‘लंबी रेस का घोडा’ समजल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने दिले फक्त ३ हिट सिनेमे; अर्थशास्त्रात मिळवले होते ‘गोल्ड मेडल’


हिंदी सिनेसृष्टी हे असे जग आहे, जिथे तुम्हाला तुमच्या मेहनतीसोबतच नशिबाचीदेखील खूप गरज असते. पहिला सिनेमा किंवा पहिले काम जरी तुम्हाला ओळखीने, शिफारशीने मिळाले, तरीही त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रतिभेच्या जोरावरच मिळवावे लागते. मात्र, प्रतिभा, नशिबाने आणि मेहनतीने काम मिळाले तरीही ते काम टिकवता आले पाहिजे. आपल्याला मिळणारे यश टिकवणे देखील प्रतिभेचाच एक भाग आहे. या क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना पहिले काम तर मिळवले, पण नंतर त्यांना काम मिळाले नाही, किंवा पहिल्याच कामात मिळालेले यश त्यांना टिकवता आले नाही. अनिश्चित क्षेत्र असणाऱ्या या इंडस्ट्रीमध्ये नेहमीच लोकं आपल्यासाठी थांबतील असे नाही.

अशीच काहीशी परिस्थिती असलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. अमिषा पटेलला तिच्या करिअरच्या पहिल्याच सिनेमात तुफान यश, लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली. मात्र, तिला हे सर्व टिकवता आले नाही. २१ वर्षाच्या करिअरमध्ये अमिषाने फक्त तीन हिट सिनेमे दिले. अनेक मोठ्या बॅनर आणि अभिनेत्यांसोबत काम करूनही अमिषा तिचे करिअर सावरू शकली नाही. बुधवारी (९ जून) अमिषा तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या वैयक्तिक आणि व्यायसायिक आयुष्यातील काही गोष्टी.

अमिषाचा जन्म ९ जून, १९७६ रोजी मुंबईत एका गुजराती परिवारात झाला. अमिषाने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच भरतनाट्यमचे धडे घेतले. अभ्यासात हुशार असलेल्या अमिषाचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. उच्च शिक्षणासाठी अमिषा अमेरिकेत गेली. तिने अमेरिकेच्या टफ्ट्स विश्वविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे. अमिषाने विश्वविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विषयात गोल्ड मेडल जिंकले होते.

शिक्षण संपवून पुन्हा भारतात आल्यावर तिने अभिनयात करिअर करण्याचे ठरवले. त्यासाठी तिने सत्यजित दुबे यांच्या थिएटर ग्रूपमध्ये जाण्यास सुरुवात केली. तिथे तिने अनेक नाटकांमध्ये काम केले. सोबतच तिने मॉडेलिंग सुरु केले, काही ब्रॅंड्ससाठी तिने मॉडेलिंग केले ज्यात बजाज, फेयर अँड लव्हली, कॅडबरी, फेम, लक्स अशा ब्रँड्सचा समावेश होता.

अमिषाच्या वडिलांचे मित्र असलेल्या राकेश रोशन यांनी अमिषाला पहिला सिनेमा दिला. तो सिनेमा म्हणजे ‘कहो ना प्यार है’ होय. मात्र, अमिषाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला हा सिनेमा नाकारला. काही कालावधीनंतर जेव्हा तिला पुन्हा सिनेमासाठी विचारणा झाली, तेव्हा तिने हा सिनेमा स्वीकारला. हा सिनेमा प्रदर्शित झाला, आणि या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले.

अमिषाला पहिल्याच सिनेमात स्वप्नवत यशाची चव चाखायला मिळाली. या सिनेमानंतर तिचा दुसरा सिनेमा आला ‘गदर एक प्रेमकथा’ हा सिनेमा देखील तुफान गाजला. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दोन ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यामुळे अमिषा अचानक लाईमलाईटमध्ये आली. तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली. अमिषाला सर्व जणं ‘लंबी रेस का घोडा’ समजू लागले.

मात्र, या दोन सिनेमानंतर आलेले तिचे सर्व सिनेमे फ्लॉप व्हायला सुरुवात झाली. पुढे अब्बास -मस्तान यांच्या ‘हमराज’ सिनेमात ती दिसली. हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा हिट झाला आणि अमिषाची गाडी पुन्हा रुळावर आली. मात्र, या सिनेमानंतर पुन्हा अमिषाचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले आणि ती मागे पडू लागली अमिषाने तिच्या २१ वर्षाच्या काळात ४० पेक्षा जास्त सिनेमे केले पण त्यातले फक्त तीनच चित्रपट यशस्वी झाले. अमिषाने तिचा हा फ्लॉप सिनेमांचा सिलसिला थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, ती यात अपयशी झाली.

आपले करिअर सावरण्यासाठी आणि सिनेमांमध्ये सक्रिय राहण्यासाठी तिने साईड भूमिका, सेकंड लीड रोल अशा भूमिका देखील केल्या. यात अमिषाने ‘मंगल पांडे’, ‘रेस’, ‘भुल भुलैया’ आदी हिट सिनेमात देखील काम केले. मात्र, साईड रोल असल्याने तिला यात जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. अमिषा शेवटची ‘भैयाजी सुपरहिट’ सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती बिग बॉस या रियॅलिटी शोमध्ये घराच्या मालकिणीच्या भूमिकेत देखील दिसली. पण याचा तिच्या करिअरसाठी काहीच उपयोग झाला नाही. तिने तिचे नशीब दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील अजमावून पाहिले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इथेही ती फ्लॉपच ठरली.

अमिषाला तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक प्रसिद्धी वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे मिळाली. अमिषाने काही वर्षांपूर्वी तिच्या आई वडिलांवर १२ कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप लावला होता. याविरोधात तिने तिच्या आई वडिलांना कोर्टाची नोटीस देखील बजावली होती. सोबतच त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरून देखील वाद चालू आहेत.

अमिषा आणि निर्माता दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा देखील खूप रंगल्या. अमिषाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या नात्याबद्दल सांगताना तिने ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगितले होते. मात्र, त्यांचे हे नाते जास्त काळ चालले नाही. या नात्याबद्दल जेव्हा अमिषाच्या घरी समजले, तेव्हा तिच्या आईने तिला चप्पल मारून घरातून हाकलवून दिल्याचे सांगितले जाते.

अमिषाने तिच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या बॅनरच्या आणि कलाकारांच्या चित्रपटांना नकार दिला आहे. त्यात यशराजचा ‘मेरे यार की शादी है’, शाहरुखचा ‘बिल्लू’, ‘तेरे नाम’, ‘जिस्म’, ‘चमेली’, ‘बधाई हो बधाई’ आदी चित्रपटांचा समावेश आहे.

सध्या अमिषा फक्त इव्हेंट्स, सार्वजनिक कार्यक्रम आणि रॅम्प वॉक इथेच दिसते. तिचे सिनेमे कधी येतात आणि जातात हे कोणालाच समजत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दारूचा वास लपवण्यासाठी धरम पाजी खाऊन यायचे कांदा; जाम वैतागलेल्या आशा पारेख यांनी केली होती थेट दिग्दर्शकाकडे तक्रार

-वेगळे राहूनही डिंपल यांनी घेतला नव्हता राजेश खन्नांपासून घटस्फोट; सनी देओलसोबत देखील जोडले होते त्यांचे नाव

-अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार


Leave A Reply

Your email address will not be published.