला मिळणार आहे. सोनी पिक्चर्सने या सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक शानदार व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये ‘शक्तिमान’ची झलक पाहायला मिळत आहे.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमाशी निगडित एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ‘शक्तिमान’चा चेहरा तर दिसत नाहीये, पण गंगाधर म्हणजेच मुकेश खन्ना यांचा गोल चष्मा नक्की दिसत आहे. हा चष्मा मालिकेच्या काळात खूप प्रसिद्ध झाला होता. यासोबतच एक आयकार्डही दिसत आहे. ज्यात कोणताही फोटो नाहीये. सोनी पिक्चर्सच्या घोषणेनंतर ‘शक्तिमान’ मालिकेचे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे की, या सिनेमात ‘शक्तिमान’ची भूमिका कोण साकारणार आहे.

या व्हिडिओसोबत सोनी पिक्चर्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारत आणि जगात आमच्या अनेक सुपरहिरोंच्या सिनेमांच्या यशानंतर आपल्या देसी सुपरहिरोची वेळ आली आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन शक्तिमानला आणण्यासाठी सज्ज आहे आणि आयकॉनिक सुपरहिरोची जादू पुन्हा एकदा तयार करेल. ‘ब्रूइंग थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. शक्तिमान सिनेमासाठी सज्ज व्हा. इतर माहिती लवकरच येईल. तुम्ही उत्साहित आहात का?”

‘शक्तिमान’ मालिकेबद्दल थोडंसं
‘शक्तिमान’ ही मालिका १३ सप्टेंबर, १९९७ रोजी टेलिकास्ट झाली होती. या मालिकेने २७ मार्च, २००५ पर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यानंतर ही मालिका लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा टेलिकास्ट करण्यात आली होती, ज्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. हाती आलेल्या माहितीनुसार, तेव्हापासूनच निर्माते या सिनेमाची निर्मिती करण्याची योजना बनवू लागले होते. या मालिकेत मुकेश खन्ना यांच्याव्यतिरिक्त किटू गिडवानी आणि वैष्णवी महंत मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा