सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राईज’ चित्रपट सध्या सिनेमागृहात चांगलीच धमाल करत आहे. मागच्या आठवड्यात पुष्पा द राईज चित्रपट प्राईम व्हिडिओवर तेलुगू,तमिळ आणि अन्य दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. यावरून हिंदी भाषिक प्रेक्षकांना जोरदार धक्का बसला होता. कारण चित्रपटाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये चांगली कमाई केली होती, तरीही चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शितही झाला नाही आणि हिंदी सबटायटल्सही देण्यात आले नाही. परंतू लवकरच हिंदी भाषिक प्रेक्षकांची नाराजी दूर होणार आहे. कारण, या आठवड्यात चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘सूर्यवंशी’ चित्रपटानंतर ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) अलीकडच्या काळातला सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून समोर आला आहे. चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये जोरदार कमाई केली आहे. हिंदी भाषिक प्रदेशातील सिनेमागृहांमध्ये चित्रपटाची कमाई चकित करणारी आहे. यामुळेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार असल्याची बातमी समोर आली, तेव्हा चाहते खुश झाले होते. परंतू हिंदीमध्ये होणार नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. याबद्दल जाणकारांनी अंदाज लावला होता की, चित्रपट हिंदी भाषिक राज्यांमध्ये चांगली कमाई करत असल्याने याच्या हिंदीमधील प्रदर्शनाला उशीर होत आहे.
दरम्यान, हिंदी भाषेमध्ये ‘पुष्पा’ चित्रपट १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. चित्रपट ७ जानेवारीला तेलुगूसह इतर दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अल्लू अर्जूनचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो तेलुगूसह हिंदीमध्येही प्रदर्शित होत आहे.
हेही पाहा: कुणाचा व्हिडिओ गाजला, तर कुणाचा नवा चित्रपट येतोय; पाहा काय काय घडलंय
हिंदी बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा’ने ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा एक ट्रक ड्रायव्हर आणि लाकूडतोड्या पुष्पाराजवर आधारित आहे, जो चंदनतस्कर असतो आणि स्वःताच्या हिमतीने आणि बुद्धीचातुर्याने तो प्रमुख बनतो. चित्रपटात रश्मिका मंदानाने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे, तर फहाद फासिलने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.