[rank_math_breadcrumb]

आलिया-रणबीर-विक्कीचा ‘लव अँड वॉर’ उशिरा येणार? भंसालींच्या चित्रपटाची डेट पोस्टपोन झाल्याची चर्चा

संजय लीला भंसाली हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित आणि भव्य दिग्दर्शक मानले जातात. त्यांच्या चित्रपटांची भव्यता, सेट्स, संगीत आणि भावना यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाची उत्सुकता असते. सध्या संजय लीला भंसाली त्यांच्या आगामी चित्रपट ‘लव अँड वॉर’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची खास बाब म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल हे तिन्ही स्टार्स मुख्य भूमिकेत झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर, (Ranbir Kapoor)आलिया भट्ट आणि विक्की कौशल स्टारर ‘लव अँड वॉर’चा रिलीज पुढे ढकलला गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलून थेट पुढील वर्षी नेण्यात आली आहे. यामागचे प्रमुख कारण रणबीर कपूरचा आणखी एक बहुचर्चित चित्रपट ‘रामायण’ असल्याचे सांगितले जात आहे. ‘रामायण’ हा चित्रपट दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याने, निर्माते रणबीरच्या दोन्ही चित्रपटांच्या रिलीजमध्ये अंतर ठेवू इच्छित आहेत. त्यामुळे आता ‘लव अँड वॉर’ 2027 मध्येच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 मिडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की ‘लव अँड वॉर’चे अजूनही मोठ्या प्रमाणात शूटिंग बाकी आहे. आधीच्या नियोजनानुसार जूनपर्यंत शूटिंग पूर्ण होणार होते आणि त्यानंतर पोस्ट-प्रोडक्शन सुरू होणार होते. मात्र, चित्रपटात भव्य हवाई अ‍ॅक्शन सीन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात VFX वापरण्यात येणार आहेत. अशा सीनसाठी वेळ लागतो. संजय लीला भंसाली त्यांच्या चित्रपटांच्या भव्यतेबाबत कोणतीही तडजोड करत नसल्याने, पोस्ट-प्रोडक्शनमध्ये घाई करायची नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 2026 मध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘लव अँड वॉर’ हा चित्रपट अतिशय भव्य स्तरावर तयार केला जात आहे. 20 जानेवारी रोजी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एका मोठ्या गाण्याचे शूटिंग होणार असून, या गाण्यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल एकत्र दिसणार आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य करणार आहेत.

संजय लीला भंसालींचा हा चित्रपट वॉर पीरियडमध्ये घडणाऱ्या एका प्रेमत्रिकोणावर आधारित आहे. विशेष म्हणजे, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल ही तिकडी पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र झळकणार आहे. अद्याप अधिकृत रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नसली, तरी सूत्रांच्या मते ‘लव अँड वॉर’ हा चित्रपट प्रजासत्ताक दिन 2027 किंवा व्हॅलेंटाइन डे 2027 च्या आसपास प्रदर्शित होऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा  

मी खोटं काहीच बोलले नाही” – मानहानी प्रकरणावर मंधिरा कपूर यांची ठाम भूमिका; करिश्मा कपूरच्या मुलांचा केला उल्लेख