Thursday, April 25, 2024

मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या युजर्सला सोना मोहपात्राचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘आपल्या देशात मूर्खता खूप आहे’

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे राज कौशल यांचे निधन झाले. राज कौशलच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये मंदिरा पार्थिव उचलताना आणि अंतिम संस्कारामधील इतर विधी देखील पार पाडताना दिसून आली होती. सामान्यपणे आपल्याकडे हे सर्व विधी करण्याचा अधिकार पुरुषांकडे असतो. मात्र, मंदिराने अनेक वर्षांची ही रीत मोडत स्वतः राज यांच्या अंतिम संस्काराचे सर्व विधी पार पाडले. तिच्या मोठ्या पावलामुळे सोशल मीडियाच्या दुनियेत तिचे कौतुकही होत आहे, तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

या सर्व प्रकरणामध्ये गायिका सोना मोहपात्रा हिने मंदिरा बेदीची बाजू घेत ट्रोलर्सवर चांगलाच निशाणा साधला आहे. मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना सोना मोहपात्राने तिच्या भाषेत सणसणीत उत्तर सुद्धा दिले आहे.

अभिनेत्री मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या अशाच ट्रोलर्सना सोना मोहपात्राने ट्वीट करत चांगलेच उत्तर देत खडसावले आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, “काही लोक अजूनही मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी परिधान केलेल्या कपड्यांवरून ट्रोल करत आहेत. याचे जास्त आश्चर्य वाटत नाही. शेवटी आपल्या देशात इतर गोष्टींपेक्षा मुर्खता मोठ्या प्रमाणात आहे.” मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कारवेळी परिधान केलेल्या व्हाईट टी-शर्ट आणि जीन्सवरून सुद्धा तिला ट्रोल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे बुधवारी (३० जून) सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने ४९ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला. त्यांच्यावर बुधवारी शिवाजी ग्राऊंड स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेता रोनित रॉय आणि त्याची पत्नी नीलम सिंग, मानसी जोशी रॉय, समीर सोनी आणि आशिष चौधरीसारखे कलाकार सामील झाले होते. त्यांच्यावर अंतिम संस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडन, मौनी रॉय, रोहित रॉय, आदिती गोवित्रीकर, विद्या मालवडे आणि सुलेमान मर्चंट हे मंदिरा बेदीचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते.

लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून नावारूपाला आलेल्या राज यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. सुरुवातीच्या काही काळात त्यांनी मुकुल आनंद, सुभाष घई यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. त्यांनी १९९८ साली स्वत:ची जाहिरात कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आजवर ८०० जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री मंदिरा बेदीशी १९९९ साली राज विवाहबद्ध झाले. त्यांना एक मुलगा असून गेल्या वर्षी या दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा