Thursday, March 28, 2024

चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी आनंदाची बातमी! बायो बबलमध्ये ‘इतके’ तास शूटिंग करण्याची परवानगी

कोरोना व्हायरसमुळे मुंबईमध्ये मनोरंजनाशी निगडीत कामकाजावर बंदी लावण्यात आली होती. टेलिव्हिजनमध्येही ज्या मालिकांचे एपिसोड दररोज प्रसारित केले जातात, त्यांचे निर्माते मुंबईत निर्बंध असल्यामुळे दुसऱ्या लहान शहरांमध्ये जाऊन शूटिंग करत आहेत. यामध्ये शूटिंगसाठी गोवा, दमन ही निर्मात्यांची सर्वाधिक आवडती ठिकाणे आहेत. यादरम्यान आता इंडस्ट्रीशी निगडीत व्यक्तींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहेत. चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या शूटिंगच्या वेळेत सूट देण्यासाठी शनिवारी (५ मे) राज्य शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली.

राज्य शासनाने म्हटले की, ठाणे आणि मुंबईमध्ये बायो बबलमध्ये शूटिंग केली जाऊ शकते. मात्र, यासाठी केवळ ८ तासांची परवानगी देण्यात आली आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉईजचे (Federation of Western India Cine Employees) अध्यक्ष बीएन तिवारी यांनी म्हटले की, “आम्ही साधारणत: दिवसात १२ तास शूटिंग करतो. यावर सरकारशी चर्चा करू. मात्र, मुंबई आणि ठाण्यातील सर्व सेट्सवर काम पुन्हा सुरू होईल. काही निर्माते आहेत, जे महाराष्ट्राबाहेर शूटिंग करत आहेत, ते आपले स्केड्यूल संपवून लवकरच मुंबईत परततील.”

बीएन तिवारी यांनी पुढे बोलताना म्हटले की, काही सेट मान्सूनसाठी तयार होत आहेत, ज्यांचे तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले होते. त्यांंनी सांगितले की, चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री बायो बबलमध्ये शूटिंगचे पालन करतील तसेच त्यांना ५ वाजता पॅक अप करणे बंधनकारक आहे.

चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाने लसीकरण अभियानही सुरू केले आहे. यासोबतच अशी खात्री केली जात आहे की, शूटिंग सुरू करणारे सर्व युनिट सदस्यांना लसीचा पहिला डोस देण्यात येईल. कोरोना संकटात चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांच्या पोटापाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा