सिनेजगतात आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्यांमध्ये गणले जाणारे नाव म्हणजे अभिनेते इरफान खान होय. ते आता आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांची वेगळी शैली, डोळ्यांनी बोलण्याची कला, बोलण्याची वेगळी स्टाईल… हे सगळे आपल्या मनात कायम जिवंत राहील. सर्वांच्या मनात घर करून राहणारे इरफान राजेश खन्ना यांच्या मनात देखील होते. इरफान यांना त्यांना भेटायचे होते आणि याच इच्छेने ते त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी जी शक्कल लढवली, ती भन्नाटच होती.
इरफान (Irrfan Khan) यांचा जन्म 7जानेवारी,1967रोजी राजस्थानमध्ये झाला होता. त्यांचे कुटुंब गावात टायरचा व्यवसाय करायचे. राजस्थानच्या टोंकमध्ये जन्मलेले इरफान खरं तर, साहबजादे इरफान अली खान आहेत. जयपूरच्या टोंक गावात त्यांच्या घराण्याच राज्य होते. त्यांचे वडील तिथले सर्वात मोठे जमीनदार होते. त्यांची आई टोंकच्या हकीम घराण्यातील आहे.
राजेश खन्नांना भेटण्यासाठी लढवली ‘ही’ शक्कल, पण…
अभिनयात येण्यापूर्वी इरफान मुंबईत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचे ते राजेश खन्नांचे मोठे चाहते होते. त्यामुळे त्यांना राजेश खन्नांना भेटायचेही होते. त्यासाठीच त्यांना इलेक्ट्रिशियन बनून राजेश खन्नांचे घर गाठले. मात्र, त्यांची इच्छा त्या दिवशी पूर्ण झालीच नाही. कारण योगायोग असा घडला की, ‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना त्यादिवशी घरी उपस्थित नव्हतेच.
पैशांअभावी सोडले होते क्रिकेट
ऑइरफान लहानपणी क्रिकेट खूप चांगले खेळायचे आणि सीके नायडू ट्रॉफीसाठीही त्यांची निवड झाली होती. पण त्या वेळी त्यांच्याकडे प्रवास करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली.
अभिनयाची ‘अशी’ झाली सुरुवात
अभिनेत्याने त्यांच्या काकांकडून प्रेरित होऊन अभिनयात रस दाखवला, जे जयपूरमधील थिएटर कलाकार होते. इरफानने आपल्या शहरात अनेक स्टेज परफॉर्मन्स दिले. मास्टर्स पूर्ण केल्यानंतर, 1984 मध्ये त्यांनी अभिनय शिकण्यासाठी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये प्रवेश घेतला.
टीव्हीवर केले आहे काम
सुरुवातीला त्यांनी मुंबईत एसी रिपेअरिंगमध्येही काम केले, पण 1987 मध्ये एनएसडीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’मधून पदार्पण केले. त्यांची भूमिका खूपच लहान होती, जी अंतिम फेरीत आणखी कमी झाली. त्यानंतर त्यांनी टीव्हीवर काम केले.
‘या’ चित्रपटातून मिळाली ओळख
यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळू लागले, मात्र त्यांना ओळख ‘मकबूल’ चित्रपटातून मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक चित्रपट दिले. हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
इरफान खान यांचे 29 एप्रिल,2020 रोजी निधन झाले. त्यांना न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते आणि त्यांनी परदेशातही उपचार घेतले होते. मात्र, या आजारासमोर जीवनाच्या लढाईत पराभूत होऊन त्यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. असे असले, तरीही इरफान हे त्यांच्या चित्रपटांमधून नेहमीच चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत राहतील.
हेही पाहा-
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कियाराच्या मंगळसूत्रासाठी सिद्धार्थने खर्च केले तब्बल इतके काेटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
पंगा गर्ल कंगना राणौतने आमिर खानवर साधला निशाणा, अभिनेत्याला म्हटले ‘बिचारा’