वेगळे राहूनही डिंपल यांनी घेतला नव्हता राजेश खन्नांपासून घटस्फोट; सनी देओलसोबत देखील जोडले होते त्यांचे नाव


हिंदी चित्रपटांमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी त्यांच्या सक्रिय दशकात लोकप्रियतेचे आणि यशाचे झेंडे फडकावले. मात्र, त्यानंतर त्यांच्या यशाला, लोकप्रियतेला उतरती कळा लागली. या क्षेत्रात असा अलिखित नियम आहे की, प्रत्येक अभिनेत्रीचा एक विशिष्ट काळ असतो. त्याकाळानंतर त्या अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत कमी यायला लागते. मधुबाला, मीनाकुमारी पासून ते माधुरी, श्रीदेवी आणि अगदी आताच्या दीपिका, अनुष्का या अभिनेत्रींचा यात समावेश आहे.

सर्वच अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही अभिनेत्री अशा होत्या, ज्यांनी काम केले, प्रचंड प्रसिद्धी मिळवली, काही काळ ब्रेक घेतला, पुन्हा काम केले. यादरम्यान या अभिनेत्रींच्या यशाला थोडाफार देखील धक्का लागला नाही. याच अभिनेत्रींच्या यादीत अशा एका अभिनेत्रीचा समावेश आहे जिच्या सौंदर्याने, बोल्ड अवताराने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली होती.

ही अभिनेत्री आहे ब्युटीफुल अशा डिंपल कपाडिया. डिंपल यांनी त्यांच्या अभिनयाने आणि बोल्ड लूकने त्यांच्या पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांना आणि या इंडस्ट्रीला घायाळ केले. तुफान यश मिळवूनही डिंपल यांच्या जीवनात अनेक उतार चढाव आले. मात्र, त्यांनी निडरतेने सर्वांचा सामना केला. मंगळवारी (८ जून) म्हणजेच डिंपल यांचा जन्मदिवस. याच अनुषंगाने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही घटना.

दिनांक ८ जून, १९५७ रोजी मुंबईमध्ये एका गुजराती कुटुंबात डिंपल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे व्यावसायिक होते. लहानपणापासूनच डिंपल यांना अभिनयाची खूप आवड होती. वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच डिंपल यांनी अभिनय करायला सुरुवात केली. त्यांना अभिनयाची पहिली संधी शोमॅन राज कपूर यांनी दिली. १९७३ साली आलेल्या ‘बॉबी’ सिनेमातून डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा प्रचंड गाजला सोबतच सिनेमाची गाणी आणि डिंपल, ऋषी कपूर यांचा अभिनय देखील लोकांना खूप आवडला. या सिनेमाने इंडस्ट्रीला डिंपल आणि ऋषी कपूर असे दोन प्रतिभावान कलाकार दिले.

पहिल्याच सिनेमाच्या तुफान यशानंतर लोकांनां वाटले की, डिंपल यांचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. पण डिंपल यांच्या मनात काही औरच होते. ‘बॉबी’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच डिंपल यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न करत सर्वाना आश्चर्याचा आणि हैराणीचा सुखद धक्का दिला. ज्यावेळी डिंपल यांनी लग्न केले, तेव्हा त्या केवळ १६ वर्षांच्या आणि राजेश खन्ना ३१ वर्षांचे होते. लग्नानंतर डिंपल यांनी चित्रपटांमधून ब्रेक घेत वैवाहिक आयुष्याला महत्त्व दिले.

डिंपल यांनी १९७४ साली ट्विंकल खन्ना या त्याच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर १९७७ साली त्यांच्या दुसऱ्या मुलीचा रिंकी खन्नाचा जन्म झाला. डिंपल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी होत्या. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही वर्षांनी या दोघांच्या नात्यात दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याकाळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राजेश खन्ना यांना त्यांचे स्टारडम सांभाळता येत नव्हते. त्यांना फक्त आणि फक्त हिट सिनेमे करायचे होते. त्यांच्या या वागण्यामुळे घरातले वातावरणही खराब होऊ लागले, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांचा उदय होण्यास सुरुवात झाली.

इकडे डिंपल आणि राजेश खन्ना वेगळे झाले. मात्र, त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. लग्नानंतर जवळपास ११ वर्ष डिंपल यांनी अभिनयापासून दूर काढले. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्य खराब झाल्यानंतर डिंपल यांनी पुन्हा अभिनयात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘सागर’ सिनेमातून अभिनयात यशस्वी कमबॅक केले. या सिनेमातील तात्यांचे सौंदर्य आणि अभिनय पाहून त्यांनी पुन्हा रसिकांना त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. या इंडस्ट्रीमधल्या डिंपल या पहिल्या आणि कदाचित शेवटच्या अशा अभिनेत्री असतील ज्यांनी पहिला सिनेमा हिट दिल्यानंतर ११ वर्षांनी दुसरा चित्रपट केला तो देखील हिट.

तब्बल ११ वर्षांनी पुन्हा अभिनयात आल्यानंतर डिंपल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जर मी एवढा मोठा ब्रेक घेतला नसता, तर माझे करिअर खूप वेगळे असते. जेव्हा मी पुन्हा परतली, तेव्हा श्रीदेवी यांचा काळ चालू झाला होता. त्यांनी संपूर्ण इंडस्ट्री आणि प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. मला काहीच संधी दिसत नव्हती. मात्र, मला सागर सिनेमा मिळाला आणि माझी गाडी सुरू झाली. या ११ वर्षांमध्ये काम करण्याच्या पद्धती देखील खूप बदलल्या होत्या. मला या सर्वांशी जुळवून घेताना खूप त्रास झाला.”

डिंपल यांचे नाव सनी देओलसोबत देखील जोडले गेले होते. सनी आणि अमृता सिंग यांचे ब्रेकअप झाले होते, तर इकडे डिंपल आणि राजेश खन्ना यांचे देखील नाते तुटले होते. त्यावेळीही दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर डिंपलच्या मुली देखील सनीला पापा म्हणायच्या. मात्र, मधेच कुठेतरी माशी शिंकली आणि हे दोघे वेगळे झाले. २०१७ साली या दोघांचा लंडनमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यात ते एकमेकांचा हात पकडून बसले होते.

अतिशय चढ- उतारांनी भरलेल्या आयुष्यात डिंपल यांनी नेहमीच योग्य वाट काढली आणि त्यावर त्या चालल्या देखील. नुकत्याच त्या ‘टेनेट’ या हॉलिवूड चित्रपटातही दिसल्या.

सागरनंतर डिंपल यांनी ‘जख्मी शेर’, ‘एतबार’, ‘आखिरी अदालत’, ‘नरसिम्हा’, ‘अजूबा’, ‘राम लखन’, ‘कॉकटेल’, ‘अंग्रेजी मीडियम’, ‘दिल चाहता है’, ‘लेकिन’, ‘रुदाली’, ‘दृष्टी’, गर्दीश, ‘क्रांतिवीर’, ‘फाइंडिंग फॅनी’ आदी असंख्य सिनेमे केले. १९९३ साली आलेल्या ‘रुदाली’ सिनेमातील त्यांची भूमिका खूप गाजली. भलेही हा सिनेमा हिट झाला नसला तरी समीक्षकांनी त्यांचे खूप कौतुक केले. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.