करिअरच्या सुरुवातीला विद्या बालनला करावा लागला रिजेक्शनचा सामना; म्हणाली, ‘नकार मिळाल्यावर रडत रडत…’


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आपल्याला वाटतो तितका सोप्पा नव्हता. आज ते ज्या ठिकाणी पोहोचले आहेत, ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. त्यांनी त्यांच्या कामाने या जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. यातील अशीच एक अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. चित्रपटसृष्टीत तिची एक वेगळीच ओळख आहे. परंतु हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोप्पा नव्हता. ( Vidya Balan got lot of rejection in the beginning of her career)

विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी विद्या बालनने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला आहे. तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल बोलताना तिने सांगितले की, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिला अनेक नकार झेलावे लागले होते. एक वेळ तर अशी होती, जेव्हा ती नैराश्यात गेली होती. तिला अनेक चित्रपटातून नकार येत होता. अनेकवेळा तर ती रडतच झोपत असे.

विद्या बालनने 1995 साली एकता कपूरच्या ‘हम पांच’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. या शोमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. पण तिला जास्त फायदा नाही झाला. विद्याने या मालिकेत काम केले होते, ही गोष्ट अनेकांना तेव्हा समजली, जेव्हा ती तिच्या करिअरमध्ये यशस्वी झाली. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील काम करण्यासाठी प्रयत्न केला होता,‌ पण तिला काही यश मिळाले नाही.

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात इंडस्ट्रीमध्ये जागा बनवण्यासाठी विद्याने खूप मेहनत घेतली आहे. तिने याबाबत बोलताना सांगितले की, “मला असे वाटते की, मी त्यावेळी खूप निराश होते. सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून खूप नकार आल्यानंतर मी घरी यायची आणि रडत रडत झोपायची. मला असे वाटायचे की, मी अभिनेत्री नाही बनू शकत. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठायची, तेव्हा सूर्याची किरणे माझ्या आयुष्यात एक नवीन प्रेरणा द्यायचे. प्रत्येक दिवशी मला असे वाटायचे की, मला काहीतरी नवीन करण्याची संधी आहे. त्यामुळे मला जे नकार भेटायचे त्यांना काही महत्त्व उरत नसायचे. या प्रवासात माझ्या आई- वडिलांनी मला खूप साथ दिली आहे. त्यासाठी मी त्यांची आभारी आहे.”

विद्या बालनच्या आयुष्यात एक प्रसंग असा आला होता, जेव्हा ती वाढत्या वजनामुळे बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. त्यावेळी तिला असे वाटत होते की, तिची बॉडी ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या आहे. जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिचे गुबगुबीत रूप पाहून सगळ्यांना आवडायचे. परंतु मोठी झाल्यावर तेच लोक तिला तिच्या वजनावरून बोलायला लागले. त्यामुळे तिला असे वाटायला लागले होते की, चित्रपटात काम न करण्याचे कारण कदाचित तिचे शरीर असू शकते. विद्याने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला हार्मोनल‌ इम्बॅलन्सचा त्रास आहे. त्यामुळे तिने कितीही डायटिंग किंवा वर्कआऊट केले तरी तिचे वजन कमी होत नाही. ज्यावेळी तिला या गोष्टीची जाणीव झाली की, ती एक कलाकार म्हणून तिचे आयुष्य जगत आहे. त्यानंतर तिने स्वतःचा सन्मान करायला आणि तिच्या बॉडीचा स्वीकार करायला सुरुवात केली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून खूप नकार आल्यानंतर ती परत कधी तिकडे गेली नाही. तिला 2003 मध्ये बंगाली चित्रपट ‘भालो थेको’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर 2005 मध्ये ‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान आणि संजय दत्त हे होते. यानंतर तिने परत कधीच मागे वळून पाहिले नाही.

तिने ‘कहाणी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘तुम्हारी सुलू’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.