मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत रोहित शेट्टी थोडक्यात बचावले आहेत. गोळीबार झाला तेव्हा ते आपल्या घरातच उपस्थित होते.
रविवारी पहाटे मुंबईतील जुहू परिसरात रोहित शेट्टी (Rohit Shetty)यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सूत्रांनुसार, गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी आपल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर विश्रांती घेत होते. सुरुवातीला इमारतीतील सुरक्षा रक्षकांना मोठ्या आवाजामुळे फटाक्यांचा संशय आला, मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर प्रत्यक्षात गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेत पहाटे चार गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली जात आहे. रोहित शेट्टी राहत असलेल्या इमारतीबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी जलद कारवाई करत पुण्यातून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. दुपारी सुमारे २ वाजता या सर्वांना अटक करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
-
अमन आनंद मारोटे (२७), रा. मावळे आळी, कर्वेनगर
-
आदित्य ज्ञानेश्वर गायकी (१९), रा. गल्ली क्रमांक २, कर्वेनगर
-
सिद्धार्थ दीपक येनपुरे (२०), रा. धायरी, अम्रपाली बिल्डिंग
-
समर्थ शिवशरण पोमाजी (१८), रा. रायकर मळा, गुलमोहर सोसायटी, धायरी
-
स्वप्नील बंडू सकट (२३), रा. आरो वीर्य कामरी, पुणे
या सर्वांची सखोल चौकशी सुरू असून, हा हल्ला नेमका कोणाच्या आदेशावरून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आणि वॉन्टेड आरोपी शुभम लोनकर याचा धमकीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून, त्यांना आणि संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला उघड धमकी देण्यात आली आहे. या संदेशामुळे चित्रपटसृष्टीत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेवर रोहित शेट्टी यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे चाहते आणि सहकारी त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. पोलिसांकडून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी सुरू असून, लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


