Saturday, November 9, 2024
Home अन्य खासदार शरद पवार यांच्यावरील नवीन गाणं रिलीज; प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंच्या आवाजात ठरतंय सुपरहीट!

खासदार शरद पवार यांच्यावरील नवीन गाणं रिलीज; प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंच्या आवाजात ठरतंय सुपरहीट!

संगीत क्षेत्रात अनेक दिग्गज मंडळींवर गाणी तयार झाली आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील एक गाणे तयार झाले आहे. हे गाणे रिलीझ होऊन अवघे काही तास झाले आहेत, पण यादरम्यान या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

मराठी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक आनंद शिंदे यांनी शरद पवार यांच्यावरील हे गाणे गायले आहे. या गाण्याचे बोल ‘शरद पवार साहेबांची जीवनकथा’ हे आहे.  आनंद शिंदे यांचे पुत्र संगीतकार ‘उत्कर्ष शिंदे’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तसेच ‘एकनाथ माळी’ यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. या गाण्याला ‘विजय आनंद म्युझिक’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. या चॅनेलवर शिंदे परिवारातील गायकांची गाणी मुख्यत्वे रिलीझ होतात. हे गाणे प्रदर्शित होऊन केवळ २४ तास झाले आहे. पण या गाण्याला २९ हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

आनंद शिंदे हे मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचे गायक आहेत. ज्यांची भक्तीगीत व लोकगीत खूप लोकप्रिय झाली, त्या दिवगंत महान गायक प्रल्हाद शिंदेचे ते पुत्र आहेत. तर त्यांचा एक मुलगा आदर्श शिंदे मराठीतील आघाडीचा गायक आहे तर दुसरा डॉक्टर उत्कर्ष हा संगीतकार व गायक आहे.

आनंद शिंदे यांनी मराठी सिने आणि संगीत सृष्टीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. यामध्ये ‘पोपट पिसाटला’, ‘कोंबडी पळाली’, ‘लिंबू मला मारीला’, ‘जवा नवीन पोपट हा’, ‘केसामधी गजरा’, ‘भीम जयंती’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी अनेक दिग्गज मंडळींवर देखील गाणी गायली आहे. आता यात शरद पवार यांच्यावर गाणे गायलेल्या गाण्याची भर पडली आहे. या गाण्यात आनंद शिंदे यांनी शरद पवार यांच्या जन्मापासून आतापर्यंतची संपुर्ण कहाणी मांडली आहे.

देशातील जेष्ठ राजकारणी अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी देशाचे संरक्षण मंत्री, कृषीमंत्री, अन्न पुरवठा मंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रमुखपद सांभाळले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा