वडिलांच्या प्रेम आणि त्यागावर आधारित हिंदी चित्रपट, ज्यांनी दिली अनोखी ओळख; ‘फादर्स डे’निमित्त घ्या जाणून


जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘पितृदिन’ म्हणून साजरा केला जातो. हा आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वडील आपल्या मुलांसाठी अनेक मोठे त्याग करतात. आपल्या मुलांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी वडील असंख्य कष्ट करतात. वडील आपल्या मुलांवरील प्रेम कधी जास्त व्यक्त करत नाही, म्हणून त्याचे मुलांवर प्रेम नाही असे नसते. वडील आणि मुलांचे नाते आणि वडिलांचे मुलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते.

आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये बहुतकरून आई आणि मुलाच्या नात्यावर आधारित अनेक सिनेमे तयार होतात. मात्र, काही काळापासून आईसोबतच आता वडील आणि मुलांच्या नात्यावर सिनेमे तयार होत आहे. वडिलांचे न बोलता व्यक्त होणारे निस्वार्थ प्रेम देखील निर्मात्यांना पडद्यावर दाखवण्यासाठी प्रोत्साहित करत असते. रविवारी (२० जून) ‘पितृदिना’च्या निमित्ताने जाणून घेऊया वडील आणि मुलांच्या नात्यावर आधारित काही चित्रपटांबद्दल…

अकेले हम अकेले तुम
आमिर खान आणि मनीषा कोईराला यांची मुख्य भूमिका असणारा ‘अकेले हम अकेले तुम’ हा सिनेमा १९९५ साली प्रदर्शित झाला होता. मन्सूर खान दिग्दर्शित या सिनेमात एक आई म्हणजेच मनीषा कोईराला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या नवऱ्याला आणि मुलाला सोडून निघून जाते. ती गेल्यानंतर आमिर खान आणि त्याचा मुलगा तेच एकमेकांसाठी असतात. आमिरचे त्याच्या मुलावर जीवापाड प्रेम असते.

मैं ऐसा ही हूं
सन २००५ साली अजय देवगण आणि सुश्मिता सेन यांचा ‘मैं ऐसा ही हूं’ या सिनेमात अजयने एका मानसिक रोगी असलेल्या वडिलांची भूमिका साकारली होती. जो आपल्या मुलीची कस्टडी आपल्याकडे ठेवण्यासाठी आणि स्वतःला मुलीला संभाळण्याइतके सक्षम दाखवण्यासाठी झगडत असतो.

दंगल
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा सिनेमा वडील मुलींच्या नात्यासोबतच, त्यांच्यात असणारे गुरु शिष्य नाते देखील दाखवतो. या चित्रपटात आमिर खानने महावीर सिंह फोगाट ही भूमिका साकारली होती. महावीर सिंग फोगाट हा आपल्या मुलींना पैलवान बनवण्यासाठी खूप संघर्ष करतो. २०१६ साली आलेल्या या सिनेमाला तुफान यश मिळाले.

शिवाय
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘शिवाय’ हा सिनेमा देखील वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करतो. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या अतिशय भावनिक सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन अजयनेच केले होते.

१०२ नॉट आऊट
अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर या दोन दिग्गजांची मुख्य भूमिका असलेल्या ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमात अमिताभ यांनी १०२ वय असलेल्या वडिलांची, तर ऋषीजींनी ७५ वर्षाच्या मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ आणि ऋषीजी यांची केमिस्ट्री बघण्याजोगी होती.

पिकू
वडील आणि मुलीची नाते अतिशय हळुवार आणि वास्तविक पद्धतीने ‘पिकू’ सिनेमातून मांडण्यात आले आहे. अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. आपल्या आजारी वडिलांची काळजी घेणारी, आपल्या इच्छा आकांक्षाना मोडा घालणारी मुलगी यात दीपिकाने साकारली होती.

पा
सन २००९ साली आलेल्या ‘पा’ या सिनेमात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. प्रोजेरिया आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाची भूमिका यात अमिताभ बच्चन यांनी साकारली होती, तर अभिषेकने अमिताभ यांच्या वडिलांची आणि विद्याने आईची भूमिका केली. यात वडील आणि मुलाचे एक वेगळेच नाते जगासमोर आणायचा यशस्वी प्रयत्न आर बल्की यांनी केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा राजेश खन्नांनी अमिताभ यांना विचारले, ‘सुपरस्टार झाल्यावर कसे वाटते?’; ‘या’ शब्दांत दिली होती ‘बिग बीं’नी प्रतिक्रिया


Leave A Reply

Your email address will not be published.