Friday, March 29, 2024

कोरोनातून बरे झाल्यानंतर मिलिंद पहिल्यांदाच धावले तब्बल ‘इतके’ किलोमीटर, चाहत्यांसोबत शेअर केल्या धावण्याच्या टिप्स

ग्लॅमर जगातील सर्वात फिट आणि हँडसम व्यक्ती म्हणून मिलिंद सोमण यांचे नाव पहिले घेतले जाते. मिलिंद यांनी त्यांच्या फिटनेसने सर्व प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी मिलिंद यांचा फिटनेस आणि व्यायामावरील त्याचे प्रेम भल्याभल्याना प्रेरणा देणारा आहे. मिलिंद नेहमीच त्यांच्या व्यायामाचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतच असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चाहत्यांमध्ये देखील खूप लोकप्रिय होत असतात. नुकतेच मिलिंद यांनी त्यांचे धावण्याचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मिलिंद मार्चमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ५ एप्रिलला त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. पोस्ट कोरोनातून जलद गतीने बरे होण्यासाठी मिलिंद यांनी व्यायामाचा आधार घेतला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मिलिंद दररोज ५/६ किलोमीटर धावायचे. मात्र, नुकतेच ते बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात १० किलोमीटर धावले आहेत. मिलिंद यांनी याबद्दलची सर्व माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहे.

त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच मी ६२ मिनिटांमध्ये १० किलोमीटर धावलो आहे. अतिशय आरामदायक, यावेळेस माझ्या हृदयाची गती १४२ च्या जवळपास होती. ५ एप्रिलला माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मी रोज ५/६ किलोमीटर पळत आहे.” मिलिंद यांना त्यांच्या अनेक चाहत्यांनी धावण्याच्या योग्य पद्धतीबद्दल विचारले. सोबतच इतर काही प्रश्ने देखील विचारले. त्यावर मिलिंद यांनी धावण्याचे योग्य तंत्र आणि पद्धत याबद्दल सांगितले.

ते म्हणाले, “मी पाच बोटं असलेले वायब्रम घालून धावतो, किंवा लुना सॅंडल घालतो. बंदिस्त शूज मला अस्वस्थ आणि त्रासदायक वाटतात. अशा शूज मध्ये मी मनासारखे धावू शकत नाही. मी कडक किंवा मऊ कोणताही पृष्ठभाग असल्यास धावू शकतो. माझा विशिष्ट अशा पृष्ठभागाचा कधीच अट्टहास नसतो. जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि न चुकता धावलात, तर तुमचे पाय मजबूत होतील. शिवाय धावणे गुडघ्यांना मजबुती देण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.”

नवीन लोकांना धावण्याची सुरुवात कशी करावी याबद्दल सांगताना त्यांनी लिहिले की, “जर तुम्ही पहिल्यांदाच धावण्याला सुरुवात करत आहात, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धावायला सुरुवात करणार आहात, जखमी झालेल्या व्यक्ती किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी धावण्याची सुरुवात करताना अतिशय हळू आणि कमी अंतरापासून सुरुवात करा. तुमची नियमितताच बदलांची चावी आहे लक्षात ठेवा. जर मी एका दिवसात ५ ते ६ किलोमीटर धावत असेल, तर मला विशेष आणि अधिकच्या आहाराची गरज नाही. मात्र, जर मी एका दिवसात ५० ते ६० किलोमीटर धावत असेल, तर मला अधिक आहाराची नक्कीच गरज पडेल.”

धावताना किंवा धावल्यानंतर त्वचेच्या काळजीबद्दल सांगताना त्यांनी लिहिले की, “मी कोणत्याही सनस्क्रीनचा वापर करत नाही. जर मी धावत असताना ऊन खूप कडक झाले असेल, तर अशावेळेस मी धावून झाल्यानंतर माझ्या चेहऱ्याला दही लावतो आणि ते कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घेतो. यामुळे माझी त्वचा अधिक फ्रेश राहते सोबतच यामुळे टॅन निघून जाण्यासही मदत होते.”

मिलिंद यांची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे, सोबतच त्यांच्या धावण्याच्या या टिप्सचा उपयोग सर्वांना नक्कीच होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा