Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार

अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार

बॉलिवूडच्या ग्लॅमर जगात जर तुम्ही काही काळ जरी चित्रपटांमध्ये दिसला नाही, तर प्रेक्षकांना लगेच तुमचा विसर पडतो. तुमची जागा घेण्यासाठी अनेक कलाकार रांगेत उभेच असतात. त्यामुळे सतत आपल्या चित्रपटांमुळे किंवा नवनवीन सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहणे कलाकारांसाठी अत्यावश्यक असते. मात्र, याच इंडस्ट्रीमध्ये असे देखील काही कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये कमी दिसूनही तुफान लोकप्रियता मिळवली किंबहुना मिळवत आहेत.

अशीच एक सुंदर आणि फिट अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी (shilpa shetty). शिल्पाने लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी भाराभर सिनेमांचा कधीच आधार घेतला नाही. ती चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या विविध कामांमधून नेहमीच चर्चेत राहते. गुरुवारी (8 जून)ला शिल्पा तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पाकडे पाहून आपल्याला तिच्या वयाचा अंदाज लावणे निव्वळ अवघड. तिने या वयातही स्वतः ला उत्तम पद्धतीने मेंटेन ठेवले आहे. आज शिल्पाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

दिनांक 8 जून,1975 रोजी तुलू बोली भाषा असणाऱ्या कर्नाटकमधील मंगलोर येथे शिल्पाचा जन्म झाला. शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांचा टेम्पर प्रूफ वॉटर कॅप्सचा व्यवसाय होता. मंगलोरची असूनही शिल्पाचे शिक्षण आणि बालपण मुंबईतच गेले. शालेय दिवसांमध्ये शिल्पा तिच्या शाळेच्या व्हॉलीबॉल टीमची कॅप्टन होती. शिल्पाने कराटेमधे ब्लॅक बेल्ट देखील मिळवला आहे. सोबतच ती भरतनाट्यममध्ये देखील पारंगत आहे.

शिल्पाने तिची दहावीची परीक्षा दिल्यानंतर मॉडेलिंग करायला सुरुवात केली. शिल्पा पहिल्यांदा लिम्काच्या जाहिरातीमध्ये झळकली. त्यानानंतर तिने अनेक जाहिराती केल्या. मग तिला ‘गाता रहे मेरा दिल’ हा सिनेमा मिळाला. पण हा सिनेमा कधी प्रदर्शित होऊच शकला नाही. त्यानंतर ती शाहरुख खान आणि काजोलच्या ‘बाझीगर’ या थ्रिलर ड्रामा चित्रपटामध्ये दुसऱ्या महत्वाच्या भूमिकेत दिसली. हा सिनेमा तुफान गाजला. सोबतच या सिनेमासाठी शिल्पाला पुरस्कार देखील मिळाला. या सिनेमानंतर शिल्पाने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर तिने अनेक हिट सिनेमे केले.

सन 1994 मध्ये शिल्पा आणि अक्षय कुमार ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले. त्यावेळी नुकतेच अक्षय आणि रवीनाचे नाते संपले होते. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान शिल्पा आणि अक्षय जवळ आले. शिल्पा अक्षयच्या प्रेमात बुडाली होती. तिला अक्षयशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. काही कालावधीनंतर मीडियामध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. शिल्पा देखील या नात्यामुळे खूप आनंदी होती. मात्र, सर्व काही सुरळीत असताना अचानक शिल्पाला अक्षय तिच्यासोबतच तिचीच मैत्रीण असलेल्या ट्विंकल खन्नाला देखील डेट करत असल्याचे समजले. यामुळे शिल्पा पूर्णपणे तुटली. माध्यमातील वृत्तानुसार, शिल्पाने अक्षयला लग्नासाठी खूप दबाव टाकल्याचे सांगितले जाते. मात्र, अक्षयने यावर शिल्पाला फिल्म करिअर सोडण्यास सांगितले, पण शिल्पाला ही गोष्ट पटली नाही, आणि तिने हे नाते संपुष्टात आणले. त्यांचे नाते संपल्यानंतर शिल्पा, अक्षय आणि सुनील शेट्टी यांचा ‘धडकन’ सिनेमा प्रदर्शित झाला. शिल्पा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिने माध्यमांना सांगितले की, “त्याने मला धोका दिला. माझा ट्विंकलवर कोणताही राग नाही. मात्र, अक्षय माझ्याशी खूप चुकीचे वागला. आता इथून पुढे मी त्याच्यासोबत कोणताही सिनेमा करणार नाही.” यानंतर ही जोडी कधीच सोबत दिसली नाही.

सन 2007मध्ये शिल्पाने ‘बिग ब्रदर’ या आंतरराष्ट्रीय शो मध्ये सहभाग घेतला आणि तिने हा शो जिंकला देखील. या शोमध्ये शिल्पाला रंगभेदाचा देखील सामना करावा लागला. शो दरम्यान शिल्पाच्या रंगावर अनेक टिपण्णी केल्या गेल्या. यानंतर या शो ला आणि शिल्पावर केलेल्या टिपण्णीवर खूप विरोध दर्शवला गेला. यामुळे अनेक वादही झाले.

हा शो जिंकल्यानंतर शिल्पा लंडनमध्ये एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी गेली असतांना तिची भेट राज कुंद्रासोबत झाली. राज लंडनमधील प्रसिद्ध आणि मोठा व्यावसायिक होता. त्याच्या S2 या परफ्यूम ब्रँडच्या प्रमोशनच्यावेळी शिल्पा आणि राज यांची पहिल्यांदा भेट झाली. राजला भेटल्यानंतर शिल्पाला राज लगेच पसंत आला. मात्र, एका मित्राकडून शिल्पाला राज विवाहित असल्याचे समजले. त्यामुळे तिने स्वतःला मागे खेचले. पण पुढे राजने तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगितले. राजला देखील शिल्पा पहिल्या भेटीतच आवडली होती. जेव्हा मीडियामध्ये या दोघांच्या अफेअरच्या बातम्या उडाल्या, तेव्हा राज यांनी या बातम्यांना अफवा सांगितल्या होत्या. शिल्पा आणि राज सोबत खूप काळ व्यतीत करत होते. 2007 साली शिल्पाने एका मुलाखतीमध्ये ती कोणाला तरी डेट करत असल्याचे कबूल केले होते. मात्र, नाव सांगण्यास नकार दिला होता. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 22 नोव्हेंबर, 2009रोजी त्यांनी लग्न केले. राज आणि शिल्पा यांना विवान आणि समिशा ही दोन मुलं आहेत. समिशाचा जन्म फेब्रुवारी 2020मध्ये सरोगसी पद्धतीने झाला आहे.

चित्रपटांसोबतच शिल्पा सामाजिक कार्यांमध्ये देखील खूप सक्रिय आहे. शिल्पाने ‘पेटा’साठी देखील काम केले असून, सलमानसोबत आलेल्या ‘फिर मिलेंगे’ सिनेमातून तिने एड्स आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचे देखील काम केले. मुंबईमध्ये आयोजित एड्स जनजागृती कार्यक्रमावेळी हॉलिवूड स्टार रिचर्ड गियरने शिल्पाला मिठीत घेऊन खूप वेळ गालावर किस केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

अभिनेत्रीसोबतच शिल्पा एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. चित्रपटांमध्ये कमी दिसणारी शिल्पा विविध क्षेत्रांमध्ये काम करताना दिसते. शिल्पाच्या उत्तम आरोग्याचे रहस्य म्हणजे योगा आणि व्यायाम. याचा आधार घेत तिने तिची योगा डीव्हीडी देखील लाँच केली. सोबतच हेल्थी डायटवर तिने एक पुस्तक देखील लिहिले, जे खूपच लोकप्रिय झाले. शिवाय शिल्पाचे एक यूट्यूब चॅनेल देखील असून यावर ती नेहमी वेगवेगळ्या मात्र हेल्दी रेसिपी करताना आपल्याला दिसते.

पूर्वीची शिल्पा आणि आताच्या शिल्पामध्ये जमीन- आसमानाचा फरक आहे. शिल्पाने सर्जरी करत तिच्या चेहऱ्यामध्ये बदल केल्याच्या अनेक बातम्या आल्या. मात्र, शिल्पाने कधीच यावर भाष्य केले नाही. शिवाय राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने शिल्पावर तिचे घर तोडल्याचा देखील आरोप केला होता.

शिल्पा आणि राज कुंद्रा हे कपल अशा लोकांमध्ये गणले जाते ज्यांच्याकडे स्वतःचे असे प्रायव्हेट जेट आहे. शिल्पा नेहमी तिच्या या जेटचे फोटो शेअर करत असते. सध्या कोरोनाच्या काळात प्रवासासाठी या जेटचा खूप उपयोग होत असल्याचे तिने मुलाखतीमध्ये सांगितले होते.

सध्या शिल्पा छोट्या पडद्यावर एका डान्स रियालिटी शोमध्ये परीक्षकांची भूमिका निभावत असून लवकरच ती ‘हंगामा 2’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(birthday special shilpa shetty controversies and unknown facts about her life)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
…म्हणून सोळाव्या वर्षी गरोदर असलेल्या डिंपल कपाडिया यांनी पहिल्याच चित्रपटानंतर घेतला होता चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय
लव्हस्टोरी: राजेश खन्नांवरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी डिंपल यांनी फेकून दिली होती ऋषी कपूर यांची ‘ती’ भेट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा