Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड हैप्पी बर्थडे मस्तानी: जाणून घेऊया मॉडेलिंग ते सुपरहिट अभिनेत्री होण्याचा दीपिकाचा प्रवास

हैप्पी बर्थडे मस्तानी: जाणून घेऊया मॉडेलिंग ते सुपरहिट अभिनेत्री होण्याचा दीपिकाचा प्रवास

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. ५ जानेवारी १९८६ ला डेन्मार्क मधील कोपनहेगन येथे दीपिकाचा जन्म झाला. दीपिकाचे वडील हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण हे असून आई उज्वला ट्रॅव्हल एजन्ट आहेत. दीपिकाला अनिशा नावाची एक लहान बहीण असून ती प्रसिद्ध गोल्फर आहे. दीपिकाचे संपूर्ण बालपण बेंगळुरू मधेच गेले. दीपिकाने मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळले होते.

वयाच्या आठव्या वर्षी दीपिकाने पहिल्यांदा एका जाहिरातीत काम केले. कदाचित तेव्हाच तिच्यावर या ग्लॅमर इंडस्ट्रीचा प्रभाव पडला आणि ती हळूहळू या क्षेत्राकडे वळू लागली. २००४ सालापासून तिने पूर्णवेळ मॉडेलिंग करायला सुरुवात केली. जेव्हा दीपिका या इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हापासून आजपर्यंत तिच्यात खूप मोठा फरक पडला आहे.

तिने सुरुवातीला लिरिल या साबणासाठी जाहिरात केली. ह्या जाहिरातीमुळे दीपिकाला बऱ्यापैकी फायदा झाला. त्यानंतर २००५ साली दीपिकाने फॅशन डिझायनर सुमित वर्मा याच्यासाठी रॅम्पवॉक केले. २००६ साली तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूट केले याचा फायदा तिला खूप झाला, कारण याचमुळे तिला हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’ अल्बममध्ये काम करायला मिळाले.

फराह खानची नजर तिच्यावर पडली आणि तिने दीपिकाला ‘ओम शांती ओम’ साठी शाहरुखसोबत मुख्य भूमिकेसाठी निवडले. या चित्रपटाने दीपिकाला एका रात्रीत स्टार बनवले. आज दीपिका बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिने बचना ऐ हसीनो, लव्ह आज कल, आरक्षण, कॉकटेल, चेन्नई एक्सप्रेस, गोलियों की रासलीला राम-लीला, बाजीराव मस्तानी, पिकू, पद्मावत आदी हिट सिनेमात काम केले आहे.

२०१७ साली दीपिकाने तिच्या अभिनयाची चुणूक बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमधेही दाखवत विन डिझेल या अभिनेत्यासोबत XXX नावाचा हॉलिवूड सिनेमा केला.

दिपीकाने २०१८ साली अभिनेता रणवीर सिंग सोबत इटलीमध्ये लग्न केले. लग्नाआधी अनेक महिने ती दोघे रिलेशनशिप मध्ये होते.

सध्या दीपिका बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्याकडे आता अनेक मोठे चित्रपट असून लवकरच ती कबीर खानच्या ८३ सिनेमात दिसणार आहे.

हे देखील वाचा