Sunday, June 23, 2024

दिवंगत गायक केकेने गायल्या होत्या ३ हजारांहून अधिक जिंगल्स, पण हे असतंय तरी काय?

तारीख होती ३१ मे, २०२२ भारतीय संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला. अनेकांचा लाडका सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याच्या गाण्यांबद्दल तर चर्चा होतच होती, पण याचबरोबर त्याने ३५०० पेक्षाही अधिक जिंगल्ससाठी काम केल्याचीही चर्चा झाली, पण अनेकांना जिंगल्स म्हणजे नक्की असतं तरी काय? असा प्रश्नही पडला असेल, तर मित्रांनो तोच आपल्या या लेखाचा विषय आहे बरं का.

जिंगल्स म्हणजे काय या गोष्टीकडे वळण्याआधी ही गोष्ट सांगायलाच हवी की, केवळ केकेच नाही, तर भारतीत संगीत क्षेत्रासाठी योगदान दिलेल्या अनेकांच्या करियरमध्ये जिंगल्सचं मोठं महत्त्व आहे बरं. जसं केकेने ३५०० हून अधिक जिंगल्ससाठी काम केलं, तर एआर रेहमान यांनीही त्यांच्या करियरच्या सुरुवातीला जिंगल्ससाठी संगीत दिलेले आहे. इतकंच नाही तर, शिल्पा राव, शान, कुणाल गांजावाला, कैलाश खैर अशा संगीतातील दिग्गजांनीही त्यांच्या करियरमध्ये जिंगल्सवर काम केलंय.

हेही पाहा- पंधरा दिवसात चार अभिनेत्रींच्या आत्महत्येने हादरली फिल्म इंडस्ट्री

हा तर आता आपण वळूया जिंगल्स म्हणजे काय याकडे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर एखादी चार ओळींची किंवा छोटीशी कविता, जी समजायला, म्हणायला सोपी असेल. ज्यात यमक जुळणारे शब्द असतील. त्यालाच जिंगल्स म्हणतात. मंडळी तुम्ही टीव्हिवर, रेडीओवर एखाद्या प्रोडक्टची, ब्रँडची जाहीरात पाहाताना किंवा ऐकताना त्या प्रोडक्टचे किंवा ब्रँडचे नाव असलेली एखादं गाणंही ऐकलं असेल ना. असं विचारण्याचा उद्देश हाच की जिंगल्स साधारणत: सर्वात जास्त जाहीरातींसाठीच वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची जाहीरात करायची असेल, किंवा एखाद्या ब्रँडची जाहीरात करायची असेल, तर त्याचे नाव घेऊन एखादं छानसं छोटं गाणं तयार होतं. मग तेच गाण्याला वापरून एक छानशी जाहीरात तयार होते आणि लोकांपर्यंत पोहचवली जाते. हा आता जिंगल्स हा प्रकार फक्त जाहीरातींसाठीच वापरला जातो का तर नक्कीच नाही. अनेकदा राजकारणी आपला प्रचार करण्यासाठी, किंवा काही लोक एखादी महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी, सुचनांसाठी, जनजागृतीसाठी अशा अनेक कारणांसाठी जिंगल्स प्रभावी ठरतात. बऱ्याचदा मूळ गाण्यांना मॉडीफाय करूनही जिंगल्स तयार केले जातात बरं का.

आता जिंकल्स फायद्याचे किंवा प्रभावी का ठरतात, तर सोपं आहे. आता हाच विचार करा एखादं गाणं जेव्हा तुम्ही सारखं ऐकता तेव्हा ते तुमच्या तोंडात बसून जातं आणि बऱ्याच काळासाठी लक्षातही राहातं. जिंगल्सबदद्लही हाच प्रकार होतो. एकतर ते छोटंस गाणं असतं, तेही सोप्या भाषेत असतं, त्यामुळे त्याचे सूर आणि शब्द पटकत तोंडात रेंगाळतात आणि लक्षातही राहातात. तसंही असं म्हटलं जातं की संगीतात मोठी ताकद आहे. संगीताशी प्रत्येक व्यक्ती भावनिकरित्या गुंतत जातो. बऱ्याचदा एखादी गोष्ट लक्षात राहात नसेल, तर आपल्याला असही सांगितलं जातंच की ते गाणं तयार करून लक्षात ठेव. मग आता यावरूनच तुम्हाला कळालं असेल की जिंगल्स जाहीरातींसाठी प्रभावी प्रकार का आहे ते.

आता जिंगल्सला महत्त्व आलं कधी हा प्रश्न पडला असेलच तर असं बऱ्याच रिपोर्टमध्ये सांगितलं जाते की १९२६ मध्ये जनरल मिल्सने गव्हाच्या पदार्थाच्या नाश्त्याबद्दल एक गाणे गायले होते, ज्यानंतर त्यांच्या प्रोडक्टला बराच भाव मिळाला, त्यानंतर जिंगल्स हा प्रकार जाहीरांतीसाठी नवी दिशा ठरायला लागला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा