Sunday, April 28, 2024

‘भाभीजी घर पर है’ला मिळाली नवीन अनिता भाभी, ‘या’ अभिनेत्रीने घेतली नेहा पेंडसेची जागा

‘भाभीजी घर पर है’ ही मालिका टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमात सादर होत असलेल्या तुफान कॉमेडीने प्रत्येकजण पोट धरून हसत असतो. कार्यक्रमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण करत असते. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा नेहमीच पाहायला मिळते. आता या कार्यक्रमात अनिता भाभीच्या भूमिकेत नवीन अभिनेत्री येणार आहे ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

टीव्ही मालिका क्षेत्रात ‘भाभीजी घर पर है’ या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा कार्यक्रम गेली सात वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येकजण या कार्यक्रमाचा चाहता असल्याचे दिसून येते. कार्यक्रमातील तुफान कॉमेडी प्रत्येकाचे मन जिंकले आहे. यामधील अंगूरी भाभी, अनिता भाभी, मनमोहन तिवारी, विभूती नारायण मिश्रा सह अनेक कलाकार आहेत, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा अनिता भाभीच्या भूमिकेत असलेल्या नेहा पेंडसेने (Neha Pendse) सगळ्यांचीच मने जिंकली होती. मात्र आता तिने या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच तिच्या जागी येणार्‍या नवीन अनिता भाभीचे नावसुद्धा समोर आले आहे.

समोर आलेल्या बातमीनुसार, ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत आता अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव (Vidisha Shriwastav) झळकणार आहे. विदिशा याआधी ‘काशीबाई बल्लाळ’ कार्यक्रमात शिवबाईच्या भूमिकेत दिसून आली होती. आता ती भाभीजी घर पर है मालिकेत काम करताना दिसणार आहे. याबाबतचा खुलासा विदिशाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केला आहे. या भूमिकेसाठी आनंद व्यक्त करताना ही माझ्यासाठी सर्वात मोठी संधी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

विदिशा श्रीवास्तवने याबद्दल बोलताना सांगितले की, “माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. मी या भूमिकेला माझ्या पद्धतीने निभावणार आहे. हा कॉमेडी कार्यक्रम असला तरी मी न घाबरता या कार्यक्रमात काम करणार आहे.” दरम्यान या कार्यक्रमात मागच्या वर्षी सौम्या टंडनच्या जागी नेहा पेंडसेने भूमिका साकारली होती. सौम्याने या कार्यक्रमात तब्बल पाच वर्ष अनिता भाभीची भूमिका साकारली असून, तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी सुद्धा भरभरुन प्रतिसाद दिला होता.

हेही वाचा – 

हे देखील वाचा