Monday, July 15, 2024

धनुष अन् ऐश्वर्याच्या कुटुंबानं घाईघाईत का लावलं होतं दोघांचं लग्न? वाचा त्यांची लव्हस्टोरी

सिनेसृष्टीत अनेक नाती बनतात आणि तुटतात. अनेकदा काही नात्यांची चर्चा होत नाही, पण काही नाती अशी असतात, ज्यांची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. अशातच सोमवारी (१७ जानेवारी) सुपरस्टार धनुष आणि ‘थलायवा’ रजनीकांत यांची लाडकी लेक ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोट घेत असल्याचं सोशल मीडिया पोस्टमधून जाहीर केलं. त्यांनी तब्बल १८ वर्षांनंतर हा मोठा निर्णय घेतला. दोघांनीही सांगितलं की, त्यांना एकमेकांना अजून चांगलं समजून घेण्यासाठी वेळ हवा आहे. इतक्या वर्षांचं नातं संपवणाऱ्या धनुष आणि ऐश्वर्या यांची भेट झाली तरी कशी होती?, असाही प्रश्न आता तुम्हाला पडेल. चला तर जाणून घेऊया घटस्फोटाचा इतका मोठा निर्णय घेणाऱ्या धनुष आणि ऐश्वर्या यांची लव्हस्टोरी…

धनुष आणि ऐश्वर्याच्या लव्हस्टोरीकडे वळण्यापूर्वी आपण त्यांच्या पोस्टबद्दल जाणून घेऊया. नेमकं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्याने (Aishwarya Rajinikanth) सारखीच पोस्ट शेअर केली आहे. धनुषनं त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय की, “१८ वर्षांचा सहवास, मैत्री, प्रेम, पालकत्व आणि एकमेकांचा आधार. सोबत प्रगती, समजूतदारपणा, आणि एकमेकांशी जुळवून घेणं आणि त्यातून निर्माण होणारा समंजसपणा, असं हे आमचं नातं होतं. आज आम्ही अशा जागेवर उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वतःला शोध घेण्याचा प्रयत्न करू. कृपया आमच्या निर्णयाचा तुम्ही मान ठेवा आणि आम्हा दोघांनाही यातून बाहेर पडण्यासाठी थोडासा वेळ द्या.” अशीच पोस्ट ऐश्वर्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती.

अशी झाली होती पहिली भेट
ऐश्वर्या आणि धनुषची भेट एका शोदरम्यान झाली होती. एका मुलाखतीत धनुषने सांगितले होते की, “माझा सिनेमा ‘कधल कोंडेन’ या सिनेमाचा पहिला शो होता. आम्ही सर्व कुटुंबासोबत सिनेमा पाहायला गेलो होतो. जेव्हा सिनेमा संपला, तेव्हा चित्रपटगृहाच्या मालकाने रजनीकांत सरांची मुलगी ऐश्वर्या आणि सौंदर्या यांच्याशी आमची ओळख करून दिली. आम्ही फक्त एकमेकांना हॅलो म्हटले आणि निघून गेलो. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने मला एक बुके पाठवला आणि म्हटले की, चांगलं काम केलंस. संपर्कात राहा. ती जे काही म्हणाली, ते मी खूपच गांभीर्यानं घेतलं.”

छापल्या गेल्या होत्या अफेरच्या बातम्या
हळूहळू दोघांची भेट होऊ लागली. धनुषची बहीण ऐश्वर्याची चांगली मैत्रीण होती. दोघांच्या भेटीनंतर जेव्हा अफेरच्या बातम्या छापू लागल्या, तेव्हा त्यांच्या कुटुंबाने विचारविनिमय करून घाईघाईत त्यांचं लग्न लावून देण्याची घोषणा केली. माध्यमात छापल्या जात असलेल्या अफेअरच्या बातम्यांमुळे चिंतेत होऊन दोन्ही कुटुंबांनी घाईघाईत लग्नाचा निर्णय घेतला होता.

लग्नात केला होता पाण्यासारखा पैसा खर्च
दोघांचेही लग्न १८ नोव्हेंबर, २००४ रोजी रजनीकांत यांच्या घरी धुमधडाक्यात झाले होते. लग्न पारंपारिक तमिळ रीतिरिवाजांनुसार झाले होते. या दोघांच्या लग्नात सुपरस्टार अमिताभ बच्चन, जया बच्चन, हेमा मालिनी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. आता त्यांच्या लग्नात किती कोटी रुपये खर्च करण्यात आले असतील, याचा अंदाज लावलेलाच बरा.

सुरक्षेच्या दृष्टीने घेतला होता ‘हा’ निर्णय
दोघेही सिनेसृष्टीतल्या मोठ्या कुटुंबातील असल्यामुळे त्यांचं लग्न तर धडाक्यात पार पडणारंच होतं. विशेष म्हणजे, त्यांच्या लग्नाचं जेव्हा रिसेप्शन ठेवण्यात आलं, तेव्हा सुरक्षा लक्षात घेत पाहुण्यांना कार्ड दाखवूनच आत येण्याची विनंती करण्यात आली होती.

हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला

दोन मुलांचे आई-वडील आहेत धनुष आणि ऐश्वर्या
धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न जेव्हा झाले, तेव्हा धनुषचं वय २१ वर्षे होतं, तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती. २३ वर्षे वय होण्यापूर्वीच लग्न व्हावे अशी धनुषची इच्छा होती. हे दोघे २ मुलांचे आई-वडील आहेत. त्यांच्या मुलांचे नाव यात्रा आणि लिंगा आहे. लग्नानंतर सुखी वैवाहिक आयुष्य जगत होते, पण आता या दोघांचेही रस्ते वेगळे झाले आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा