Monday, September 25, 2023

लाखो तरुणांची धडकन असणाऱ्या ऋता दुर्गुळेने अशी केली करिअरला सुरुवात, जाणून घ्या तिचा प्रवास

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय चेहरा आणि लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे होय. आपल्या सुंदर आणि सालस सौंदर्याने ती सर्वांना तिच्याकडे आकर्षित करत असते. मराठी टेलिव्हिजनवरील एक लक्षवेधी चेहरा अशी ऋताची ओळख आहे. मालिका, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम करून तिचे नाव कमावले आहे. ऋताचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तिचे लाखांमध्ये चाहते आहेत. ऋता मंगळवारी (12 सप्टेंबर) तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे अनेक चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

ऋताचा (Hruta durgule) जन्म 12 सप्टेंबर, 1994साली मुंबई येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव दिलीप दुर्गुळे आणि आईचे नाव नीलिमा दुर्गुळे हे आहे. तिला एक लहान भाऊ देखील आहे. त्याचे नाव ऋग्वेद दुर्गुळे हे आहे. ऋताचे मूळ गाव रत्नागिरी हे आहे. तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथून पूर्ण केले. तिने रुईया कॉलेजमधून मास मीडियाची पदवी घेतली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. कॉलेजमधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात ती सहभाग घ्यायची. (marathi actress hruta durgule celebrate her birthday, let’s know about her)

ऋताने 2012 साली ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून भूमिका बजावली आहे. तिची ही मालिका खूप गाजली होती. अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यानंतर तिने मुख्य अभिनेत्री म्हणून मराठी मालिकांमध्ये पदार्पण केले. तिने स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. या मालिकेत तिच्यासोबत सुयश टिळक आणि हर्षद अटकरी हे मुख्य भूमिकेत होते. जवळपास तीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. इथूनच ऋता नावारूपाला आली. यानंतर तिच्या करिअरला वळण मिळाले ते २०१७ साली ‘फुलपाखरू’ या मालिकेतून. झी युवा या वाहिनीवरील एक सुंदर प्रेमकहाणी असणाऱ्या मालिकेत ऋताने मुख्य भूमिका निभावली आहे. मालिकेतील तिचे ‘वैदेही’ नावाचे पात्र इतके गाजले गाजले की, सर्वत्र तिला ‘वैदेही’ नावाने ओळखू लागले. मालिकेत तिच्यासोबत यशोमन आपटे हा होता. मालिकेतील त्याच्या पात्राचे नाव ‘मानस’ होते. मानस आणि वैदेही ही जोडी एवढी प्रसिद्ध झाली होती की, प्रेक्षकांनी त्यांना ‘मानदेही’ हे नाव दिले होते. तरुण वर्गातील मुले या मालिकेकडे खूप आकर्षित झाले होते. मालिकेने या जोडीला खूप प्रेम आणि प्रसिद्धी मिळवून दिली.

यानंतर ऋताने सिंगिंग रियॅलिटी शो ‘सिंगिंग स्टार’ मध्ये सूत्रसंचालन केले होते. तिने 2018 मध्ये ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात काम केले आहे. तसेच तिने ‘ड्युएट’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ऋताने ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. तसेच ती ‘अनन्या’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी शेअर केले आहे. तसेच तिला ‘टाईमपास 3’ मध्ये अप्रोच केले आहे.

ऋताला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 2014 साली तिला महाराष्ट्र टाईम्स आणि सन्मान अवॉर्ड्सकडून टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच २०१६ साली झी युवा सन्मानतर्फे ‘युथफूल फेस ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. तसेच ‘फुलपाखरू’ या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. तसेच तिला झी नाट्य गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे.

ऋता ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. ऋताच्या बाबतीत एक गोष्ट खूप आकर्षक आहे, ती म्हणजे तिचे बोलके डोळे. यासोबत तिच्या हातावरील टॅटू देखील खूप लोकप्रिय आहे. तिने इंग्रजीमध्ये एचडीपी असा टॅटू केला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “माझे आणि माझ्या मैत्रिणींच्या इनिशिअल लेटरवरून आम्ही तिघींची हा टॅटू केला आहे. एच म्हणजे ऋता, डी म्हणजे ध्रुवी आणि पी म्हणजे पूर्वा.”

ऋता सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता अजिंक्य राऊत आहे. टेलिव्हिजनवर तिला पुन्हा एकदा पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच मालिकेतील अजिंक्य आणि ऋताची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडत आहे.

हेही नक्की वाचा-
सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज जिंकतोय चाहत्यांची मने, Photo
दिग्दर्शकाच्या ‘या’ मागणीवर प्राचीने केले स्वतःला व्हॅनिटीमध्ये बंद; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

हे देखील वाचा