बॉलिवूडच्या सर्वात सुंदर आणि आयकॉनिक अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची भुरळ फक्त प्रेक्षकांनाच नाही, तर तिच्या सहकलाकारांनाही पडली. विशेषतः ९० च्या दशकात माधुरी आपल्या करिअरच्या शिखरावर असताना, तिच्यासोबत काम करणारे अनेक अभिनेते आजही तिच्या चार्म आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल खुलून बोलतात. अशाच एका मजेदार आणि चर्चेत असलेल्या किस्स्यामुळे अजय देवगन आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
अलीकडेच अजय देवगन (Ajay Devgn)आणि माधुरी दीक्षितचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगन ‘ये रास्ते हैं प्यार के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक मजेदार अनुभव सांगताना दिसतो. अजयने हसत-हसत सांगितले की, शूटिंगच्या ब्रेकमध्ये सर्व कलाकार एकत्र बसले होते. त्या वेळी तो ड्रिंक घेत होता आणि सिगरेट ओढत होता. इतक्यात माधुरी तिथे येऊन त्याच्या शेजारी बसली.
अजयच्या म्हणण्यानुसार, त्या क्षणी माधुरी इतकी सुंदर दिसत होती की तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या सौंदर्यामुळे तो इतका गुंग झाला की त्याच्या हातातली सिगरेट कोणत्या बाजूने आहे, याचंही भान राहिलं नाही. बोलता-बोलता त्याने सिगरेट उलटी धरली आणि थेट स्वतःलाच पोळून घेतलं. या घटनेमुळे त्याच्या चेहऱ्यावर जखम झाली, जी आजही त्याच्याकडे असल्याचं त्याने मजेत सांगितलं. अजयने गंमतीने म्हटलं, “हा निशाण आजही आहे… आणि हा माधुरीचा निशाण आहे.”
अजयचा हा किस्सा ऐकून माधुरी दीक्षितही जोरात हसली. तिने आश्चर्याने, “हे खरंच आहे का?” असं म्हणत प्रतिक्रिया दिली. दोघांमधील ही हलकी-फुलकी नोकझोंक आणि जुनी आठवण प्रेक्षकांना खूप भावली. चाहत्यांनी या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून, ९० च्या दशकातील बॉलिवूडच्या सेटवरील मैत्रीपूर्ण वातावरणाची आठवण करून देणारा हा किस्सा असल्याचं म्हटलं जात आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अजय देवगन लवकरच ‘दृश्यम ३’ आणि ‘शैतान २’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तर माधुरी दीक्षित नुकतीच ‘मिसेस देशपांडे’ या वेब सिरीजमधील तिच्या दमदार भूमिकेसाठी चर्चेत होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
वादग्रस्त अभिनेता, बहिणीच्या हिटनंतर स्वतःचा करियर फसला, आता पार्टींमध्ये चमकतो


