Friday, March 29, 2024

सुरुवातीला सावळ्या रंगामुळे व्हायची ट्रोल, तर आज एका चित्रपटासाठी घेते 5-6 कोटी; वाचा ‘सिमरन’ काजोलचा जीवनप्रवास

आपण सिनेसृष्टीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, अनेकदा या क्षेत्रावर घराणेशाहीवरून टीका होत असते. अनेक कलाकरांना या टीकेला सामोरे देखील जावे लागते. घराणेशाही योग्य की अयोग्य हा विषय नाहीये. पण काही स्टारकिड्स खरोखर प्रतिभेचे धनी असतात. कदाचित अंगात अभिनयाचे रक्त, घरातून मिळणारे या ग्लॅमर इंडस्ट्रीचे बाळकडू यामुळे या स्टारकिडकडे अभिनयाचा गुण नक्कीच असतो. आपल्या या बॉलिवूडचे अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बाबतीतील गणित काहीसे वेगळे आहे.

रंगावरून सौंदर्य आणि फिगरवरून प्रतिभा ओळखणाऱ्या या क्षेत्रात अनेक अभिनेत्री अपवाद ठरल्या. काहींनी त्यांच्या सौंदर्याच्याही पुढे जाणून केवळ जिवंत आणि सशक्त अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आणि लोकांच्या मनात जागा निर्माण केली. अशीच एक प्रतिभावान, हुशार, सुंदर, बबली अभिनेत्री म्हणजे काजोल. (kajol) काजोलने तिच्या अभिनयाच्या ताकदीने 90 च्या दशकात अक्षरशः राज्य केले. आज ही हरहुन्नरी अभिनेत्री तिचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिच्या सिनेप्रवासावर टाकलेला हा प्रकाश.

काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974साली मुंबईत झाला. काजोलची आई तनुजा या मराठी, हिंदी मधील मोठ्या अभिनेत्री होत्या. तर वडील शोमू मुखर्जी हे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते. 2008 साली त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काजोलचे संपूर्ण खानदान चित्रपटसृष्टीतले मोठे नाव आहे. दिग्गज अभिनेत्री नूतन या तिच्या मावशी, शोभना समर्थ तिच्या आजी, राणी मुखर्जी तिची बहीण, मोहनीश बहल तिचा भाऊ आहे. एवढ्या मोठ्या घरातून येणाऱ्या काजोलला साहजिकच तिच्या घरातून लहानपणापासून फिल्मी वातावरण मिळाले. त्यामुळे तिने याच क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. (happy birthday kajol known her unknown facts)

या क्षेत्रात येण्याच्या मागे काजोलचा अजून एक लपलेला हेतू होता आणि तो म्हणजे तिला अभ्यासापासून वाचायचे होते. काजोलने 1992 साली वयाच्या 17 व्या वर्षी ‘बेखुदी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र काजोलला तिच्या प्रभावी अभिनयामुळे सर्वानी नोटीस केले. हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर तिला अब्बास-मस्तान यांनी त्यांच्या 1993 साली आलेल्या ‘बाजीगर’ सिनेमासाठी साइन केले. हा क्राइम थ्रिलर सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शाहरुख खान आणि काजोल एकत्र आले. हा सिनेमा काजोलच्या करियरसाठी खूपच महत्वाचा ठरला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

‘बाजीगर’नंतर तिला तिच्या दिसण्यावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. तिचे लुक्स, तिचा रंग यावरून ती मोठ्या प्रमाणवर टीकेला बळी पडली. मात्र काजोल कधीच याकडे लक्ष न देता, फक्त काम करत राहिली. तिच्या अभिनयाने तिने सर्वांना उत्तर दिले. आज काजोल इंडस्ट्रीमधल्या मोठ्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट झाली आहे. काजोल म्हणजे सिनेमा हिट असे समीकरण बनवण्यासाठी काजोलने खूप मेहनत घेतली आहे. करियर आणि वैयक्तिक आयुष्य काजोलने खूपच सुंदर हाताळले आहे.

काजोलने तिच्या करियरमध्ये अनेक विविध प्रकारच्या भूमिका केल्या. तिने 1997 साली ‘गुप्त’ या सिनेमात चक्क खलनायिका साकारली. करियरच्या सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका साकारायला नकार देणाऱ्या अनेक अभिनेत्री असतात. मात्र आपल्यातील अभिनय क्षमता आणि प्रेक्षक आणि समीक्षक यांच्या समोर एक सशक्त अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करणे. हाच विचार करून काजोलने ही भूमिका केली. काजोलचा हा निर्णय अतिशय योग्य ठरला आणि तिला या भूमिकेसाठी पुरस्कार देखील मिळाला.

काजोलबद्दल सांगताना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाचा विषय आला नाही तर अप्रूप. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेमाला जणू काही नवीन व्याख्याच मिळाली. सिमरन आणि राज यांची जोडी प्रेक्षकांवर भुरळ घालण्यात यशस्वी ठरली. तरुणाईला अक्षरशः वेड लावणाऱ्या या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले. ‘दिवाना’ आणि ‘दिल आशना’ या चित्रपटातील शाहरुख खान आणि दिव्याची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. म्हणूनच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात सिमरनच्या भूमिकेसाठी दिव्या भारतीला घेण्याचा निर्णय आदित्य चोप्रा यांनी घेतला होता. मात्र दिव्या भारतीच्या निधनामुळे हा सिनेमा काजोलच्या झोळीत आला.

या सिनेमाला या वर्षी प्रदर्शित होऊन 27 वर्ष पूर्ण होणार आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे नवनवे रेकॉर्ड करणारा हा सिनेमा आजही अनेकांच्या आवडीच्या चित्रपटांपैकी एक आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ने सलग 20 वर्षे मराठा मंदिर थिएटरवर झळकण्याचा रेकॉर्ड केला आहे. 2015मध्ये हा सिनेमा मराठा मंदिरामधून काढण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले, सोबतच अनेक पुरस्काराची देखील कमाई केली. जशी काजोल तिच्या व्यायसायिक आयुष्यासाठी चर्चेत होती तशीच ती वैयक्तिक आयुष्यासाठी देखील गाजताना दिसली.

काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले आहे. या दोघांची भेट आणि त्यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. अजय आणि काजोलने अनेकदा त्यांची लव्हस्टोरी मीडियासमोर सांगितली आहे. अजय आणि काजोलची पहिली भेट 1995साली ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर झाली. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, “मी ‘हलचल’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार झाले होते आणि तिथल्या लोकांना माझ्यासोबत हिरोची भूमिका कोण करणार आहे असे विचारले. तेव्हा कोणीतरी अजयकडे इशारा केला. तो एका कोपऱ्यात बसला होता. मला त्याला पाहून विचित्र वाटले कारण हिरो असूनही तो कोपऱ्यात बसला होता. त्यानंतर शूटिंग दरम्यान आम्ही चांगले मित्र झालो.”

काजोल पुढे म्हणाली, “अजय तेव्हा एका दुसऱ्या मुलीला डेट करत होता. मी देखील माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार सारखी त्याच्याकडे करायची. त्यानंतर माझे ब्रेकअप झाले. पुढे त्याचेही ब्रेकअप झाले. नंतर काही काळाने आम्ही एकत्र असल्याचे आम्हाला वाटायला लागले. पण आम्ही दोघांनीही एकमेकांना कधी प्रपोज केलेले नाही. जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या घरच्यांनी लग्नासाठी लगेच होकार दिला होता. मात्र माझ्या घरी सांगितल्यावर माझ्या वडिलांनी माझ्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे, असे माझ्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी माझ्या घरातील मंडळी देखील लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर आम्ही 1999 अतिशय खासगी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले.” आज काजोल आणि अजयला युग आणि न्यासा ही दोन मुलं आहेत.

काजोलचा तिच्या नावाचा देखील एक किस्सा आहे, जो तिने एका शोमध्ये सांगितला होता. तिच्या वडिलांना तिचे नाव मर्सिडीज ठेवायचे होते. आता हे नाव एकूण सर्वांच्या डोळ्यासमोर गाडी आली असेल. मर्सिडीजच्या मालकाने त्याच्या मुलीच्या नावावरून त्याच्या कंपनीचे नाव मर्सिडीज ठेवले होते. त्यामुळे काजोलचे वडील शोमु मुखर्जी यांची देखील मुलीचे नाव मर्सिडीज ठेवण्याची इच्छा होती. मात्र त्यानंतर ती रद्द झाली आणि काजोल नाव ठेवले गेले.

काजोल खऱ्या आयुष्यात अगदी सामान्य महिलांसारखी आहे. ती ऑनलाईन शॉपिंगची खूप मोठी चाहती आहे. तिला महाग किंवा ब्रॅंडेड गोष्टी विकत घ्यायला आवडत नाहीत. याउलट ती स्वस्त आणि जास्त टिकाऊ गोष्टी घेण्यासाठी प्रयत्न करते. काजोल ऑनलाईन इतकी शॉपिंग करते, की रोज त्यांच्या घरी 5/6 पार्सल तिच्या नावावर येतात. शिवाय तिला डिस्काउंटमध्ये खरेदी करायला आवडते. काजोल कमीत कमी पैशात जास्तीत जास्त उपयोगी वस्तू घेण्यावर भर देते.

आजच्या घडीला काजोल 180 कोटी रुपयांची मालकीण आहे. ती महिन्याला 1 कोटीपेक्षा अधिक पैसे कमावते, तर एका सिनेमाचे ती 5/6 कोटी रुपये घेते. यासोबतच अनेक जाहिरातींमधून देखील ती बक्कळ कमाई करते. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. काजोलला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात फिल्मफेयरसोबत पदमश्री पुरस्काराचा देखील समावेश आहे. सिंगापूरमध्ये मादाम तुसादमध्ये तिचा मेणाचा पुतळा देखील लावण्यात आला आहे.

काजोल आतापर्यंत, ‘गुप्त’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएगें’, ‘बाजीगर’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता हैं’, ‘माय नेम इज खान’, ‘फना’, ‘करण अर्जुन’, ‘ये दिल्लगी’, ‘इश्क’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘प्यार तो होना ही था’ आदी अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.

अधिक वाचा- 
बॉलिवूडमध्ये डेब्यू करताच जेनेलियाने दिले रितेशला तिचे मन, पुढे ‘असा’ होता तिचा प्रवास
कोण आहे महिमा मकवाना? जिला मिळाला सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटातून ब्रेक

हे देखील वाचा