Thursday, March 28, 2024

स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

अत्यंत भारदस्त व्यक्तिमत्व, नजरेच्या एका कटाक्षाने शत्रूला घामाघूम करणारे, ज्यांचे शब्द ऐकून असे वाटते जणू माता सरस्वती अवतरली आहे. असे सगळे वर्णन ऐकले की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अमोल कोल्हे (Amol kolhe) यांचे छत्रपती वेशातील रूप. अभिनेते अमोल कोल्हे यांनी टेलिव्हिजनवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. केवळ अभिनयचं नव्हे, तर बाकी अनेक क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्याबाबत आज जनतेच्या मनात एक आदरणीय स्थान निर्माण झाले आहे. अमोल कोल्हे शनिवारी (18 सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाणून घाऊया त्यांची आतापर्यंतची कारकीर्द…

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म 18 सप्टेंबर, 1980 रोजी पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी 12वी पर्यंतचे शिक्षण घेतले. 10वी आणि 12वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असल्यापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यांच्या मोकळ्या वेळात ते नाटकात देखील काम करायचे. वैद्यकीय शिक्षण घेऊनही त्यांचे मन काही त्या क्षेत्रात रमले नाही आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. (Actor Amol kolhe celebrate his birthday let’s know about his life)

अमोल कोल्हे यांना 2008साली स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीलाच त्यांना महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. खरं तर, ही त्यांच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती. कारण छत्रपती शिवाजी महाराज साकारणे ही खूप मोठी आणि जबाबदारीची गोष्ट होती. महाराजांची भूमिका साकारण्यासाठी त्यांचे अनेक गुण आत्मसात करावे लागतात, पण या सगळ्या कसोटीला खरे उतरून त्यांनी ही भूमिका निभावली आणि प्रेक्षकांच्या मनात कधीही पुसली न जाणारी त्यांची प्रतिमा त्यांनी तयार केली. या एकाच मालिकेने त्यांना भरभरून प्रसिद्धी दिली.

यानंतर त्यांना अनेक मालिका आणि चित्रपटात काम मिळाले. त्यांनी ‘मी अमृता बोलतीये’, ‘मुलगा’, ‘आघात’, ‘ऑन ड्युटी 24 तास’, ‘राजमाता जिजाऊ’, ‘साहेब, ‘रंगकर्मी’, ‘अरे आवाज कोणाचा’, ‘रमामाधव’, ‘मराठी टायगर’, ‘बोला अलक निरंजन’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ते सध्या सोनी मराठीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत काम करत आहेत. अमोल कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतात. स्वराज्याचे दूसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी स्वतःचे घर विकून ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेची निर्मिती केली‌ आणि संभाजीराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आणला.

अमोल कोल्हे यांनी2007 मध्ये अश्विनी कोल्हे यांच्याशी लग्न केले होते. त्या देखील डॉक्टर आहेत. त्या सध्या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यांना आध्या कोल्हे आणि रुद्र कोल्हे ही दोन मुले आहेत. त्यांची मुलगी आध्या हिने देखील बालकलाकार म्हणून काम केले आहे. तिने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत हंबीरराव मोहिते यांच्या मुलीची भूमिका निभावली आहे.

अमोल कोल्हे हे राजकारणात देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते. ते 2016साली पुण्याचे संपर्क प्रमुख होते. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यांची शिरूर मतदार संघातून खासदार पदी निवड झाली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही नक्की वाचा-
‘हँडसम हंक’ कुणाल कपूर आणि बच्चन घराण्यात नक्की नातं आहे तरी काय?
‘मजहब इंसानोंके लिए बनता है…’, ओम पुरींचे ते डायलॉग, जे आजही चाहत्यांच्या मनावर करताहेत राज्य

हे देखील वाचा