Monday, February 16, 2026
Home बॉलीवूड 1 किलोही नव्हतं वजन, शरीर जांभळट पडलं होतं; जन्मताच प्रियंका चोप्रांच्या लेकीची कठीण लढाई

1 किलोही नव्हतं वजन, शरीर जांभळट पडलं होतं; जन्मताच प्रियंका चोप्रांच्या लेकीची कठीण लढाई

निक जोनासने अलीकडेच आपल्या आयुष्यातील सर्वात नाजूक आणि भावनिक टप्प्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. प्रियांका चोप्रासोबत पहिल्यांदा आई-वडील बनल्यानंतरचा काळ अजिबात सोपा नव्हता आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासच्या जन्मानंतर त्यांनी भोगलेली भीती, वेदना आणि आशा यांचा अनुभव निकने पहिल्यांदाच शब्दांत मांडला आहे. जगभरात आपल्या मजबूत नात्यासाठी ओळखलं जाणारं हे कपल सोशल मीडियावर नेहमीच कुटुंबीय आयुष्याची झलक दाखवत असतं, पण यावेळी निकने सांगितलेली कहाणी चाहत्यांना भावूक करून गेली आहे.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना निक जोनासने सांगितलं की मालतीचा जन्म अपेक्षेपेक्षा खूप आधी झाला होता. ते आणि प्रियांका मानसिकदृष्ट्या यासाठी अजिबात तयार नव्हते. “ती इतक्या लवकर या जगात येईल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती,” असं निक म्हणाला. रुग्णालयातून फोन आल्यानंतर तातडीने ते पोहोचले, पण तिथले दृश्य अत्यंत धक्कादायक होतं. मालतीचं वजन फक्त 1 पाउंड 11 औंस (साधारण एक किलोपेक्षाही कमी) होतं. तिची अवस्था खूप नाजूक होती आणि तिचा रंग जांभळट पडलेला पाहून परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट दिसत होतं.

जन्मानंतर लगेचच मालतीला NICU (निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये ठेवण्यात आलं, जिथे तिने सुमारे साडेतीन महिने घालवले. या काळात निक आणि प्रियांका दोघांनीही स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. निकने सांगितलं की ते 12-12 तासांच्या शिफ्टमध्ये रुग्णालयात थांबत होते, जेणेकरून प्रत्येक क्षणी मुलीच्या जवळ राहता येईल. हे सगळं कोविड-19 महामारीच्या काळात घडत होतं, ज्यामुळे अडचणी आणखी वाढल्या.

निकने NICU मधील नर्सेस आणि डॉक्टरांचे विशेष कौतुक केलं. “त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून आमच्या मुलीचं प्राण वाचवलं,” असं तो म्हणाला. मालतीला सहा वेळा रक्तस्राव (ब्लड ट्रान्सफ्यूजन) करावा लागला. प्रत्येक दिवस हा भीती आणि आशा यांच्या दरम्यानचा संघर्ष होता. निकच्या शब्दांत सांगायचं तर, “तो काळ एकाच वेळी दिलासा देणारा आणि अत्यंत भयावह होता.”

निकने सांगितलं की मालतीने दररोज आयुष्याशी झुंज दिली. हळूहळू ती मजबूत होत गेली आणि अखेर तो दिवस उजाडला, जेव्हा डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्या क्षणाची आठवण काढताना निक भावूक झाला आणि म्हणाला की तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिलासा देणारा अनुभव होता.

निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांनी 2018 मध्ये ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांनुसार भव्य लग्न केलं होतं. जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे त्यांनी मालतीचं स्वागत केलं. मुलीच्या जन्मानंतर हे कपल अधिकच एकमेकांच्या जवळ आलं असून, कठीण काळात एकमेकांचा आधार कसा असावा, याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलं आहे.

कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं, तर निक जोनास लवकरच जॉन कार्नी दिग्दर्शित ‘पावर बॅलेड’ या चित्रपटात पॉल रुडसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)भारतीय सिनेसृष्टीत दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ती एस.एस. राजामौली यांच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटात महेश बाबूसोबत झळकणार असून, यासाठी तिने भारतातील विविध ठिकाणी शूटिंगही पूर्ण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘रामायण’मधील राजा दशरथ; बाल धुरींनी 22 चित्रपटांत ठसा उमटवला, रिअल लाइफमध्ये होते कौशल्याचे पती, आता साधेपणात घालवतायत जीवन

हे देखील वाचा