Thursday, April 25, 2024

मोठ्या सर्जरीनंतर घरी परतली ‘बिग बॉस १५’ फेम देवोलीना; अनुभव वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘गोपी बहू’ आठवतेय का? ही गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी होय. देवोलीनाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. ती नुकतीच प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त टीव्ही शो ‘बिग बॉस १५’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून गेली होती. मात्र, बिग बॉसमधून बाहेर पडताच तिला लगेच सर्जरी करावी लागली. दुखापतीमुळे झालेल्या सर्जरीनंतर आता तिने एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे.

देवोलीनाने (Devoleena Bhattacharjee) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री रुग्णालयातील बेडवर बसून चहा पिताना आणि त्यानंतर वॉकरने (चालण्यासाठी वापरल्या जाणारी वस्तू) चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

याशिवाय, व्हिडिओमध्ये ती व्हील चेअरवर बसलेली दिसत आहे. तसेच या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘दिल है छोटा सा’ हे प्रसिद्ध गाणे वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करत देवोलीनाने एक मोठे कॅप्शनही लिहिले आहे. कॅप्शनमध्ये, तिने तिचा ‘बिग बॉस १५‘ (Bigg Boss 15) चा प्रवास आणि घरातून बाहेर पडल्यानंतरच्या सर्जरीबद्दलचा अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CZZgnHuBCe9/?utm_source=ig_embed&ig_rid=0423c14d-a15f-48eb-903a-e873b9cbdde0

व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये देवोलीनाने लिहिले की, “बिग बॉस १५ मधील माझा प्रवास रोलर कोस्टर राईडसारखा होता. या दरम्यान मला मानसिक, शारीरिक आणि भावनिक सर्व स्तरांवर चढ-उतारांचा सामना करावा लागला. कारण आपणा सर्वांना माहिती आहे की, पोल टास्क दरम्यान मला दुखापत झाली. यादरम्यान मला फूट ड्रॉपमधून जावे लागले. बेघर झाल्यानंतर मला ताबडतोब डीकंप्रेशन सर्जरीसाठी नेण्यात आले.”

आपल्या तब्येतीलबद्दल तिने लिहिले की, “अखेर आज सर्व अडचणी आणि आव्हानांशी झुंज दिल्यानंतर मी माझ्या लाडक्या देवदूताच्या घरी परतले आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते. तुमच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. आई, भाऊ, शान, हर्षिता सादिया, जोंटू, सृष्टी, लक्ष्मी, विकास या सर्वांचे आभार मानते, ज्यांनी माझी काळजी घेतली आणि शेवटी मी स्वतःचे आभार मानते ज्याने क्षणभरही हार मानली नाही. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मला बरे व्हायला वेळ लागेल, पण मी लवकरच बरी होईल.”

‘बिग बॉस १५’ या रियॅलिटी शोबद्दल सांगायचे, झाले तर शोच्या या पर्वाचे विजेतेपद तेजस्वी प्रकाशने आपल्या नावावर केले आहे. तसेच तेजस्वीला टक्कर देणारा प्रतीक सहजपाल या पर्वाचा उपविजेता ठरला. निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि करण कुंद्रा यांनी या पर्वात टॉप ५ मध्ये आपले स्थान निर्माण केले होते. मात्र, निशांत १० लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडला. त्यानंतर शमिता शेट्टी आणि करण कुंद्राही कमी मतांमुळे अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा