बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. अशा अभिनेत्यांपैकीच एक म्हणजे सर्वांचे लाडके अभिनेते ‘अनुपम खेर’ होय. अनुपम यांनी ऐंशी, नव्वदचे दशक अक्षरश: गाजवले आहे. आज अनुपम आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी ३० पेक्षाही अधिक वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा केलीय. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया…
अनुपम यांचा जन्म ७ मार्च १९५५ ला शिमलामध्ये एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्म झाला होता. शालेय शिक्षण शिमलामध्ये घेऊन त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून पदवी संपादन केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. अनेक नाटकांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या. १९८२ साली त्यांनी ‘आगमन’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टींमध्ये पाऊल ठेवले. अगदी तरुण वयातच त्यांचे डोक्यावरील केस गेले होते.
याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी वयाच्या २९ व्या वर्षीच १९८४ मध्ये आलेल्या ‘सारांश’ सिनेमात मध्यमवर्गीय निवृत्त असणाऱ्या आणि आपल्या मुलाला गमावणाऱ्या व्यक्तीची भूमिका अप्रतिमरीत्या पडद्यावर उभी केली. त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना त्यावर्षीच्या फिल्मफेयर पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. अनुपम यांनी त्यांच्या करियरमध्ये अभिनयाच्या एका चौकटीत न अडकता गंभीर भूमिकांपासून, विनोदी, खलनायक आदी प्रकारच्या सर्व भूमिका साकारल्या.
दरवेळी त्यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना एक नवीन ‘अनुपम खेर’ची ओळख करून दिली. यात महत्वाचे म्हणजे त्यांनी कधीच मुख्य भूमिका साकारली नाही, सहाय्यक भूमिकांमधूनच त्यांनी त्यांच्या अभिनयाची ताकद सर्वाना दाखवून दिली. त्यांचा अभिनय अनेकदा सिनेमातील मुख्य नायकावर देखील भारी पडत असे.
त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ‘त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी खूप वाईट दिवस पहिले. अनेक महिने रेल्वे स्टेशनवर झोपून काढले. अनेकदा तर ते उपाशीच झोपत. मात्र, असे असूनही त्यांनी कधीच हार मानली नाही. ते सातत्याने प्रयत्न करत राहिले.’ याच प्रयत्नांमुळे आज अनुपम खेर हे अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जातात. अनुपम यांनी शिमलासारख्या छोट्या ठिकाणाहून येत संपूर्ण जगावर त्यांच्या प्रभावी अभिनयाचे गारुड पांघरले.
अनुपम यांनी फक्त हिंदीच नाही तर, अमेरिकन, ब्रिटिश आणि चायनीज सिनेमांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाने रसिकांना वेड लावले. त्यांचे या इंडस्ट्रीमधील चित्रपटदेखील प्रचंड हिट झाले, आणि त्यांच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले. बॉलिवूडमधील एक अभिनेता इतर देशातील मोठमोठ्या चित्रपटसृष्टी गाजवतो यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट नाही.
अनुपम यांनी बहुतकरून विनोदी भूमिका साकारल्या. मात्र, असे असले तरी त्यांनी अनेक सिनेमांमध्ये साकारलेले खलनायक आजही प्रेक्षकांच्या आठवणीत कायम आहेत. त्यांची कॉमेडीची अचूकता आणि कॉमेडीची समज यांमुळेच त्यांनी त्यांच्या विनोदी भूमिकांनी रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी त्यांना पाच फिल्मफेयर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सोबतच खलनायक साकारताना त्यांनी त्यांच्या अभिनयाचं कौशल्याची सर्व ताकद पणाला लावत आपल्या अभिनयातून क्रूर खलनायक अगदी हुबेहूब आणि लीलया साकारले.
अनुपम यांची कॅमेरासमोर अगदी सहज वावरण्याची कला भल्याभल्यांना वेड लावून जाते. त्यांनी अनेक सिनेमांमधून ‘वडील’ ही भूमिका साकारत ती भूमिका ते पडद्यावर अक्षरशः जगले आहेत. अगदी ‘सारांश’ मधील भावनिक आणि तितकेच मजबूत वडील ते अगदी धोनी सिनेमातील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी काळजी करणारे आणि सोबतच त्याला त्याच्या स्वप्नासाठी पाठिंबा देणारे सामान्य वडील. शिवाय रंग दे बसंती, वेक अप सिड, हम आपके हैं कौन आदी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांच्यातील वडिलांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू सर्वांसमोर आले.
अनुपम यांचे वैयक्तिक जीवनही खूप चढ उतारांनी भरलेले होते. त्यांनी मधुमालती यांच्यासोबत पहिले लग्न केले. मात्र, हे नाते कमी वेळातच संपुष्टात आले. मग त्यांनी दुसरे लग्न किरण खेर यांच्याशी केले. तसे पहिले तर किरण आणि अनुपम हे दोघेही सुरुवातीपासूनच चांगले मित्र होते. पुढे त्या दोघांनी वेगवेगळ्या जोदीरासोबत लग्न केले असले, तरी नशिबाने पुन्हा त्यांची भेट घालून दिली, आणि हे दोघे विवाह बंधनात अडकले. या दोघांना स्वत:ची मुलं नसली, तरी किरण यांचा पहिल्या पतीचा मुलगा सिकंदर त्यांच्यासोबतच राहतो. अनुपम यांनी सिकंदरला खूप प्रेम दिले आहे. सिकंदरने देखील अभिनयात नशीब आजमावले मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नाही.
अनुपम यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात भारत सरकारच्या सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्काराचा देखील समावेश आहे. शिवाय त्यांना त्यांच्या अभिनयासाठी दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांनी ‘ओम जय जगदीश’ या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल टाकले होते. मात्र, त्यांना यात यश मिळाले नाही.
‘कर्मा’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘दिल’, ‘सौदागर’, ‘१९४२ ए लव स्टोरी’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘हम आपके हैं कौन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मोहब्बतें’, ‘वीर झारा’, ‘रंग दे बसंती’, ‘खोसला का घोसला’,’ए वेडनस डे’, ‘स्पेशल २६’ आदी अनेक सिनेमांमधून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांसह, समीक्षकांनाही त्यांच्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पडले.
आज आहेत ४०० कोटींपेक्षा अधिक संपत्तीचे मालक
अनुपम यांनी आपल्या तरुण वयात खूप हालाकीची परिस्थिती पाहिली आहे. परंतु आज ते ४०० कोटींपेक्षाही अधिक संपत्तीचे मालक आहेत. अनुपम यांचे मुंबईत २ आलिशान बंगले आणि खूप साऱ्या गाड्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी शिमलामध्येही एक शानदार घर विकत घेतले आहे.
हेही नक्की वाचा–










