Monday, July 1, 2024

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर! अनेक मोठे कलाकार कोरोनाच्या कचाट्यात, जाणून घ्या त्या सर्व कलाकारांबद्दल

देशात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत असून, नवीन वर्षात कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेने आणि नवीन व्हेरियंटने देशात पुरता धुमाकूळ घातला आहे. सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वच लोकं या कोरोनाच्या कचाट्यात अडकत आहे. बॉलिवूडमध्ये तर कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले असून, अनेक कलाकार कोरोनाने ग्रस्त झाले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाचा कहर वाढत असताना कलाकार यात अडकताना दिसत आहेत. करीना कपूर, नोरा फतेही आदी अनेक कलाकार कोरोनाने संक्रमित झाले होते.

अभिनेता ऋतिक रोशनची पहिली पत्नी सुजेन खान देखील कोरोनाने संक्रमित झाली आहे. सुजेनने सोशल मीडियावर ती कोरोना ग्रस्त झाल्याची माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे सुजेन ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटने संक्रमित झाली आहे. सुजेनसोबतच कॉमेडियन आणि अभिनेता वीरदास देखील कोरोनाच्या कचाट्यात अडकला आहे. त्याने त्याला सौम्य लक्षण असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. याशिवाय अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण आणि बोनी कपूर यांची मुलगी ख़ुशी कपूर देखील कोरोनाने ग्रस्त झाली असून, बोनी कपूर, जान्हवी घरीच क्वारंटाईन आहे.

यासोबतच आजच्या घडीचा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय गायक असणारा अरिजित सिंग आणि त्याची पत्नी देखील कोरोनाने ग्रस्त झाले आहे. अरिजीतने सोशल मीडियावरून माहिती देत तो ठीक असून घरीच उपचार घेत असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय विशाल ददलानी, कुब्रा सैत, प्रियदर्शन, महेश बाबू, लक्ष्मी मांचू, स्वरा भास्कर, मिथिला पालकर, मृणाल ठाकुर, जॉन अब्राहम, प्रेम चोप्रा, ईशा गुप्ता, आदी कलाकार देखील कोरोनाने संक्रमीत असून, उपचार घेत आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर देखील कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झाले असून, तिथे उपचार घेत आहेत. आज गानकोकिळा लता मंगेशकर देखील कोरोनाने संक्रमित झाल्या असून, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक कलाकार कोरोनाच्या कचाट्यात आले असून, अभिनेत्री किश्वर मर्चंटचा चार महिन्याचा मुलगा निरवैर, नकुल मेहताचा अकरा महिन्याचा मुलगा सुफी देखील कोरोनाने ग्रस्त आहेत. सर्वांनी मास्क लावा आणि स्वतःची घरच्यांची काळजी घ्या.

हे देखील वाचा