‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर अनुपम खेर यांच्या आईने व्यक्त केले लहान भावाला गमावल्याचे दुःख

सध्या राजकारणी, सामान्य जनता, सोशल मीडिया, सेलिब्रिटी आदी सर्वच लोकांमध्ये एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files). तुफान चर्चेत असणारा आणि बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे सतत प्रकाशझोतात येत आहे. या सिनेमावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण देखील तापले आहे. काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या मोठ्या घटनेवर या सिनेमातून भाष्य केले आहे.

अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आदी कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या सिनेमाबद्दल नुकतेच अनुपम खेर यांनी त्यांच्या आईशी संवाद साधला. अनुपम खेर स्वतः काश्मिरी पंडित असल्याने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने या संकटाचा प्रत्यक्ष सामना केला आहे. अनुपम यांनी या चित्रपटाबद्दल, सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल आईशी चर्चा केली आणि याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांची आई म्हणते, “हा सिनेमा एकदम योग्य बनवला आहे. जर सिनेमा योग्य नसता तर लोकांनी तो पाहिलाच नसता. प्रत्येक सिनेमाचे आपले एक नशीब असते. जे काही या सिनेमात दाखवले गेले आहे, ते आमच्या सर्व लोकांसोबत झाले आहे. आमच्यातल्या खूप लोकांसोबत तर खूपच दुर्दैवी घटना घडल्या. १९९० साली माझ्या लहान भावाला अर्ध्या रात्री घर सोडायला लावले होते. त्याने नवीनच घर बनवले होते. तो ते घर सोडायला तयार नव्हता. तो दुसऱ्यादिवशी बाहेरून घरी आला तेव्हा त्याला त्याच्या घरात एक चिट्ठी मिळाली त्यात लिहिले होते की, ‘आता तुझी पाळी’ आणि तो त्या रात्री मरण पावला.”

अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “द काश्मीर फाईल्स चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमावलेल्या बक्कळ यशाबद्दल मी आईला सांगताना जरा दुःखीच होतो. मात्र ती अजिबात अशा मूडमध्ये नव्हती. ती पूर्णतः केंद्रित, निडर, शांत, चिडलेली आणि स्पष्ट होती. तिने स्पष्टपणे काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दल भाष्य केले. दुलारी खूपच दुखी आहे.”

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

तत्पूर्वी द काश्मीर फाईल्स हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात सर्वात पुढे आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे. लवकरच सिनेमा १५० कोटींचा आकडा पार करेल. सिनेमाला मोठ्या प्रमाणावर मिळणारे यश आणि लोकांचा प्रतिसाद पाहून चित्रपटाची संपूर्ण टीम भावुक झालेली दिसले. या सिनेमाला बघताना अनेक लोकं देखील भावुक झाले होते. याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमात ९० च्या दशकात काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला दाखवण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post