शिल्पाला आजही खावी लागतात सासू- सासऱ्यांची बोलणी; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सांगितली व्यथा


बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पाने तिच्या फिटनेसने सर्वांनाच वेड लावले आहे. चाळीशी पार करूनही शिल्पा आज पंचविशीतली तरुणी दिसते. शिल्पा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. मागील बऱ्याच काळापासून शिल्पा मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मात्र, असे असूनही ती सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन या माध्यमातून ती सतत प्रेक्षकांसमोर येत असते. सध्या शिल्पा छोट्या पडद्यावरील ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका निभावताना दिसत आहे.

या शोमध्ये प्रत्येक आठवड्यात काही खास पाहुणे हजेरी लावताना दिसतात. नुकतेच या शोमध्ये जेष्ठ अभिनेते अनु कपूर हे खास पाहुणे म्हणून आले होते. या आठवड्याची ‘ब्लॅक एँड व्हाईट’ ही थीम होती. यावरूनच स्पर्धकांनी आणि त्यांच्या गुरूंनी आपल्या सिनेसृष्टीतील जुना काळ आपल्या धडाकेबाज सादरीकरणातून सर्वांसमोर उभा केला. सर्वांचे सादरीकरण चालू असताना फ्लोरिना आणि तिचा सुपर गुरू तुषार शेट्टीने चार्ली चॅप्लिन स्टाईलमध्ये एक डान्स सादर केला. हा डान्स सर्व परीक्षकांना आवडला. मात्र, गीता कपूरला हा डान्स एवढा आवडला नाही. याऊलट शिल्पाला त्यांचा डान्स खूप आवडला. त्यांचे कौतुक करताना शिल्पा म्हणाली, “कधी कधी मला असे वाटते की, आपण या मुलांना खूप जास्त जज करतो. आपल्याला हे विसरून चालणार नाही की, मुलं खूपच कमी वेळात हे डान्स तयार करतात.”

शिल्पा पुढे म्हणाली, “बऱ्याचदा माझे सासू- सासरे, आई मला या गोष्टीवरुन खूप रागवतात. कारण मुलांच्या अनेक गोष्टी खूप चांगल्या असतात. मात्र, आपण त्यात काही ना काही चुका काढतच असतो. मला अशावेळी अनेकदा घरातले सांगतात की, किती चांगले केले मुलांनी, तरीही तू का नाव ठेवते.” याच शो चे दुसरे जज असणाऱ्या अनुराग बासू यांनी म्हटले की, “माझ्या मुली देखील मला अनेकदा विचारतात. तुम्हाला डान्समधील काय समजते की, तुम्ही मुलांना सल्ले देतात?”

शिल्पा लवकरच आपल्याला ‘हंगामा २’ सिनेमात दिसणार आहे. ‘हंगामा २’ या चित्रपटात शिल्पा आणि परेश रावल यांच्यासोबत राजपाल यादव, मीझान जाफरी, प्रणिता सुभाष हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले आहे. हा चित्रपट २३ जुलै रोजी डिझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीने कमबॅक केले आहे. २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात शिल्पा शेवटची दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.