फरहान अख्तर अन् शिबानी दांडेकर पुढील महिन्यात अडकणार लग्न बेडीत? तारीख आली समोर


बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी लग्न करून नव्याने आयुष्याला सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत अनेक जोडपी लग्नाच्या तयारीत आहेत. या यादीत बॉलिवूडचा अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि त्याची मैत्रीण शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांच्या नावाचा समावेश आहे. दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता फरहान आणि शिबानी त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून, आता त्यांच्या लग्नाशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे.

फरहान आणि शिबानी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज करणार असल्याचा दावा केला जात आहे. दोघेही २१ फेब्रुवारीला लग्नाची नोंदणी करणार आहेत आणि ही माहिती फरहान आणि शिबानीच्या जवळच्या सहकाऱ्याने दिली आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, फरहान आणि शिबानी यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितले की, दोघेही लग्नासाठी तयार आहेत आणि २१ फेब्रुवारी हा दिवस दोघांसाठी खूप मोठा असेल. जवळचा सहकारी म्हणाला की, “दोघेही लग्न करणार आहेत. कारण ते खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते गेल्या काही काळापासून त्यांच्या लग्नाचे नियोजन करत आहेत आणि अखेरीस त्यांनी त्यांचे नाते पुढील स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. २१ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नात्यात एक नवीन वळण येणार आहे. कारण ते आयुष्यभर जोडीदार होण्याचे औपचारिक व्रत घेणार आहेत.”

यापूर्वी फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या आल्या होत्या. फरहान अख्तरने ९ जानेवारीला त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या वाढदिवसापूर्वी असा दावा केला जात होता की, फरहान त्याच्या खास दिवशी त्याच्या आणि शिबानीच्या लग्नाची घोषणा करू शकतो. एवढेच नाही, तर दोघे मार्च २०२२ मध्ये लग्न करणार असल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला होता.

फरहान आणि शिबानी २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न असेल. अभिनेत्याचे पहिले लग्न अधुना भाबानीसोबत झाले होते. २००० मध्ये दोघेही पती-पत्नी बनले. दोघांना दोन मुले आहेत. फरहान आणि अधुना २०१६ मध्ये वेगळे झाले आणि त्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर फरहान अख्तर सध्या त्याच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या तीन सुंदर अभिनेत्री कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान करणार आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!