Thursday, June 13, 2024

ती’च्या संर्घषाची कहाणी घेऊन येतोय ‘वाय’ २४ जूनला होणार प्रदर्शित

लाल रंगाच्या ‘वाय’ अक्षरात, ग्लोव्हज घातलेल्या हातात एक वैद्यकीय शस्त्र असलेले पोस्टर काही दिवसांपूर्वी झळकले होते. हा चित्रपट वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, याचा अंदाज तेव्हाच आला. मात्र या विषयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच हातात हातात मशाल घेऊन लढतानाचा आक्रमक रुपातील मुक्ता बर्वेचा एक फोटो समोर आला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली. त्यानंतर झोपेतून उठणाऱ्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसला. त्यामुळे तर प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली. चित्रपटाबाबतीतील एक एक गोष्टी समोर येत असतानाच सिनेसृष्टीतील कलावंतांनी, राजकारण्यांनी, काही नामवंतांनी ‘वाय’ अक्षर असलेले पोस्टर हातात धरून या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. हळूहळू चित्रपटातील कलाकारही समोर येऊ लागले. आणि आता काळजाचा ठोका चुकवणारा ‘वाय’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांचे असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे.

यात मुक्ता बर्वे एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मन हेलावून टाकणारा हा चित्रपट आहे.

‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.’’ पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

हे देखील वाचा