Saturday, April 20, 2024

नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमात अमिताभ बच्चन पडद्यावर साकारलेले विजय बारसे टीचर नक्की आहेत तरी कोण?

नागराज मंजुळे (Nagraj Majule) यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा झुंड नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागराज मंजुळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि बॉलिवूडमधील पहिल्याच झुंड (Jhund) या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे. आपण वेगवेगळ्या बातम्यांमधून, वेगवेगळ्या मुलाखतींमधून हा सिनेमा आणि या सिनेमातील अमिताभ यांची भूमिका एका खऱ्या व्यक्तिमत्वावर आधारित असल्याचे ऐकत आहोत. हे व्यक्तिमत्व म्हणजे विजय बारसे. नक्की कोण आहेत विजय बारसे (Vijay Barse) आणि त्यांनी एवढे मोठे कोणते काम केले की, त्यांच्यावर सिनेमा तर निघाला आणि सगळ्यांसाठीच अतिशय महान अभिनेते असलेल्या अमिताभ बच्चन यांनी त्यांची भूमिका साकारली. चला तर जाणून घेऊया विजय बारसे यांच्याबद्दल.

 

विजय बारसे हे एक रियल लाईफ अभिनेते असून त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. हे पहिल्यांदा नाही की, विजय बारसे यांचे काम लोकांसमोर येत आहे. याआधी आमिर खानचा शो असलेल्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये देखील विजय यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठ्या महत्वाच्या गोष्टी सर्वांना सांगितल्या. २००० सालच्या आसपास विजय बारसे यांना नागपूरच्या हिसलॉप कॉलेजमध्ये खेळाचे (स्पोर्ट्स टीचर) शिक्षण म्हणून नियुक्त केले गेले. तेव्हा त्यांनी काही मुलांना पावसामध्ये तुटलेल्या बादल्याना लाथ मारताना पाहिले आणि त्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. त्या मुलांनी देखील अगदी आनंदाने हा खेळ शिकून घेतला. विजय यांनी सांगितले होते की, “या बादलीच्या घटनेनंतर मी अजून काही मुलांना टेनिस बॉलला किक मारताना पाहिले. त्यानंतर मला असे जाणवले की, या मुलाला उत्तम आणि शास्त्रशुद्द प्रशिक्षण द्यायला पाहिजे. पण त्या सर्व मुलांना खूपच वाईट व्यसनं होती. मात्र जेव्हा ती मुलं खेळण्याच्या मैदानात असतात तेव्हा ते जगातील सर्व वाईट गोष्टींपासून लांब राहतात. पुढे मी विचार केला की, ही मुलं देशाच्या भविष्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान देखील देऊ शकतात. जेव्हा ते मैदानावर असतात तेव्हा त्यांचे लक्ष फक्त मैदानावर आणि खेळाकडे असते. एक शिक्षक त्यांना अजून काय देऊ शकतो.?”

‘झोपड़पट्टी फुटबॉल’ ची सुरुवात २००२ मध्ये झाली. नंतर विजय बारसे हे स्लम सॉसर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना नेहमीच त्यांचे सहकारी आजूबाजूचे लोकं विचारायचे की, त्यांनी या टीमचे नाव स्लम सॉसर का ठेवले? तेव्हा विजय बारसे सांगायचे, “मला माहित आहे की, सर्व खेळाडू झोपड्पट्टीमधून आले आहेत, आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी चांगले काम करायचे होते. म्हणूनच मी हे नाव ठेवले.” विजय बारसे यांच्या स्लम सॉसर या टीमने शहर पातळीवरील स्पर्धांसोबतच जिल्हा पातळीवरील स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेतला. २००३ मध्ये वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या कामावर एक लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. त्यांच्या कामाबद्दल मोठ्याप्रमाणावर लोकांना माहिती मिळू लागली. स्लम सॉसरचे नाव होत होते आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर देखील ओळख मिळत होती. विजय आणि त्यांच्या टीममधील मुलांना या खेळासोबत आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा. सुरुवातीच्या काळात विजय यांच्याजवळ कोणताही स्पॉन्सर नव्हता, त्यांना कोणीही फंडिंग करत नव्हते. म्हणूनच त्यांनी स्वतः जवळील बचत या मुलांसाठी आणि त्यांच्या खेळासाठी वापरण्यास सुरुवात केली. विजय बारसे यांच्या मुलाने देखील त्यांना यासाठी मदत केली. जेव्हा त्यांच्या मुलाला विजय यांच्या कामाबद्दल समजले तेव्हा तो अमेरिकेत होता. मात्र वडिलांची मदत करण्याच्या हेतूने तो पुन्हा भारतात आला.

२०१८ साली विजय यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी एक स्पोर्ट्स टीचर असलो तरी मी फुटबॉलच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा धिंडोरा पेटला नाही. मी फक्त फुटबॉलच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करत आहे.” २००७ साली विजय बारसे यांची नेल्सन मंडेला यांच्याशी भेट देखील झाली. एका मोठ्या वृत्तसंस्थेने स्लम सॉसरची राष्ट्रीय टूर्नामेंट कव्हर केली होती. त्यानंतर होमलेस वर्ल्डच्या माजी अध्यक्ष असलेल्या एंडी हूक्स यांनी विजय बारसे यांना दक्षिण आफ्रिकेत बोलावले होते. तिथेच त्यांची नेल्सन मंडेला यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर विजय यांनी सांगितले होते की, “त्या दिवशी मला माझ्या कामाची सर्वात मोठी पोच पावती आणि ओळख मिळाली. त्यांनी त्यांच्या हाथ माझ्या हातावर ठेवत मला म्हटले होते की, मुला तू खूपच चांगले काम करत आहेस.” विजय बारसे यांच्या या संपूर्ण प्रवासावर नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’ हा सिनेमा बनवला आहे. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यानंतर विजय यांनी त्यांची प्रतिक्रिया सांगताना म्हटले होते की, ते हा त्रिलेत पाहून खूपच प्रभावित झाले होते. या सिनेमातून प्रत्येकाच्या भावनांना अतिशय उत्तम पद्धतीने पडद्यावर उतरवले आहे. या सिनेमात नागराज यांनी विजय यांच्याच खऱ्या टीममधल्या काही स्लम सॉसर यांनाच घेतले आहे. विजय यांचा अतिशय आव्हानात्मक आणि संघर्षमय प्रवासाला नागराज यांनी उत्तम पद्धतीने न्याय देत त्यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा या सिनेमातून उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

जेव्हा नागराज मंजुळे यांनी विजय यांची त्यांच्यावर सिनेमा काढण्यासाठी पहिल्यांदा भेट घेतली तेव्हा विजय यांना नागराज कोण आहे हे माहित नव्हते. कारण ते अजिबात सिनेमा टीव्ही नव्हते बघत. मात्र आज त्यांच्यावर सिनेमा आला असून, या सिनेमामुळे त्यांचे काम आणि नाव संपूर्ण जगात पोहचले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा