Shabaash Mithu | तापसी पन्नूच्या चित्रपटाचा टीझर रिलीझ, मिताली राजच्या भूमिकेत जबरदस्त दिसतेय अभिनेत्री

हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या आगामी ‘शाबाश मिठू’ या चित्रपटामुळे सगळीकडे चर्चेत आहे. प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवन कथेवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात तापसी पन्नूने मिताली राजची भूमिका साकारली आहे. सर्व क्रिकेटप्रेमी आणि तापसीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीझ झाला असून, मिताली राजच्या भूमिकेतील तापसी पन्नू यामध्ये खूपच दमदार दिसत आहे. या जबरदस्त टीझरची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. 
प्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘शाब्बास मिठू’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दीर्घकाळ या चित्रपटाच्या टीझरची प्रतिक्षा प्रेक्षकांना लागली होती. जी आता संपली असून, या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ५६ सेकंदाच्या या जबराट टीझरची सुरुवात क्रिकेटच्या मैदानावरून होते. ज्यामध्ये प्रेक्षकांचा जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळत आहे. सगळेच भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. याचवेळी मिताली राजच्या भूमिकेत असलेल्या तापसीची झलक पडद्यावर पाहायला मिळत आहे. यामध्ये मिताली राज बॅटिंग पॅड घालून आपली बॅट उचलून उभी राहत मैदानाच्या दिशेने दमदार पाऊले टाकताना दिसत आहे. यावेळी तिच्या पाठीवर मिताली ३ असे शब्द लिहलेले दिसत आहेत.
या दमदार मांडणीने हा चित्रपट खूपच आकर्षक दिसत आहे. तापसी पन्नूने मिताली राजची वठवलेली हुबेहुब भूमिका आणि दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट जोरदार छाप पाडणार असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री तापसी पन्नूनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा टीझर शेअर केला आहे.  तापसीने हा टीझर शेअर करत, “सभ्य लोकांच्या या खेळात तिने पून्हा इतिहास लिहण्याची प्रथा नाही सुरू ठेवली तर तिने स्वतःची कथा निर्माण केली.” असा प्रेरणादायी कॅप्शन दिला आहे. यावर अभिनेत्री रकुलनेही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. चित्रपटात तापसी पन्नूसह अभिनेता विजय राज, अजीत अंधेरे, प्रिया एवन यांनीही भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनातील संघर्षावर आधारित आहे. त्याचबरोबर महिला संघाच्या जडणघडणीवरही चित्रपटात प्रकाश टाकला आहे. मिताली राजने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले पण तिने कधीही हार न मानता यशाचे शिखर गाठले आहे.

हेही वाचा –

Latest Post