Tuesday, April 16, 2024

‘कुंदन’ बनत बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या धनुषने केवळ सहा मिनिटात लिहिले होते ‘कोलावेरी डी’; वाचा त्याचा सिनेप्रवास

आज सर्व प्रादेशिक सिनेसृष्टी बॉलिवूडला तोडीस तोड टक्कर देत आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधे डोकावले तर आपल्याला लक्षात येईल की, काही बाबतीत तर साऊथ इंडस्ट्री बॉलिवूडपेक्षाही दोन पावलं पुढे आहे. मात्र शेवटी बॉलिवूड कलाकार हे विरुद लावण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. म्हणूनच अनेक प्रादेशिक इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकरांना आपल्याला हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळावे अशी इच्छा असते. हिंदी स्टार्सना टॉलिवूडची बऱ्याचदा जशी भुरळ पडते, तशीच भुरळ साऊथ कलाकरांना देखील बॉलिवूडची पडते. त्यामुळे अनेक मोठे कलाकार जे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये शिखरावर आहेत, ते हिंदी चित्रपट करताना दिसतात. मग यात रजनीकांत, (rajinikanth) कमल हसन पासून ते अगदी आर. माधवन, असीन, प्रकाश राज यांच्यापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. असाच एक टॉलिवूड अभिनेता आहे धनुष. ज्याने दाक्षिण्यात सिनेसृष्टी गाजवत असतानाच बॉलिवूड आपल्या सशक्त आणि जिवंत अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली. धनुषने (dhanush)एक अभिनेता म्हणून त्याची ओळख निर्माण करताना टॉल, डार्क, हँडसम या बाह्य गुणांना बाजूला सारत त्याच्या अभिनयाच्या प्रतिभेच्या जोरावर नाव कमावले आहे. सोबतच हे देखील दाखवून दिले की, रुपापेक्षा गुण नेहमीच महत्वाचे असतात. आज धनुषचा वाढदिवस, या दिवसाचे औचित्यसाधून जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.  (actor dhanush birthday special,uknown facts about actor dhanush)

वेंकटेश प्रभु कस्तूरी राजा म्हणजेच धनुष याचा जन्म २८ जुलै १९८३ साली तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये झाला. धनुषचे वडील कस्तूरी राजा हे तामिळ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला घरातून अभिनयाचे वातावरण मिळाले. बालमनावर अभिनयाचे संस्कार झाल्याने नक्कीच धनुष सिनेमात त्याचे करिअर करेल असेच सर्वाना वाटले, मात्र त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास केला. त्याला शेफ होण्याची खूप इच्छा होती, मात्र त्याच्या भावाच्या सल्ल्यामुळे त्याने चित्रपटसृष्टीची वाट धरली.

धनुषने वयाच्या १९ व्या वर्षी अभिनयात प्रवेश केला. त्याने २००२ साली त्याच्या वडिलांच्या कस्तूरी राजा यांच्या दिग्दर्शकीय ‘थुल्लुवधो इलमई’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. या सिनेमाला सरासरी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने त्याच्या भावाच्या ‘कढाल कोन्डैन’ चित्रपटात काम केले. धनुषने या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अभिनयासोबतच निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, पटकथा लेखक, पार्श्व गायक अशा सर्व भूमिका अगदी लीलया पार पडल्या.

साऊथमध्ये यशाची शिखरं पादाक्रांत करत असतानाच धनुषने २०१३ साली आनंद एल.राय यांच्या ‘रांझणा’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीमधे पदार्पण केले. या सिनेमात त्याने ‘कुंदन’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. उत्तर भारतीय असणारा कुंदन हा त्याच्या शालेय जीवनापासून जोया या मुस्लिम मुलीवर एकतर्फी प्रेम करत असतो. मूळचा दक्षिण भारतीय असणाऱ्या धनुषने या सिनेमात उत्तर भारतीय तरुणाची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने साकारली. आपल्या पहिल्याच सिनेमातून त्याने यशस्वी पदार्पण तर केलेच, सोबत अनेक पुरस्कार देखील पटकावले. या सिनेमात त्याने शालेय टीनएजर आणि युवा अशा दोन भूमिका साकारल्या होत्या.

यानंतर त्याचा दुसरा सिनेमा होता, ‘शमिताभ’. या सिनेमात त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. या चित्रपटात धनुषने एका मुक्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली होती. तर अमिताभ हे धनुषचा आवाज बनले होते. सिनेमाला समीक्षकांनी उत्तम दाद दिली मात्र प्रेक्षकांना हा सिनेमा भावला नाही.

धनुषला अभिनयासोबतच संगीतामध्ये देखील खूप रस आहे. तो स्वतः तामिळ गाणे लिहितो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, धनुषने ‘कोलावेरी डी’ हे गाणे फक्त सहा मिनिटात लिहिले. या गाण्याने यूट्यूबच्या जगात धुमाकूळ घातला होता. सोबतच यूट्यूबने या गाण्याला ‘गोल्डन पुरस्कारही’ दिला. सर्वात जास्त व्हायरल झालेल्या गाण्याला हा पुरस्कार दिला जातो.

धनुषच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, तर धनुषने २००४ साली रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी लग्न केले. एका चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान या दोघांची भेट झाली.  पुढे मीडियामध्ये या दोघांच्या अफेयरच्या चर्चा देखील रंगू लागल्या. पुढे या दोघांनी परिवाराच्या परवानगीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८ नोव्हेंबर २००४ साली त्यांनी लग्न केले. त्यावेळी धनुष २१ वर्षांचा तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती. या दोघांना लिंगा आणि यात्रा नावाचे दोन मुलं आहेत.

photocourtesay:google

धनुष लवकरच आनंद एल. राय यांच्या ‘अंतरंगी रे’ सिनेमात अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्यासोबत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-

-रिंकू राजगुरुने पहिल्यांदाच केले प्रोफेशनल फोटोशूट; लक्षवेधी ठरतेय त्यावर ईशान खट्टरची ‘ही’ कमेंट

-राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटात दिसणार किंग खान; सोबतच झळकणार या ‘तीन’ प्रसिद्ध अभिनेत्रीही

-सुनील पालने ‘द फॅमिली मॅन’साठी मनोज बाजपेयींवर साधला निशाणा; म्हणाला, ‘इतका निर्लज्ज व वाया गेलेला माणूस…’

हे देखील वाचा