×

फेसबुकला परत आणावा लागला आशुतोष राणा यांच्या शिव तांडव स्तोत्राचा व्हिडिओ, अभिनेते म्हणाले ‘हे केवळ विश्वासामुळे…’

आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांचा आवाज, भाषा आणि कविता यामुळे ते प्रसिद्ध आहेत. आशुतोष सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत.  त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या उत्सवात आशुतोष राणा यांच्या शिव तांडव स्तोत्राचा व्हिडिओ भक्तांच्या भेटीला आला. शिव तांडव स्तोत्राचे सरलीकरण सादर करणार्‍या या व्हिडिओचे खूप कौतुक होत असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण त्यानंतर अभिनेता आशुतोष राणा यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना माहिती दिली की, फेसबुकने हा व्हिडिओ त्याच्या टाइमलाइनवरून डिलीट केला आहे. याचा जितका आशुतोष राणा यांना राग आला, तितकाच त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांनीही राग आला. अशा परिस्थितीत चाहत्यांनी फेसबुकवर तीव्र संताप व्यक्त केला. पण आता अभिनेत्याचा हा व्हिडिओ त्याच्या टाइमलाइनवर परत आला आहे.

या व्हिडीओमध्ये आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी सोप्या भाषेत शिव तांडव स्तोत्र गायले आहे. पण फेसबुकच्या वॉलवरून त्याचा व्हिडिओ गायब झाल्याने आशुतोष राणा चांगलेच संतापले होते. ट्विटरवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, “शॉक्ड! फेसबुकने माझ्या एफबी टाइमलाइनवरून माझा शिव तांडव व्हिडिओ काढून टाकला आहे! @Metaindia असे का केले? त्यात ना कॉपीराईटचा मुद्दा आहे, ना हिंसाचाराचे प्रकरण आहे, ना ते एफबीच्या नियमांच्या विरोधात आहे.” त्याच्या या ट्वीटला हजारो रिट्वीट्स आले असून, फेसबुकच्या या कृतीवर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

आता आशुतोष राणा यांनी ट्वीट करून हा व्हिडिओ पुन्हा त्याच्या टाइमलाइनवर आल्याची माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी ट्वीट केले की, “फेसबुकने काढून टाकलेली महादेवाची स्तुती करणारी माझी पोस्ट माझ्या टाइमलाइनवर पुन्हा आली आहे. हे शक्य झाले ते केवळ तुमच्या मित्रांच्या, प्रियजनांच्या, शिवनुरागींच्या प्रभावामुळे, दबावामुळे, विश्वासामुळे, मी भारावून गेलो आहे. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.. नमस्कार, हर हर महादेव.”

शिवरात्रीला समोर आलेला हा व्हिडिओ आशुतोष राणा यांनी लेखक-कवी आलोक श्रीवास्तव यांच्या सहकार्याने तयार केला आहे. हा व्हिडिओ शिव तांडव स्तोत्राचे हिंदी व्हर्जन आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आशुतोष राणा लवकरच ‘पठाण’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘शमशेरा’मध्ये दिसणार आहेत. याशिवाय ते नुकताच ‘द ग्रेट इंडियन मर्डर’मध्ये दिसले होते. ज्याचे दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया आहेत.

हेही वाचा – 

Latest Post