Sunday, April 14, 2024

कनिका कपूरच नव्हे तर ‘या’ अभिनेत्रींनीही चाळीशीनंतर बांधलं बाशिंग

 बेबी डॉल या गाण्याने लाखो चाहत्यांना डोलायला लावणाऱ्या गायिका कनिका कपूरने (Kanika Kapoor) गेल्याच आठवड्यात बॉयफ्रेंड गौतमशी लग्न केलं. लंडनमधील तिच्या डेस्टीनेशन वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. कनिकाच्या गाण्यावर तर तिचे चाहते फिदा आहेतच पण कनिकाच्या सौंदर्यावरही अनेकजण घायाळ आहेत. कनिका कपूरच्या लग्नाइतकीच चर्चा झाली ती तिने वयाच्या ४३ व्या वर्षी केलेल्या दुसऱ्या लग्नाची. यापूर्वी तिने वयाच्या १८ व्या वर्षी पहिलं लग्नं केलं होतं, पण ते नातं टिकलं नाही. चाळीशी उलटल्यानंतर कनिकाला बॉयफ्रेंड गौतममध्ये जोडीदार सापडला आणि कनिका पुन्हा एकदा नवरी झाली. पण वयाच्या चाळीशीपार बोहल्यावर चढणारी कनिका ही काही पहिली सेलिब्रिटी नाही. यापूर्वी अनेक अभिनेत्रींनीही वयाच्या सेकंड इनिंगमध्ये संसाराला सुरूवात केली आहे. कोण आहेत या अभिनेत्री,चला तर जाणून घेऊया.

आपल्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाणारी नीना गुप्ता (Neena Gupta) हिनेही चाळीशीनंतर लग्नाचा विचार केला. दिल्लीच्या सीए असलेल्या विवेक मेहरा यांच्याशी तिनं २००८ साली लग्नं केलं तेव्हा नीना ४९ वर्षाची होती. त्याआधी नीनाचे क्रिकेटर विवियन रिचर्डसशी संबंध होते आणि त्याच्यापासून तिला मसाबा नावाची मुलगीही आहे. रिचर्डने लग्नाला आणि मुलीला नाव देण्यासाठी नकार दिल्यानंतरही नीनाने मसाबाला जन्म दिला. अखेर तिला पन्नाशीच्या उंबरठ्यावर विवेक याच्या रूपाने साथीदार मिळाला. अमेरिकेत तिने गुपचूप विवेकशी लग्नगाठ बांधली.

हिंदी सिनेसृष्टीतील चुलबुली पण तितकीच ताकदीची अभिनेत्री म्हणून ९० चं दशक गाजवणाऱ्या ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिचं नाव अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांशी जोडलं होतं. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याशी तर ऊर्मिला लग्नं करणारच इतकी त्यांची जवळीक वाढली होती. पण ते नातं काही पुढं गेलं नाही, मात्र ऊर्मिलाने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा ती वयाच्या ४२ व्या वर्षात होती. काश्मिरी उदयोगपती आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीर याला ऊर्मिलाने नवरा म्हणून निवडलं. लग्नानंतर बॉलिवूडपासून लांब जात ऊर्मिलाने राजकारणात नशीब आजमावलं पण तिथे तिला काही फारसं यश मिळालं नाही.

अनेक कलाकारांना ऑनस्क्रिन तिच्या तालावर नाचवणारी कोरिओग्राफर फराह खान (farah Khan) सध्या तिळया मुलांची आई आहे. शिवाय अनेक रिअलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही दिसते. फराहने काही सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. तर अशी ही बॉलिवूडची हॅपी गो लकी फराह खान लग्नासाठी तयार झाली तेव्हा ती चाळीशीत पोहोचली होती. मै हँ ना या सिनेमाच्या सेटवर पहिल्या भेटीतच प्रेमात पडलेल्या शिरीष कुंदरशी फराहने २००४ साली लग्नं केलं. चाळीशीत लग्न आणि त्यानंतर तिळ्यांना जन्म यामुळे फराह खान चर्चेत आली होती. सध्या घर आणि करिअर यांचा बॅलेन्स छान सांभाळत आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या गालावरच्या खळीमुळे खास ओळखल्या जातात. यामध्ये प्रीती झिंटाने (preity zinta)  तिच्या गालावरच्या खळीसोबतच अभिनय आणि सौंदर्यानेही लाखो चाहते कमावले आहेत. सध्या बॉलिवूडपेक्षा क्रिकेटच्या मैदानावर जास्त दिसणाऱ्या प्रीती झिंटाला आयुष्याचा जोडीदार मिळायला वयाचं ४१ वं वर्ष उजाडावं लागलं. अर्थात तिच्या अफेअरच्या अफवा अनेक अभिनेत्यांसोबत उडाल्या. पण लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा प्रीतीने परदेशातील जीन गुडइनफ या बिझनेसमनची निवड केली. सध्या प्रीतीने सिनेमाला बायबाय केलं असून आता ती आईदेखील झाली आहे.

बॉलिवूडमध्ये मॉडर्न, नव्या विचारांची आई अशी ओळख निर्माण करणाऱ्या सुहासिनी मुळे (Suhasini Mule) यांनी मालिकांपासून करिअर सुरू केलं आणि आज त्या मोठ्या पडदयावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. प्रेमाला वय नसतं असं म्हटलं जातं ते सुहासिनी यांच्या आयुष्यात अगदी खरं ठरलं. सुहासिनी या वयाच्या साठीत प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्नंही केलं. अतुल गुर्टू यांच्या घरात सुहासिनी यांनी माप ओलांडलं तेव्हा त्या साठ वर्षाच्या होत्या. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं आणि लग्नासाठी वयाच्या साठीतही तुम्ही तयार असू शकता हे सुहासिनी यांनी दाखवून दिलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा