Saturday, June 29, 2024

“चारभिंतीच्या आत गुलामगिरीचे चटके सोसतच…”, किरण मानेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मंगळवारी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. सर्व भारतीय एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी देखील एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने (Kiran Mane) यांनी पोस्ट करताना लिहिले की, “आज ‘स्वातंत्र्य दिना’च्या दिवशी मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं ! दिड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी, ती घटना घडल्यावर मी फेसबुकवर येऊन म्हणालो होतो.”काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !”

आज ते सिद्ध करून दाखवलं. पण मला आनंद होतोय तुमच्यासाठी. ‘त्या’ सगळ्या काळात तुम्ही मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. मला पूर्वीपेक्षा शंभरपटींनी प्रेम दिलंत. त्यामुळं आज या क्षणी नम्रपणे तुम्हा चाहत्यांच्या पायाशी रहाणं, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचं असेल.

…मी जी कलाकृती तुमच्यासाठी घेऊन येतोय, ती साधीसुधी नाय माझ्या भावांनो. शेकडो संकटांचा पहाड पार करून, हजारो अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंवरची मालिका आहे ही ! माईंच्या काळजात ज्या व्यक्तीबद्दल ‘स्पेशल’ जागा होती.. ज्यानं माईंच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला, तो तुम्हाला माहित नसलेला ‘अनसंग हिरो’ मी साकारणार आहे. पैज लावून सांगतो, तो आणि त्याच्या लेकीमधला गहिरा जिव्हाळा पाहून तुम्ही हरवून जाल. हरखून जाल. यांना रोज भेटायची ओढ लागेल तुम्हाला.

त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळुन फक्त एक वर्षच झालंवतं जेव्हा विदर्भातल्या एका छोट्या खेड्यातल्या, त्या माणसाच्या घरी हे अफलातून लेकरू जन्माला आलं. आपली भुमी स्वतंत्र झालीवती, पण आपल्या जुनाट समाजव्यवस्थेतनं ‘स्त्री’ मुक्त नव्हती झाली. ती चारभिंतीच्या आत गुलामगिरीचे चटके सोसतच होती.

अशा काळात सख्ख्या आईसकट सगळ्यांनी नाकारलेल्या लेकीला पोटाशी धरणारा… जीव लावणारा… तिला जोपासणारा… घडवणारा… ‘बापमाणूस’, द ग्रेट अभिमान साठे पुन्हा जिवंत करायला मिळणं, हे ‘अभिनेता’ म्हणून सुख आहे हो… निव्वळ सुख ! ‘कमबॅक’ अजून कसा पायजे सांगा बरं?

माझी खात्रीय आजपासून रोज संध्याकाळी ७ वाजता ‘कलर्स मराठी’ चॅनलवर येऊन, हा अद्भूत प्रवास तुम्ही बघणार आहातच.. पण तुमच्या मुलाबाळांनासुद्धा आवर्जुन दाखवा… कलर्स मराठी वाहिनीचे मनापासुन आभार .”

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. किरण माने यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून. या मालिकेच्या सेटवर झाल्या वादामुळे ते प्रचंड चर्चेत आले. किरण माने एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. (Kiran Mane shared a post on the occasion of Independence Day)

अधिक वाचा- 
भारीच ना! स्वातंत्र्यदिनी ‘Fighter’चा टीझर रिलीज, ऋतिक अन् दीपिकाचा दमदार लूक जगभरात व्हायरल
काजोल ते महेश बाबू, स्टार कलाकारांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ‘खिलाडी’ने भारतीय असल्याचा दिला पुरावा

हे देखील वाचा