Friday, December 1, 2023

खऱ्या मैत्रीचं नातं उलगडणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’ रुपेरी पडद्यावर; चित्रपटाचे पोस्टर समोर

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस मराठी‘. या कार्यक्रमाचे चार ही सीझन चांगलेच गाजले. ‘बिग बॉस’ गाजवलेली मंडळी आता ‘दिल दोस्ती दिवानगी’ करताना दिसणार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका लीलया साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी, अभिनेत्री सुरेखा कुडची, ग्लॅमरस अभिनेत्री वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर यांचा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा मराठी चित्रपट 6 ऑक्टॉबेरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा तर सुरेखा कुडची मिस मेरी या कॅथलिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत, तर स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रियाच्या ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे. मैत्री, प्रेम त्यानंतरचं आयुष्य यांत अडकलेल्या प्रेमवीरांची कथा ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटात मांडण्यात आली आहे.

या प्रेमकथेच्या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा हा चित्रपट असून प्रेक्षक यात नक्कीच गुंतून जातील असा विश्वास हे चौघंही व्यक्त करतात. या चौघांसोबत कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकार ही चित्रपटात दिसणार आहेत.

‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti deewangi) चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा, इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत. ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा मल्टीस्टारर चित्रपट 6 ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय. (The film Dil Dosti Diwanagi which unfolds the relationship of true friendship is on the silver screen)

अधिक वाचा-
रश्मीसोबत भांडण, तर शहनाझशी प्रेम; चांगलीच चर्चेत राहिली सिद्धार्थ शुक्लाची लव्ह लाईफ
शाहरूख खानला भेटण्यासाठी फॅनने केले ‘असे’ कृत्य; अभिनेता म्हणाला, ‘मला आधी…’

हे देखील वाचा