Friday, March 29, 2024

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून ‘या’ अभिनेत्रीला कॉलेजने दाखवला होता बाहरेचा मार्ग

हिंदी सिनेमाने फक्त मुख्य नायक आणि नायिका यांनाच ओळख मिळवून दिली असे नाही, तर सहायक भूमिका साकारणारे कलाकार देखील प्रचंड लोकप्रिय झाले. ज्या काळी नायक, नायिका, खलनायक यांच्या नावाचा दबदबा इंडस्ट्रीवर होता, त्या काळी असे अनेक कलाकार आले, ज्यांनी त्यांच्या प्रभावी आणि जिवंत अभिनयाने एक वेगळे आणि अविस्मरणीय ओळख निर्माण केली. अशाच एक अभिनेत्री म्हणजे दीना पाठक.

दीना पाठक हे हिंदी सिनेसृष्टीतील एक जेष्ठ आणि श्रेष्ठ असे नाव. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या आई, सासू, आजी आदी भूमिकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. जुन्या बहुतंवशी प्रत्येक चित्रपटांमध्ये दीना यांची भूमिका असायचीच. दीना यांची गुरुवारी ९९ वी जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचा सिनेप्रवास.

दीना यांचा जन्म ४ मार्च १९२२ ला गुजरातमधील अमरेली इथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्या रंगमंचाकडे वळल्या. अभिनयाच्या बाबतीत त्यांनी भल्या भल्या कलाकारांना मागे सोडले. त्या मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेत होत्या. शिक्षण घेत असताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. त्याचमुळे त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. पुढे त्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्यांची पदवी पूर्ण केली.

पुढे त्या अभिनायकडे वळल्या. गुजराती नाटकांमध्ये त्या मोठे प्रस्थ बनत होत्या. नाटकांमध्ये त्यांना बघण्यासाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी नाटक सुरु होण्याआधी अनेक तास आधी लांबच्या लांब रांगा लागायच्या. त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर देखील त्यांनी नाटकाचे सादरीकरण केले. सोबतच त्यांनी ‘कारियावर’ या गुजराती सिनेमातुन मोठ्या पडद्यावर अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी जवळपास १२० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमधून त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या.

दीना यांच्या व्यायसायिक आयुष्याबद्दल अनेकांना सर्व माहिती असे, मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हते. दीना त्यांनी बलदेव पाठक यांच्याशी लग्न केले. बलदेव हे पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध टेलर होते. त्यांनी दिलीप कुमार यांच्यापासून राजेश खन्ना यांच्यापर्यंत अनेक कलाकारांसाठी ड्रेस शिवले होते. राजेश खन्ना यांच्या तर सर्वच सिनेमांसाठी त्यांनी त्यांना ड्रेस तयार करून दिले होते. मात्र कालांतराने राजेश खन्ना यांचे सिनेमे फ्लॉप व्हायला सुरुवात झाली, आणि बलदेव यांचे काम कमी होऊ लागले. एक वेळ तर अशी आली की त्यांचे दुकानच बंद झाले. या धक्क्यामुळे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी बलदेव यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे दीना यांच्यावर रत्ना आणि सुप्रिया या दोन मुलींसोबतच स्वतःचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी आली.

दीना यांनी त्यांच्या करियरमध्ये तीन आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये काम केले. पहिला प्रोजेक्ट होता १९६९ साली आलेला मर्चंट आयव्हरी प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘द गुरु’ हा सिनेमा. दुसरा होता १९८४ साली आलेला डेव्हिड लिन दिग्दर्शित ‘अ पॅसेज टू इंडिया’ या सिनेमात त्यांनी बेगम हमीदुल्लाह ही भूमिका साकारली. त्यानंतर २०२० साली दीप मेहता यांच्या ‘बॉलिवूड हॉलिवूड’ या सिनेमातही त्यांनी काम केले. या तिन्ही सिनेमांमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली, आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले.

दीना यांनी वयाच्या ७५ वर्षापर्यंत मुंबईमध्ये घर घेतले नव्हते, त्या दादरला भाड्याच्या घरात राहायच्या. एक दिवस त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना घर घेण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा रत्ना आणि सुप्रिया यांनी ठरवले की, एकीच्या घराजवळ आईसाठी घर घ्यायचे. त्यावर दीना यांनी सांगितले होते, ” माझ्याकडे आजच्या घडीला घर घेण्याइतके पैसे नाहीये. जे काही मी ठेवले ते माझ्या उतार वयाच्या दृष्टीने ठेवले आहे.” तेव्हा या दोघीनी स्वतःच्या पैशाने घर घायचे ठरवले. मात्र त्यांना काही रक्कम मुलींना घर घेण्यासाठी देऊ केली. त्यानंतर सुप्रिया पाठक यांच्या घराजवळ दीना यांच्यासाठी घर घेतले गेले. काही वर्ष त्यांनी स्वतःच्या घरात सुखाचे काढले आणि ११ ऑक्टोबर २००२ ला वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दीना यांना दोन मुली, रत्ना पाठक शहा आणि सुप्रिया पाठक. या दोन्ही मुली आज अभिनयातले मोठे आणि नावाजलेले नाव आहे. लहानपणापासूनच या दोघींनी आईला अभिनय करताना पाहिल्यामुळे आपोआपच त्यांचा ओढा अभिनयाकडे जास्त होता. या दोघींनी टीव्ही, चित्रपट आणि नाटकं या मध्यमांमधून दर्जेदार अभिनय साकारत नावलौकिक मिळवला. या दोघींनी दुरदर्शनवरील प्रसिद्ध ‘इधर उधर’ मालिकेत देखील काम केले. रत्ना यांनी नसरुद्दीन शहा तर सुप्रिया यांनी पंकज कपूर यांच्याशी लग्न केले आहे.

हे देखील वाचा