मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील विवादित मात्र प्रतिभावान अभिनेते असे ओळख असलेले अभिनेते म्हणजे किरण माने. अनेक मालिकांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक सर्वांना दाखवली. मात्र मुलगी झाली हो या मालिकेदरम्यान त्यांचा झालेला वाद चांगलाच गाजला. पुढे मराठी बिग बॉसमुळे तर त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. किरण माने आता एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. किरण माने हे सोशल मीडियावर देखील कमालीचे सक्रिय आहे. ते सतत विविध पोस्ट शेअर करत लाइमलाईट्मधे येत असतात.
आता पुन्हा एकदा किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या ‘प्रिटी वुमन’बद्दल सांगितले आहे. किरण माने यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले, ““तू सेक्सी आहेस असं तुला वाटतं का?” ज्यूलीया राॅबर्टसला त्या मुलाखत घेणार्यानं विचारलं… मी सरसावून टीव्हीपुढं बसलो… मनातल्या मनात म्हटलं ‘येड्या कुणाला विचारतोयस कळतंय का?’..पण त्यावर तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून भिरकीटच झालो ! ती म्हणाली, “मी माणूस म्हणून चांगली आहे-संवेदनशील आहे.. आणि असं असणं माझ्या दृष्टीनं सेक्सी असण्यापेक्षा खूपच महत्त्वाचं आहे. कारण शरीर हे सुकतं. थकतं. ‘सेक्सीपण’ हे प्रत्येकाचं पर्सनल मत असतं. ते वेगळं असू शकतं.”
View this post on Instagram
या ‘प्रिटी वूमन’चा आधीपासून जबरा फॅन होतोच, पण ही मुलाखत ऐकल्यानंतर आणि तिची बायोग्राफी वाचल्यानंतर तर आणखीनच फॅन झालो. ज्या मुलीला अभिनयक्षेत्रात मनापासुन,दीर्घकाळ आणि गांभीर्यानं करीयर करायचंय तिनं ज्युलीयाचा संघर्ष अभ्यासावा असा आहे. नाट्यवेडासाठी नाटकमंडळी चालवणार्या तिच्या वडिलांकडे पैशांची कायम चणचण. गरीबीचं टोक सांगताना ती म्हणते, माझ्या जन्मानंतर हाॅस्पीटलचं बील भरायला वडिलांकडं पैसे नव्हते ! स्ट्रगलच्या काळात कधी चप्पलच्या दुकानात सेल्सगर्ल तर कधी हाॅटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करावं लागलं. चार पैसे मिळतात म्हणून ‘क्राईम स्टोरी’ सारख्या टीव्ही मालिकेत काम करणार्या या मुलीनं नंतर ऑस्कर अवाॅर्डपर्यन्त मजल मारली. एका सिनेमासाठी वीस मिलीयन डाॅलर्स घेणारी ती पहिली अभिनेत्री ठरली. हा प्रवास कुणालाही प्रेरणा देईल असाच आहे. यासाठीच ‘मोनालिसा स्माईल’वाल्या ‘अमेरीका’ज स्विटहार्ट’ला माझ्या काळजात कायम एक वेगळं स्थान आहे !
पयल्यांदा लंडनला गेलोवतो तेव्हा मादाम तुसादमध्ये पाऊल ठेवल्यापासुन तिला शोधत होतो…सापडल्या-सापडल्या आमच्या भेटीची आठवण कॅमेर्यात ‘खच्च्चॅक’ करून कैद केली.. ती एक जुनी आठवण आज फेसबुकनं वर काढली…”
किरण माने हे माझ्या नवऱ्याची बायको, मुलगी झाली हो, मराठी बिग बॉस मध्ये झळकले आहेत. आता लवकरच ते आगामी ‘सिंधुताई…माझी माई’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहे.