बॉर्डर 2’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील नवीन गाणं ‘जाते हुए लम्हों’ सोमवारी प्रदर्शित करण्यात आलं. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खास स्क्रीनिंगला अभिनेता अहान शेट्टी आपल्या वडिलांसोबत, ज्येष्ठ अभिनेता सुनील शेट्टी यांच्यासह उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान सुनील शेट्टी मुलाच्या संघर्षाबद्दल आणि चित्रपटाबद्दल बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले.
नेपोटिझमविषयी असलेल्या सर्वसाधारण समजुतीवर भाष्य करताना सुनील शेट्टी (Suniel Shetty)म्हणाले,“लोकांना वाटतं की सुनील शेट्टीचा मुलगा आहे म्हणजे त्याला सगळं सहज मिळालं असेल. पण सत्य वेगळं आहे. अहानने आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. तरीही मला आनंद आहे की त्याला ‘बॉर्डर’सारखा चित्रपट मिळाला. यापेक्षा मोठी संधी दुसरी असू शकत नाही.”
पुढे ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या चित्रपटाचा भाग होणं ही मोठी जबाबदारी असते. “मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की ही फक्त युनिफॉर्म घालण्याची गोष्ट नाही. देश आज प्रगतीसाठी ओळखला जातो, पण त्याचं धैर्य आपल्या सैनिकांमुळे आहे. जे काही करशील ते मनापासून कर,” असा सल्ला त्यांनी मुलाला दिला.
या कार्यक्रमात सुनील शेट्टी यांनी चित्रपटाच्या निर्माती निधी दत्ता यांचे विशेष आभार मानले. “निधी माझ्यासाठी लहान मुलीसारखी आहे. एवढ्या मोठ्या चित्रपटात अहानला संधी देणं हे मी आयुष्यभर विसरणार नाही,” असं ते म्हणाले. तसेच त्यांनी ‘बॉर्डर’च्या पहिल्या भागाचे दिग्दर्शक जेपी दत्ता यांचेही आभार व्यक्त केले.
अहान शेट्टीने 2021 मध्ये ‘तडप’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. आता तो सनी देओल आणि वरुण धवन यांच्यासोबत ‘बॉर्डर 2’ मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
गाण्याच्या लॉन्चवेळी मुंबईतील युनायटेड सर्व्हिसेस क्लब येथे नौदल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात नेव्हल बँडने सादरीकरण केलं, तर गायक रूप कुमार राठोड आणि विशाल मिश्रा यांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिला.
1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’मध्ये सुनील शेट्टी झळकले होते. आता त्याच चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्यांचा मुलगा अहान शेट्टी दिसणार आहे. ‘जाते हुए लम्हों’ हे गाणं मूळतः अनु मलिक आणि जावेद अख्तर यांचं असून, ‘बॉर्डर 2’ साठी मिथुन यांनी ते नव्याने साकारलं आहे. ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट टी-सीरिज आणि जेपी फिल्म्स यांच्या सहयोगाने तयार झाला असून, दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


