Tuesday, September 26, 2023

‘देशाचा पंतप्रधान आला तरी सेल्फी देणार नाही…’, अभिनेता चिन्मय मांडलेकरने सांगितले कारण

सध्या एका चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तो चित्रपट इतर कुठला नसून दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार‘ आहे. हा सिनेमा ‘शिवराज अष्टका’तील पाचवा भाग असून सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अशात सिनेमा रिलीज होण्यापूर्वी चिन्मयच्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्याने देशाचा पंतप्रधान जरी आला, तरीही सेल्फी देणार नाही असे विधान केले आहे. चला तर यामागील कारण जाणून घेऊयात…

काय आहे सेल्फी न देण्यामागील कारण?
‘सुभेदार’ (Subhedar) सिनेमातील अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने सांगितले की, तो जेव्हा छत्रपती शिवरायांच्या पोशाखात असतो, तेव्हा कुणालाच सेल्फी देत नाही. तो म्हणाला की, “मी शिवरायांच्या पोशाखात असताना, म्हणजे पूर्ण पोशाखात जेव्हा मी जिरेटोप चढवतो. त्याच्यानंतर तुम्हाला माझा एकही सेल्फी कोणाबरोबरही मिळणार नाही. म्हणजे अगदी देशाचा पंतप्रधान जरी आला, तरीही नाही.”

यामागील कारण सांगताना चिन्मय पुढे म्हणाला की, “याचं कारण असं आहे की, जेव्हा तो पूर्ण पोशाख मी घालतो, तेव्हा मी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असतो आणि तो मान राखला गेला पाहिजे. त्यामुळे आजपर्यंत आजतागायत मी कोणालाही त्या पोशाखात फोटो दिलेला नाहीये. बरेचदा हिरमोड होतो काही लोकांचा. तरीही मी त्यांना सांगतो समजून घ्या माझी तळमळ, पण तुम्हाला सेल्फी नाही मिळणार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mediatalk (@mediatalkofficial)

“एकदा का त्या संपूर्ण भूमिकेत शिरलो, त्या वेशामध्ये गेलं की अनेक गोष्टींचं तारतम्य तुम्ही कसे वागता सेटवर, तुम्ही कसं तुमचं आचरण तुमच्या सहकलाकारांबरोबर किंवा इतर कारण बरेचदा आम्ही लाईव्ह लोकेशनवर शूट करत असतो. त्यामुळे आजूबाजूला खूप लोकंही बघायला आलेली असतात तुम्हाला. त्यामुळे ते भान तर बाळगावंच लागतं. म्हणजे माझा नियम एकच आहे की, एकदा का तुम्ही पूर्ण पोशाख केलात छत्रपती शिवाजी महाराजांचा की त्यांचा आब राखला गेला पाहिजे,” असेही पुढे बोलताना चिन्मय म्हणाला.

‘सुभेदार’ सिनेमा कधी रिलीज होणार?
‘सुभेदार’ हा सिनेमा येत्या 18 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात ‘सुभेदारां’च्या भूमिकेत अजय पुरकर (Ajay Purkar) आहेत. तसेच, जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहे. तसेच, सावित्री मालुसरे यांची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने साकारली आहे. (Subhedar fame actor chinmay mandlekar said if Prime Minister come I will not give a selfie know why)

महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियातील चाहतीने कार्तिकसाठी उघडले प्रेमाचे दरवाजे, सर्वांसमोर घातली लग्नाची मागणी; पाहा व्हिडिओ
धक्कादायक! ‘बिग बॉस 13’ Paras Chhabraने सिक्स पॅक ऍब्जसाठी घेतले होते स्टेरॉईड? अभिनेत्याचा खुलासा

हे देखील वाचा