वडिलांची कबर पाहून भावूक झाला भारतीय क्रिकेटर सिराज, सुपरस्टार धर्मेंद्र यांनी देशप्रेम पाहून दिली शाबासकी


भारतीय क्रिकेट टीमने नुकतंच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. २-१ ने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत मात दिली आहे. भारतीय टीमच्या या भव्य विजयावर सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. हा विजय मिळवत टीम इंडिया गुरुवारी मायदेशी परतली. त्यांचे देशवासीयांनी दणक्यात स्वागत केले. ढोल, ताशे, फुल आदी गोष्टी त्याच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. एकीकडे सर्वत्र जल्लोष साजरा होत असताना या सिरीजमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला सिराज मात्र या सर्वांपासून दूर होता. तो भारतात आला आणि एअरपोर्टवरून थेट त्याच्या वडिलांच्या कबरचे दर्शन घ्यायला गेला.

सिराज ऑस्ट्रेलियामध्ये ही मालिका खेळत असताना इकडे त्याच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. मात्र त्याने त्यावेळी देशासाठी खेळणे आणि टीमची पडत्या काळात साथ देणे जबाबदारीचे समजले आणि तो या सिरीजमध्ये यशस्वी होऊन परतला. त्याच्या त्यागासाठी जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी त्याची सोशल मीडियावर खूप स्तुती केली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील हीमॅन म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सिराजच्या देशप्रेमाचे कौतुक करत त्याच्या त्यागाबद्दल अभिमान व्यक्त केला. धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या बद्दल एक पोस्ट शेयर केली आहे. त्यांनी त्यांच्या या पोस्ट मध्ये लिहिले की, “सिराज तू खरंच भारताचा बहादूर मुलगा आहेस. तुला खूप खूप प्रेम. आज तुझा खूप अभिमान वाटत आहे. तुझ्या मनावर वडिलांच्या निधनाचे दुःख असतांना देखील तू हे दुःख स्वतःवर हावी होवू दिले नाही. त्यावेळी देशासाठी खेळणे महत्वाचे समजत, भारताला एक अनपेक्षित विजय मिळवून देण्यात तू मोलाचा वाटा उचललास. तुला तुझ्या वडिलांच्या कबर जवळ बघून मन भरून आले. तुझ्या वडिलांना स्वर्गात जागा मिळो.”

हैद्राबादमध्ये राहणार सिराज दुबईमध्ये आयपीएल सामने खेळल्यानंतर, ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला गेला. तिथे पोहचल्यावर २० नोव्हेंबरला त्याच्या वडिलांचे निधन झाले. BCCI ने त्याला घरी परतण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने घरी न येत तिथे राहून खेळण्याचे ठरवले.

सिराजचे वडील हैद्राबादमध्ये रिक्षा चालवायचे. ते मागील अनेक काळापासून फुप्फुसांच्या आजाराने ग्रस्त होते. त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला आईने आणि त्याच्या परिवाराने हिंमत देत खेळण्यासाठी सांगितले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.