दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष हा त्याच्या भारदस्त डायलॉग्ज आणि जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जातो. आज त्याने आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. कदाचित असा एकही चाहता शोधूनही सापडणार नाही, ज्याला धनुष हे नाव माहिती नाही. धनुष एवढा मोठा अभिनेता बनला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? धनुषला अभिनयाची कधी आवड नव्हतीच. त्याला वेगळ्याच गोष्टीत रस होता. या लेखातून आपण त्याच गोष्टीबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.
सुपरस्टार धनुष बालपणापासूनच दिग्दर्शकांच्या कुटुंबात वाढला आहे. तो चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. त्याचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा असे आहे. त्याचा जन्म २८ जुलै, १९८३ रोजी झाला. बालपणापासूनच घरात सिनेसृष्टीचं वातावरण असल्यामुळे अभिनयाकडे वळला. मात्र, एका मुलाखतीत त्याने त्याच्या कारकिर्दीबाबत सांगितले होते.
धनुषने त्याच्या करिअर संदर्भात एक खुलासा केला होता. यात त्याने त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नव्हते, असे सांगितले होते. धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शित केलेल्या २००२ मधील ‘तुलुवडो इल्लमई’ या चित्रपटापासून त्याने कारकिर्दीची सुरूवात केली. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. धनुषचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्याने ‘अडुकलम’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने त्याला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. परंतु धनुषला अभिनयामध्ये म्हणावा इतका रस नव्हता.
धनुषने मरीन इंजीनिअर बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले होते. वयाच्या १६-१७ व्या वर्षापासूनच धनुषला मरीन इंजीनिअर बनण्याची इच्छा होती. धनुष १२वी मध्ये नापास झाला होता. कधीकधी त्याला शेफ बनावे वाटायचे. मात्र, वडिलांच्या आग्रहामुळे त्याला अभिनयक्षेत्रात जावे लागले. धनुषच्या वडिलांनी त्याला इच्छेविरूद्ध अभिनयक्षेत्रात जाण्यास सांगितल्यावर त्याने वडिलांच्या या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, कस्तुरी राजा यांनी या विरोधाला न जुमानता धनुषला अभिनय करण्यास सांगितले.
‘तुलुवडो इल्लमई’ या तमिळ चित्रपटापासून धनुषने अभिनयाला सुरूवात केली आणि त्याच्या यशाची शिखरे दिवसेंदिवस उंचावतच गेली. एक उत्कृष्ट अभिनेता, पार्श्वगायक, गीतकार आणि निर्माता म्हणून त्याने स्वत: ची ओळख निर्माण केली. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रांझणा’ या हिंदी चित्रपटानंतर धनुषचे बॉलिवूडमध्येही फॅन्स तयार झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-