Monday, May 13, 2024

‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’ म्हणीला फाट्यावर मारणारे साजिद-वाजिद, ज्यांनी सलमानलाही बनवले सुपरस्टार

सख्खे भाऊ, पक्के वैरी अशी आपल्याकडे म्हण आहे. तसंही अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे भावंडांमध्ये येत असलेला दुरावा, कटुता यावरूनच ही म्हण आली असावी, पण भारतातच संगीत क्षेत्रात अशी एक भावांची जोडी होऊन गेली, ज्यांनी भाऊ कसे असावेत याचं अक्षरश: उदाहरण घालून दिलं. त्यांचं नाव एकमेकांबरोबर घेतल्याशिवाय पूर्णत्व येऊच शतक नाही. हीच जोडी म्हणजे साजिद-वाजिद. एक गीतकर-संगीतकार जोडी. तसं तर भारताला संगीतकार जोडीचा इतिहास आहे, त्यांच्याही आधी आशा जोड्या होऊन गेल्या पण २१ व्या शतकात ज्या दोघांनी एक जोडी म्हणून नाव कमावलं त्यात साजिद-वाजिद यांचं नाव घ्यावच लागेल, पण कोण आहेत हे साजिद आणि वाजिद. काय आहे त्यांची गोष्ट चला जाणून घेऊया…

उस्ताद शराफत अली खान आणि त्यांची पत्नी रझीना खान यांना तीन मुलं झाली. साजिद, जावेद आणि वाजिद. साजिदचा जन्म २१ नोव्हेंबरचा, साल मात्र कुठेही उपलब्ध नाही. तसेच जावेदच्या जन्मतारखेबद्दलही फारशी माहिती कुठे नाही. वाजिद सर्वात लहान. त्याचा जन्म झाला १० जुलै, १९७७ साली. हे कुटुंब उत्तरप्रदेशमधील शहरानपूरमधील, पण पुढे मुंबईत स्तलांतरीत झालं. खरंतर घरातच संगीताला पोषक वातावरण होतं. त्याचमुळे साजिद आणि वाजिद या दोन्ही मुलांचीही ओढ संगीताकडे जास्त वाढली. त्यांच कुटुंब संगीतातील किराणा घराणा आणि पंजाब घराणाशी निगडीत होतं. त्यांचे वडील उस्ताद शराफत अली खान प्रसिद्ध तबला वादक होते. त्यांनी अनेक दिग्गज गायकांसाठी तबला वादनही केले होते. तसेच दोन्ही बाजूचे आजोबा उस्ताद अब्दुल लतीफ खान आणि उस्ताद फय्याज अहमद खान हे देखील संगीताशी जोडलेले होते. त्यांच्या आजोबांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलंय. आता घरातच संगीत असं भरभरुन वाहत असताना साजिद वाजिद यांनाही त्याकडे आकर्षण वाटणं काही अनपेक्षित नव्हतं. त्यामुळे वयाच्या ७-८ वर्षापासूनच दोघांनीही संगीतात रुची घेण्यास सुरुवात केली. त्यांनी घरातूनच तसेच वेगवेगळ्या कलाकारांकडून शिकण्यास सुरुवात केली. आल्लारखा खान, दास बाबू यांच्याकडूनही त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी तबला, गिटार वाजवण्यासही शिकले. असंही सांगितलं जातं की वाजिदकडे तोंडाने वाद्यांचा आवाज काढण्याचीही कला होती.

असं म्हटलं जातं पुढे साजिदने काहीतरी वेगळं करायचं म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केलेली, पण वाजिदची संगिताची आवड आणि त्याचं पॅशन पाहून त्याने त्याला साथ द्यायला सुरुवात केली. या दोघांच्या जोडीने काम मिळवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला संघर्ष केला, पण त्यांना पहिला ब्रेक अखेर मिळाला १९९८ साली. त्यावर्षी त्यांना सलमान खान आणि काजलची प्रमुख भूमिका असलेल्या प्यार किया तो डरना क्या या चित्रपटात एका गाण्यासाठी संगीतकार म्हणून काम मिळालं. त्यावेळी त्यांनी त्यांचा कॉलेजचा मित्र असलेल्या सोहेल खान याला एक सामान्य आणि उदयोन्मुख संगीतकार म्हणून फोन केला होता. कारण होतं, त्यांना मैत्रीचा फायदा उचलून काम नको होतं, तर कौशल्याच्या जोरावर काम हवं होतं. त्यावेळ सोहेल ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. या चित्रपटाचे दुसरे संगीतकार जतीन-ललित आणि हिमेश रेशमिया देखील होते. त्यावेळी हिमेशही नवा संगीतकार होता. त्या चित्रपटात साजिद वाजिदने तेरी जवानी गाणं दिग्दर्शित केलं होतं. ते गाणं चांगलंच हिट झालं. त्यानंतर त्यांना सलमान खानच्याच हॅलो ब्रदर चित्रपटासाठीही काम मिळालं त्यात त्यांनी ४ गाण्यांसाठी संगीत दिलं. त्यानंतरही त्यांनी ६-७ चित्रपटांसाठी कामं केली. मात्र, त्यांना फार यश मिळालं नाही. तो काळ या दोन्ही भावांसाठी प्रचंड संघर्षाचा काळ राहिला, पण त्यानंतरही त्यांच्या मदतीला धावून आला तो सलमान खानच. खरंतर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की सलमान खानच्या यशात साजिद-वाजिद यांच्या संगीताचा मोठा वाटा राहिला आणि साजिद-वाजिद यांच्या यशात सलमानचा. २००३ साली तेरे नाम चित्रपट आला होता. या चित्रपटाने धूमाकुळ घातला. या चित्रपटातील दोन गाण्यांसाठी साजिद वाजिदने संगीत दिलं. त्यात लगन लगी गाण्याचाही समावेश होता. या चित्रपटानंतर मात्र ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटातील गाण्यांनी साजिद-वाजिदला मोठं केलं. यात त्यांनी जवळपास ७ गाण्यांसाठी संगीत दिलं. विशेष म्हणजे त्यांची सगळीच गाणी हिट ठरली. त्यांची ताकद ही होती की, ते प्रत्येक गाण्याला वेगळं संगीत द्यायचे, त्यांची गाणी चित्रपटाच्या कथेला अनुसरून असायची.

सांगण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, चित्रपटात संगीतकार म्हणून काम मिळवत असताना साजिद – वाजिदने काही अल्बमसाठीही कामं केली होती. १९९८ मध्ये ‘दीवाना’ हा त्यांचा पहिला अल्बम होता. ज्यात सोनू निगमने गाणी गायली होती आणि फैज अन्वरने गाणी लिहिली होती. हा अल्बम चांगलाच हिट झालेला. त्यानंतर त्यांनी ‘खोया खोया चांद’ या अल्बमसाठी संगीत दिलं होतं. ज्यात अल्का याग्निक आणि बाबुल सुप्रियोने गाणी गायली होती. अनेकदा साजिद वाजिद या दोघांनीही त्यांच्या संघर्षाबद्दल सांगताना म्हटलं होतं, त्यांना घरातूनच एक शिकवण होती, ‘काहीही झालं तरी हार मानायची नाही, काम करत राहायचं’ हेच या दोघांनी शेवटपर्यंत सांभाळलं.

असो, मुझसे शादी करोगी हिट झाल्यानंतर त्यांनी डेव्हिड धवन यांच्यासह पार्टनर चित्रपटातही काम केलं. पार्टनर चित्रपटाने त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. याच चित्रपटात वाजिदने गायक म्हणूनही पदार्पण केलं. त्याने दोन गाणी गायली. यानंतर मात्र वाजिदचा संगीतकार बरोबरच गायक म्हणूनही प्रवास सुरू झाला. त्याला साजिदची साथ होती. या दोघांनी पुढे काही गाणी स्वत: लिहिलीही. इतकंच काय काही चित्रपटांना बॅकग्राऊंड म्यूजिकही दिलं. हे दोघेही वेगवेगळ्या चित्रपटांसाठी कामं करत राहिले, पण तरीही त्यांचं नाव मोठ्या कोणत्या पुरस्कारासाठी पुढे येत नव्हतं. कितीही हिट चित्रपटांसाठी गाणी दिली, तरी दोघांचा संघर्ष फार काही संपला नव्हता, पण संयम ठेवला आणि मेहनत केली की एक दिवस तुम्हाला त्याचं फळ मिळतंच. तसंच झालं या दोघांच्या बाबतीत. २०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपट आला. त्या चित्रपटाने या दोघांनाही फिल्मफेअर व्यतिरिक्त अन्य मोठे पुरस्कारही मिळवून दिले. सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी त्यांना हे यश मिळालं होतं. एका मुलाखतीत या दोघांनी या चित्रपटाच्या ‘दबंग’ गाण्याचा एक किस्सा ऐकवला होता. दबंग या शब्दाचा अर्थ त्यांना गाण्यात उतरवायचा होता. त्यावेळी ‘हुड हुड’ हा शब्द त्यांना सुचला तो त्यांच्या आजोबांमुळे. त्यांचे आजोबा रागावताना वैगरे हुड असा शब्द वापरायचे. तसेच महान गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या गायिकीची प्रेरणाही त्यांना मिळालेली होती.

दबंगनंतर मात्र सर्वच परिस्थिती बदलली, त्यांच्याकडे अनेक फिल्ममेकर, प्रोड्यूसर आले. त्यांनी केलेलंच ‘रावडी राठोड’मधील ‘चिंता ता चिता ता’ गाणं गाजलं. त्यांनी दबंगच्या सिक्वेल्ससाठीही कामं केली. इतंकच नाही, तर २०११ मध्ये साजिद-वाजिदने आयपीएलचं थीम साँग ढमढमढम धडाका कंपोज केलेलं आणि वाजिदने ते गायलंही होतं. या दोघांनी टीव्ही शो दस का दम, बिग बॉस ४, बिग बॉस ६ यांच्या टायटल गाण्यांसाठीही कामं केली. ते २०१०, २०१२, २०१६ साली सारेगमप या रिऍलिटी शोचे जजही बनले होते.

पण यशाच्या शिखरावर असताना त्यांना जबरदस्त धक्का बसला. वाजिदला आजारांनी जखडले. त्यामुळे त्यांचं सगळं कुटुंबच हदरलं. वाजिदला किडनीचा त्रास होता. किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती. याच कारणाने साजिदने जंगजंग पछाडलं, पण अखेर परिस्थितीसमोर हतबल होण्याची वेळ आलेली. अखेर २०१९ मध्ये साजिदची पत्नी लुबानाने वाजिदला किडनी देण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला साजिदसह त्यांच्या कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला. ती सांगते वाजिद तिला भावासारखा होता. तो नेहमी कुटुंबासाठी उभा राहिला आता त्याच्यासाठी उभं राहण्याची वेळ होती. तिने वाजिदला किडनी दिली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण तरीही वाजिदला आजारानं जखडूनच ठेवलेलं, त्याला इन्फेक्शन व्हायला लागलं. त्यातच कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलेला असताना वाजिदही याचा बळी ठरला. या सर्व आजारांशी लढत असताना अखेर १ जून, २०२० रोजी वाजिदने अखेरचा श्वास घेतला आणि साजिद-वाजिद जोडी तुटली.

वाजिदच्या जाण्यापूर्वी ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ ही सलमान खानची गाणी रिलीज झाली होती. या गाण्यांसाठी साजिद-वाजिदने काम केलं होतं. त्यामुळे या जोडीचं पहिलं आणि अखेरचं काम सलमान खानबरोबरच राहिलं.

या दोन भावांमधील प्रेमही इतकं राहिलं की या दोघांचंही नाव वेगळं होऊ शकलं नाही. वाजिदच्या जाण्यानंतर साजिदने मोठा निर्णय घेतला. शेवटी आयुष्य आहे म्हणल्यावर पुढं जात राहणं महत्त्वाचं असतं. साजिदनेही पुढे एकट्याने जायचं ठरवलं, पण पुढेच्या प्रवासासाठी त्याने त्याच्या नावापुढे साजिद खान ऐवजी आता साजिद वाजिद लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो जेही काम करेल तिथं साजिद वाजिद असंच नाव लागेल. त्याने वाजिदच्या जाण्यानंतरही त्याची आठवण कायम ठेवली. त्याने केवळ म्यूजिक अरेंजमेंट, कंपोजर म्हणूनही काम केलं, पण गाणं गायलं नव्हतं. त्याने अखेर वाजिदच्या जाण्यानंतर राधे चित्रपटात गाणं गायलं.

वाजिदच्या आठवणींबद्दल सांगताना वाजिद सांगतो तो अजूनही माझ्याबरोबर आहे, आणि तो नेहमीच माझ्याबरोबर असेल. वाजिद मेलोडियस होता. मी नेहमीच अरेंजमेंज, पार्टी साँग, आयटम नंबर्स आशा गाण्यांवर काम केलं होतं, पण वाजिदची टेस्ट वेगळी होती, त्याची गाणी सुरेल होती. त्याच्या जाण्यानंतर एकदिवस समुद्र किनाऱ्यावर मी एक गाणं तयार केलं आणि आईला ऐकवलं, त्यावेळी ती म्हणाली हा वाजिद आहे. त्यावेळी वाजिद माझ्याबरोबरच होता.

या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास दोघांची लग्न झाली आहेत. साजिदने लुबाना खानशी लग्न केलं, त्याला मेहेक आणि मुस्कान या नावाच्या दोन मुली आहेत, तर वाजिदचं आयुष्य मात्र थोडं वादग्रस्त राहिलं, इंटरकास्ट मॅरेज त्याने केलं होतं. त्याने कमलरुखशी लग्न केलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार त्यांच २००३ साली स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत लग्न झालं होतं, पण त्याच्या घरच्यांनी कधीही तिला किंवा त्यांच्या मुलांना स्विकारलं नाही. त्यामुळे वाजिद कमलारुख आणि त्याची मुलगी आणि मुलगा यांना घेऊन बाजूला झाला होता, पण सततच्या वादानंतर त्याने २०१४ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. ही केस सुरू असतानाच त्याचे निधन झाले. यानंतर कमलारुखने त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्साही मागितला आहे. असं म्हटलं जातं या साजिद आणि वाजिद या दोन्ही भावांनी जी कमाई केली ती वाटून घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sajid Wajid (@thesajidwajid)

असो, असे वाद जरी वाजिदच्या निधनानंतर समोर आले असले, तरी या दोघांची जोडी कधीही वादांमुळे तुटली नव्हती. ते वाजिदच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले, पण दैवाचा खेळ कोणाला कळतो तशी ही जोडी अकालीच तुटली. असं जरी असलं, तरी त्यांची गाणी नेहमीच गाजत राहतील. जोपर्यंत त्यांची गाणी असतील, तोपर्यंत सर्वांच्या मनात साजिद-वाजिद कायम असतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

किशोरदांच्या चित्रपटात रफीसाहेबांना गाणं गायला लावणारी शंकर-जयकिशन संगीतकार जोडी, का पडली नात्यात फूट?

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारे ५ मराठी सिनेमे तुम्हाला माहितीयेत का? एका क्लिकवर घ्या जाणून

आशा भोसले, सुनील दत्त ते बच्चन कुटुंबीय! भारतीय सिनेसृष्टीने केलेले सगळे वर्ल्डरेकॉर्ड एकाच ठिकाणी

हे देखील वाचा