Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड इक्का: सनी देओल–अक्षय खन्ना एकत्र येताच सोशल मीडियावर खळबळ; ‘तारा सिंग vs रहमान डकैत’ ट्रेंडमध्ये

इक्का: सनी देओल–अक्षय खन्ना एकत्र येताच सोशल मीडियावर खळबळ; ‘तारा सिंग vs रहमान डकैत’ ट्रेंडमध्ये

नेटफ्लिक्सने मंगळवारी मुंबईत आयोजित केलेल्या आपल्या भव्य कार्यक्रम ‘व्हॉट्स नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स’मध्ये 2026 साठी येणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्सची अधिकृत घोषणा केली. या इव्हेंटमध्ये चित्रपट आणि वेब सीरिजची दमदार व विविध लाइनअप सादर करण्यात आली, ज्यात लीगल ड्रामा, थ्रिलर, भावनिक कथा आणि मेनस्ट्रीम मनोरंजनाचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला. या सर्व घोषणांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला प्रोजेक्ट म्हणजे सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित लीगल ड्रामा ‘इक्का’.

‘इक्का’बाबत प्रचंड उत्सुकता असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सनी देओल (Sunny Deol)आणि अक्षय खन्ना यांची जोडी. तब्बल 29 वर्षांनंतर हे दोन्ही कलाकार पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याआधी ते 1997 साली आलेल्या आयकॉनिक वॉर फिल्म ‘बॉर्डर’मध्ये एकत्र झळकले होते. इतक्या वर्षांनंतर होणाऱ्या या रीयूनियनमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नेटफ्लिक्सने ‘इक्का’चा फर्स्ट लूक टीझर रिलीज करताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि इंटेन्स परफॉर्मन्सचं जोरदार कौतुक केलं जात आहे. एका युजरने कमेंट केली, “तारा सिंग आणि रहमान डकैतचा क्रॉसओव्हर!” तर दुसऱ्याने लिहिलं, “नेटफ्लिक्स सनी आणि अक्षयला एकत्र आणेल असं वाटलंच नव्हतं.” आणखी एका चाहत्याने म्हटलं, “सनी देओल विरुद्ध अक्षय खन्ना – जबरदस्त कोलॅब!”

अनेक युजर्सनी सनी देओलच्या बदलत्या करिअर ग्राफचंही कौतुक केलं आहे. फक्त अ‍ॅक्शन हिरो अशी ओळख न ठेवता सनी आता वेगवेगळे आणि आव्हानात्मक रोल्स स्वीकारत असल्याचं फॅन्सचं मत आहे. एका युजरने लिहिलं, “सनी देओल नव्या भूमिका साकारताना पाहणं खूप फ्रेश वाटतंय.”

टीझर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिलं, “निर्दोष सिद्ध होईपर्यंत दोषी. पण कायदा सत्य शोधू शकेल का? प्रसिद्ध डिफेन्स लॉयर सिकंदर मेहरा आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा नैतिक निर्णय घेतो.” या कॅप्शनवरून स्पष्ट होतं की ‘इक्का’ हा केवळ कोर्टरूम ड्रामा नसून नैतिकता, सत्य आणि मानवी नात्यांवर आधारित एक सखोल कथा आहे.

या चित्रपटात सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत तिलोत्तमा शोम, दीया मिर्झा, संजीदा शेख आणि ज्योती मुखर्जी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. कथा एका टॉप डिफेन्स लॉयरभोवती फिरते, ज्याला अशा व्यक्तीचा खटला लढावा लागतो, ज्याचा संबंध त्याच्या वेदनादायक भूतकाळाशी असतो. कुटुंबाला वाचवण्यासाठी तो आपल्या प्रामाणिकपणालाही पणाला लावतो, अशी ही भावनिक आणि थरारक कहाणी आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सनी देओल अलीकडेच वॉर ड्रामा बॉर्डर ‘2’मध्ये लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग कलेरच्या भूमिकेत दिसले होते. तर अक्षय खन्ना आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर पार्ट 1’मधील रहमान डकैतच्या भूमिकेमुळे चर्चेत होते. आता ‘इक्का’च्या माध्यमातून हे दोघेही प्रेक्षकांना पुन्हा एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

धुरंधरने आमिर-शाहरुख आणि सनी देओलच्या चित्रपटांना दिली मात, सिक्वेलआधीच केला मोठा पराक्रम

हे देखील वाचा