Friday, February 3, 2023

‘मोस्ट डिझायरेबल मॅन’ म्हणून ओळख असलेला हर्षवर्धन राणे करणार होता ‘रामलीला’ सिनेमातून पदार्पण पण…

बॉलिवूडमध्ये अनेक हँडसम आणि डॅशिंग अभिनेते आहेत. या अनेक अभिनेत्यांमधून एका अभिनेत्याने कमी सिनेमे करून देखील स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. हा अभिनेता आहे, हर्षवर्धन राणे. टॉल, डार्क, हँडसम अशा अभिनेत्याच्या त्रिसूत्रींमध्ये उत्तम पद्धतीने बसणाऱ्या हर्षवर्धनने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली. चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असणारा हर्षवर्धन आज (१६ डिसेंबर) रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्याच्या बद्दल अधिक माहिती.

हर्षवर्धन राणे याचा जन्म १६ डिसेंबर १९८३ रोजी आंध्रप्रदेशात झाला. त्याचे वडील विवेक राणे एक डॉक्टर असून, त्यांचे कुटुंब हैद्राबादमध्ये राहते. हर्षवर्धनला रोहिणी नावाची एक बहीण देखील आहे. त्याने २०१६ साली ‘सनम तेरी कसम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमाला जर प्रेक्षकांनी सरासरी प्रतिसाद दिला असला तरी या सिनेमातील गाणी आणि हर्षवर्धन यांनी नक्कीच सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. तसे पाहिले तर हर्षवर्धनने २०१० सालीच अभिनयात पदार्पण केले होते. त्याने ‘ठाकिता ठाकिता’ या तेलगू फिचर सिनेमातून अभिनयात एन्ट्री मारली. त्यानंतर तो ‘ना इस्तम और अवुनु’ या सिनेमात झळकला. पुढे त्याने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला.

त्याचा सायकॉलॉजिकल ड्रामा आणि थ्रिलर कॉमेडी सिनेमा असणारा ‘ब्रदर ऑफ बोम्मली’ खूप गाजला. त्याने ‘फिदा’ आणि ‘बंगाल टायगर’ सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती. हर्षवर्धनचा काही दिवसांपूर्वीच ‘हसीना दिलरुबा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला आणि सिनेमातील हर्षवर्धनच्या अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी सारख्या दमदार कलाकारांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

मधल्या काळात हर्षवर्धन राणे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आला होता. तो आणि अभिनेत्री किम शर्मा एकमेकांना डेट करत होते. मात्र मधेच माशी शिंकली आणि त्यांचे ब्रेकअप झाले. त्याच्या या ब्रेकअपला हर्षवर्धनने स्वतःला जबाबदार ठरवत एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “आमच्यामध्ये जे काही चुकीचे होते तो माझा डीएनए होता. मी बारा वर्षांपासून सिंगल होतो. याचे काहीतरी कारण असेलच ना. काहीही असेच होत नाही. मी तिला डेट करायला सुरुवात केली. ती अतिशय मजेशीर व्यक्ती आहे. माझ्या मनात आमच्या ब्रेकअपनंतर तिच्याबद्दल कोणत्याही चुकीच्या भावना नाहीत. मी माझ्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण मी तिच्यासोबत घालवले आहे. मी या ब्रेकअपसाठी माझ्या डीएनएला आणि माझ्या वायरिंगला दोष देईल. तो रंग दे बसंती सिनेमातील संवाद आहे ‘आजादी मेरी दुल्हन है’ अगदी तसेच सिनेमा माझी दुल्हन आहे.”

हर्षवर्धन २०१३ साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. मात्र अकरा महिन्यांचा करार असल्याने त्याने हा सिनेमा सोडला. त्यानंतर त्याने २०१६ साली ‘सनम तेरी कसम’ सिनेमातून पदार्पण केले. तो आतापर्यंत ‘पलटन’ आणि ‘हसीना दिलरुबा’ सिनेमात झळकला आहे. सध्या त्याच्या हातात २ हिंदी आणि १ तामिळ सिनेमा असून लवकरच त्याबद्दल अधिक महिती समोर येईल. हर्षवर्धन जाहिरात क्षेत्रातील देखील नावाजलेला चेहरा म्हणून ओळखला जातो. २०१५, २०१५ आणि २०१७ साली हर्षवर्ध ‘मोस्ट डिझायरेबल मॅन’ म्हणून देखील निवडला गेला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा