Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड ‘सूर्यवंशम’ खरंच १०० वर्षे टीव्हीवर दाखवला जाणारंय का? जाणून घ्या फंडा

‘सूर्यवंशम’ खरंच १०० वर्षे टीव्हीवर दाखवला जाणारंय का? जाणून घ्या फंडा

आपण मोठ्या पडद्यावर म्हणजेच थिएटरमध्ये तर सिनेमे पाहतोच, पण सर्वसामान्य प्रेक्षकांचं टीव्ही हेच थिएटर असतं. आतापर्यंत सिनेरसिकांनी टीव्हीवर बरेच सिनेमे पाहिले असतील. त्यात एक सिनेमा असा आहे, जो आपण टीव्ही पाहताना हमखास एकदा दोनदा नाही, तर अनेकदा आपल्या डोळ्याखालून जातो म्हणजे जातोच. तो सिनेमा म्हणजेच २१ मे, १९९९ रोजी रिलीझ झालेला ‘सूर्यवंशम.’ मोठ्या पडद्यावर हा सिनेमा काही चाललाच नाही, पण या सिनेमानं छोटा पडदा मात्र चांगलाच गाजवला. हा सिनेमा प्रेक्षकांच्या नसानसात भिनलाय, असं म्हणलं तर हाईट होणार नाही. कारण, सिनेरसिकांना या सिनेमातील मुख्य भूमिकेत असणारे अमिताभ बच्चन, सौंदर्या, इतर कास्ट, तसेच कोणताही सीन असो किंवा डायलॉग, तसाच्या तसा तोंडपाठ आहे, पण मंडळी तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? की, हा सिनेमा सारखा सारखा सोनी मॅक्स चॅनेलवर प्रसारित का होतो? असं म्हणतात की, याच चॅनेलवर हा सिनेमा रिलीझ झाल्यापासून पुढील १०० वर्षे दिसणारंय. हे खरं आहे का? काय आहे यामागील तथ्य? जाणून घेऊया या लेखातून…

नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन यांचं फिल्मी करिअर डबघाईला आलं होतं. १९९२ मध्ये आलेल्या ‘खुदा गवाह’ या सिनेमानंतर त्यांच्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. त्यांनी आपलं प्रोडक्शन कंपनी सुरू केली, पण तिथंही अपयशंच मिळालं. आपल्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या ‘जन्मदाता’ सिनेमातून आपल्या करिअरची गाडी सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण सिनेमा काही चाललाच नाही. खूप पैसा लावला होता, तोही बुडाला. त्यानंतर आलेल्या ‘बडे मियां छोटे मियां’ आणि ‘मेजर साब’ या सिनेमांनी त्यांचं करिअर जरा सांभाळलं, पण कायापालट करण्यासारखं यश मिळवून देऊ शकले नाहीत.

त्यानंतर त्यांना ऑफर झाला ‘सूर्यवंशम’ सिनेमा. मंडळी हा सिनेमा साऊथचा रिमेक बरं का. १९९७ साली आलेल्या ‘सूर्यवम्सम’ या तमिळ सिनेमाचा हिंदी रिमेक म्हणजे ‘सूर्यवंशम.’ या सिनेमाचं दिग्दर्शन तेलुगू कमर्शियल सिनेमाचे यशस्वी दिग्दर्शक ईव्हीव्ही सत्यनारायण करत होते. सिनेमाचं युनिट आणि अधिकतर कलाकार साऊथ इंडस्ट्रीचे होते. सिनेमाची कहाणी वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित होती. अमिताभ यांनी सिनेमात वडील आणि मुलाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा जेव्हा त्यांना ऑफर झाला, तेव्हा त्यांचं वय होतं ५६ वर्षे. निर्मात्यांनी मुलाच्या भूमिकेसाठी कोणत्या तरी तरुण अभिनेत्याला घ्यायचं होतं. अभिषेक बच्चनचं नाव त्यावेळी यादीत टॉपला होतं. मात्र, कोणत्यातरी कारणावरून हे जमलंच नाही. त्यामुळे मुलाची भूमिकाही अमिताभ यांच्याच वाट्याला आली. अमिताभ यांना या सिनेमाकडून जरा जास्तच अपेक्षा होती. सोबतच ते साऊथ इंडस्ट्रीच्या कलाकारांसोबत काम करण्यासाठीही जास्तच उत्सुक होते. त्यांच्यानुसार, साऊथचे लोक हिंदी सिनेसृष्टीच्या तुलनेत जास्त शिस्तप्रिय असतात. बरं सिनेमा रिलीझ झाला, पण काही कमाल दाखवू शकला नाही. फिल्म क्रिटिक्सकडून संमिश्र रिव्ह्यू मिळाले. मात्र, प्रेक्षकांनी सिनेमाला स्वीकारलंच नाही.

खरी मजा तर पुढे आहे. १९९१ पूर्वी भारतीय टेलिव्हिजनवर एकच चॅनेल होता. दूरदर्शन. हा होता पब्लिक चॅनेल. ९०च्या दशकात नरसिम्हा राव यांच्या सरकारने प्रायव्हेटायजेशनची दारं खुली केली होती. यानंतर शर्यतीत उतरले प्रायव्हेट प्लेयर्स. प्रायव्हेटायजेशनमुळे २० जुलै, १९९९ रोजी एक नवीन चॅनेल सुरू झालं. त्याचं नाव होतं ‘सेट मॅक्स.’ पुढं जाऊन हे चॅनेल सोनी मॅक्स नावाने ओळखलं जाऊ लागलं, तर हा सूर्यवंशम सिनेमाही १९९९ साली रिलीझ झाला होता. याच चॅनेलवर पुढे ‘सूर्यवंशम’ सिनेमा दाखवला जाऊ लागला. चॅनेल आणि सिनेमाच्या अनोख्या प्रेमावर लाखो मिम्स बनले की, आयुष्यात काही पर्मनन्ट असो वा नसो. परंतु मॅक्सवर सूर्यवंशम पर्मनन्टच आहे.

आता ‘सूर्यवंशम’ सिनेमा टीव्हीवर इतक्या वेळा का येतो. असा प्रश्न सोशल मीडियावरील चाहत्यांना पडू लागला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इंटरनेटवर हजारो आर्टिकल्सचा पाऊस पडू लागला. या आर्टिकल्समध्ये असा दावा करण्यात आला की, सेट मॅक्सने १९९९ मध्ये पुढील १०० वर्षांसाठी ‘सूर्यवंशम’ या सिनेमाचे हक्क विकत घेतले होते. त्यामुळेच हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर दिसतो, पण खरं कारण काही औरच आहे. यामागील कारण जाणून घेण्यासाठी माध्यमांनी सेट मॅक्स चॅनेलशी संपर्क साधला. त्यावेळी चॅनेलने सांगितले की, काहीतरी प्रँक आहे. कारण, १०० वर्षांसाठी कोणतेही हक्क विकत घेतले नाहीत. प्रेक्षक तो सिनेमा तितक्या आवडीने पाहतात, त्यामुळेच ते सिनेमा दाखवतात.

असा आहे ‘सूर्यवंशम’ सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर दिसण्याचा फंडा. तुम्हाला माहिती आहे का? अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा अभिनेत्री रेखाशीही संबंधित आहे. खरं तर, सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणार्‍या जयसुधा आणि सौंदर्या या अभिनेत्रींना रेखा यांनीच आवाज दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
चाहत्यांना पोट दुखेपर्यंत हसवलं, पण काळाच्या ओघात मागे पडले ‘हे’ विनोदवीर
कोट्यवधी रुपयांचे मालक असूनही ‘या’ ५ अभिनेत्यांचे पाय मात्र जमिनीवरच, एक तर कमाईच्या ९० टक्के करतो दान
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत

हे देखील वाचा