दारूचा वास लपवण्यासाठी धरम पाजी खाऊन यायचे कांदा; जाम वैतागलेल्या आशा पारेख यांनी केली होती थेट दिग्दर्शकाकडे तक्रार

When Veteran Actor Dharmendra Used To Eat Onion Before Shooting With Asha Parekh To Hide The Smell of Alcohol


चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्यांमध्ये होणारी भांडणे आणि रुसवे फुगवे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. असेच प्रसंग नंतर आठवणी बनून कायम लक्षात राहतात. अभिनयक्षेत्रात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांची मैत्री आजही टिकून आहे. परंतु ही मैत्री सुरुवातीपासूनच अशीच होती असे नाही. त्यांच्यातही अनेक वाद होते, एकमेकांच्या सवयीबद्दल तक्रारी होत्या. मात्र, या भांडणातूनच नंतर त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री निर्माण झाल्याचे अनेक कलाकार सांगतात. आज आम्ही अशाच कलाकारांविषयी आपल्याला सांगणार आहोत, ज्यांची पडद्यावरील जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. आम्ही बोलत आहोत अभिनेते धर्मेंद्र आणि प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांच्याबद्दल. धर्मेंद्र आणि आशा पारेखची मैत्री आजही कायम आहे आणि ही जोडी पडद्यावरदेखील तितकीच हिट ठरली होती. चला तर मग जाणून घेऊया या दोघांचा पडद्यामागील एक रंजक किस्सा…

‘आये दिन बहार के’
हा किस्सा आहे रघुनाथ झलानी ‘आये दिन बहार के’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा. हा प्रसंग एका रिऍलिटी शो दरम्यान खुद्द आशाजींनी सांगितला होता. अद्भुत मैत्रीमागील ही एक गमतीशीर कथा जाणून घेऊयात.

धर्मेंद्र आणि आशा पारेख हे दोघेही साठ- सत्तरच्या दशकातील मोठे स्टार होते. सध्या धर्मेंद्र आणि आशा पारेख हे दोघेही चित्रपटांपासून खूप दूर आहेत, पण आपल्या काळात या दोघांनीं प्रेक्षकांवर जादू केली होती. त्यांचे चित्रपट हाऊसफुल व्हायचे. आशा पारेख या आघाडीच्या नायिका होत्या. त्यांचे चित्रपट रौप्यमहोत्सव साजरा करायचे. त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘ज्युबिली पारेख’ असेही म्हणतात. त्यामुळे कोणतेही दिग्दर्शक आणि अभिनेते त्यांच्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्नही करत नसे. धरम पाजी यांना असलेली दारूची आवड कुणापासून लपलेली नाही. आजकाल त्यांना जितकं फार्महाऊसमध्ये भाजीपाला लावण्याची आवड आहे, तितकीच त्याकाळी दारूबद्दल आवड होती. असे म्हणतात की, धर्मेंद्र यांनी अगदी लहान वयापासूनच दारू पिण्यास सुरुवात केली. हा किस्सा दार्जिलिंग या सुंदर हिल स्टेशनमध्ये चालू असलेल्या ‘आये दिन बहार के’ चित्रपटाचे शूटिंगदरम्यानचा आहे.

‘आये दिन बहार के’ चित्रपटाच्या सेटवर सीनचे पॅकअप होताच दारूच्या बाटल्या उघडल्या जात असे. धर्मेंद्र यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक आणि टीमचे इतर सदस्यदेखील रात्री दारू पीत बसत. धर्मेंद्र इतके मद्यपान करायचे की सकाळीसुद्धा त्यांच्या तोंडून दारूचा वास जात नसे. आशाजी या एक मोठ्या स्टार होत्या आणि त्यांच्यासोबत धरम पाजी शूटिंग करत होते. त्यामुळे धर्मेंद्र यांना आशाजींचा ओरडा खाण्याची सतत भीती वाटत असे.

दारूचा वास लपवण्यासाठी खायचे कांदा
अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांनी आशाजींचा ओरडा टाळण्यासाठी एक विचित्र युक्ती शोधून काढली. ते दारूचा वास लपवण्यासाठी कांदे खाऊन सेटवर येत असत आणि इकडे धर्मेंद्र यांच्या तोंडातून येणाऱ्या कांद्याच्या वासाने आशाजी मात्र अस्वस्थ होत असत. शेवटी खूप वैतागून आशा यांनी दिग्दर्शकांकडे तक्रार केली की, धर्मेंद्रच्या तोंडातून कांद्याचा वास येतो आणि त्या अशा शूट करू शकत नाहीत. त्यानंतर अखेर धर्मेंद्र यांनी अशाजींना सांगितले की आपण केवळ दारूचा वास लपविण्यासाठी कांदे खात होतो. यावर आशा पारेख यांनी धर्मेंद्र यानां दारू पिऊ नये असे जोरदार प्रतिउत्तर दिले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी देखील आशा पारेख यांना आश्वासन दिले की, ते सेटवर कधीही दारू पिणार नाहीत.

थंडीत निळे पडूनही धर्मेंद्र यांनी मोडले नाही वचन
पुढे आशा पारेख यांनी सांगितले की, वचनानुसार त्यानंतर धर्मेंद्र यांनी एक थेंबदेखील मद्यपान केले नाही. त्यावेळी चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना पाण्यात उभे राहून गाण्याचे शूट करावे लागले होते. शूटिंग चालू असताना धर्मेंद्र थंडीमुळे निळे पडायचे. त्यामुळे त्यांना ब्रँडी ऑफर करण्यात आली आली. मात्र, धर्मेंद्र यांनी कोणत्याही किंमतीत आपले दारू न पिण्याचे वचन मोडले नाही. त्यांना भीती होती की आशा पारेख कदाचित शूटिंग सोडून निघून जाऊ शकतात. येथूनच ते दोघेही चांगले मित्र झाले आणि ही मैत्री आजही तशीच सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वेगळे राहूनही डिंपल यांनी घेतला नव्हता राजेश खन्नांपासून घटस्फोट; सनी देओलसोबत देखील जोडले होते त्यांचे नाव

-अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार


Leave A Reply

Your email address will not be published.