विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांचे काम, त्यांची मेहनत, त्यांचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी त्यांनी केलेली तपस्या हे चित्रपटांच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा, त्यांच्यावर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड मागील काही काळापासून चित्रपटसृष्टीमध्ये हिट होताना दिसत आहे. आजपर्यंत अनेक महान लोंकाच्या जीवनाचे चरित्र चित्रपटाच्या मार्फत प्रेक्षकांसमोर आले आहे. आता या यादीमध्ये अजून एका मोठ्या कलाकाराचे नाव जोडले जाणार आहे. तो कलाकार म्हणजेच प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका सरोज खान.
आपल्या नृत्याच्या कलेने ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितपासून अनेक मोठमोठ्या कलाकरांना नृत्याचे धडे दिले आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अविस्मरणीय आणि हिट गाणी दिली आहे. नुकतीच सरोज खान यांची पहिली पुण्यतिथी साजरी झाली. या दिवसाच्या निमित्ताने निर्माता भूषण कुमार यांनी सरोज खान यांच्या संघर्षमय जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूडची अनेक ब्लॉकबस्टर गाणी कोरिओग्राफ करणाऱ्या सरोज खान यांनी ०३ जुलै, २०२० रोजी वयाच्या ७१ वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक महान, हुशार नृत्यदिग्दर्शिका सर्वानी गमावली. सरोज खानच्या पहिल्या स्मृतीदिनी टी-सीरिजने त्यांच्या बायोपिकची अधिकृतपणे घोषणा केली आहे.
या बायोपिकसाठी निर्मात्यांनी सरोज खान यांची मुलगी सुकैना आणि मुलगा राजू खान यांच्याकडून चित्रपटासाठी परवानगी घेतली आहे. ही घोषणा करताना भूषण कुमार यांनी सांगितले आहे की, “सरोज खान यांनी आपल्या नृत्याने कलाकारांची भूमिका अविस्मरणीय करण्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीच्या नृत्यदिग्दर्शनातही मोठी क्रांती घडवून आणली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच सुरू झालेला सरोज यांचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. त्यांना या क्षेत्रात खूप आदर आणि सन्मान मिळाला. सुकैना आणि राजू यांनी त्यांच्या आईवर बायोपिक बनवण्यास सहमती दर्शविली याचा मला फार आनंद होत आहे.”
सरोज खान यांचा मुलगा राजू खानने देखील सांगितले की, “माझ्या आईला नृत्याची खूप आवड होती आणि तिने तिचे संपूर्ण जीवन नृत्याला समर्पित केले होते. हे तर सर्वांनाच माहित आहे. मी तिच्या पावलांवर पाऊल ठेऊनच माझे काम केले याचा मला आनंद आहे. माझ्या आईला इंडस्ट्रीकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला. आता तिची कहाणी संपूर्ण जग बघेल ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सन्मानाची बाब आहे.”
पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात सरोजजी यांनी त्यांच्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे स्थान आणि नाव निर्माण केले, सरोजी यांनी ३५०० गाणी कोरिओग्राफ केली. त्यात ‘एक दो तीन’, ‘धक धक करने लगा’ , ‘डोला रे डोला’ आदी अनेक सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. सरोज खान यांना त्यांच्या कामासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…