Saturday, April 20, 2024

Birthday | एकेकाळी लिट्टी-चोखा विकायचा खेसारी लाल यादव, आज कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) हा भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार आहे. केवळ त्याच्या अभिनयाचेच नाही तर गायनाचेही लोक प्रचंड चाहते आहेत. म्हणूनच ते त्याच्या नवीन चित्रपटाची वाट पाहतात आणि जेव्हाही त्याचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतो, तेव्हा तो भोजपुरी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतो. पण भोजपुरी चित्रपटसृष्टीत येण्याआधी खेसारी लालला मोठा संघर्ष करावा लागला होता. मंगळवारी (१५ मार्च) हा भोजपुरी सुपरस्टार त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. याचमुळे तुम्हाला खेसारी लालच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगत आहोत, ज्या तुम्हाला कदाचित माहितही नसतील.

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवचे खरे नाव शत्रुघ्न कुमार यादव आहे. त्याटे बालपण खूप कष्टात गेले. त्याला सात भाऊ आहेत. त्याचे वडील मंगरूलाल यादव आपल्या सर्व मुलांचे संगोपन करण्यासाठी कठोर परिश्रम करायचे. अशा परिस्थितीत खेसरीलालही वडिलांच्या मदतीसाठी काम करू लागला. इतकंच नाही तर गावात डान्स करून पैसे कमवत असे, यातून कुटुंबाला आर्थिक मदत होत असे.

खेसारी लाल यादव सुरुवातीपासूनच दिसायला दमदार होता. त्यामुळे त्याला फौजीची नोकरीही मिळाली. मात्र त्याला सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्वात प्रवेश करायचा होता. त्यासाठी त्याने लष्कराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो पत्नीसह दिल्लीत आला. येथे त्यांनी लिट्टी-चोखा विकण्यास सुरुवात केली. या पैशातून तो आपले घर चालवत असे आणि लिट्टी-चोखा विकून त्याने आपल्या पहिल्या अल्बमसाठी पैसे गोळा केले.

खेसारी लाल यादवचा पहिला अल्बम फ्लॉप ठरला, पण हळूहळू त्याने भोजपुरी सिनेमात आपले पाय रोवले. अनेक हिट अल्बम दिल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि इथेही त्यांनी दबदबा निर्माण केला. ‘साजन चले ससुराल’ हा त्याचा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये तो स्मृती सिन्हासोबत दिसला होता. यानंतर त्याला चित्रपटांची ओढ लागली. खेसारी लाल यादवने ‘मेहंदी लगा के रखना’, ‘लिट्टी चोखा’, ‘नागिन’, ‘दुल्हन वही जो पिया मन भये’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या खेसारी लाल यादव करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी इतके मानधन घेतो. त्याचे प्रत्येक गाणे आणि चित्रपट प्रेक्षकांना वेड लावत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा